भास्कराचार्य– १ : (अंदाजे इ.स. ६२८ )

भास्कराचार्य-१ यांच्या जन्म-मृत्यूबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या महाभास्करीय, लघुभास्करीय, आणि आर्यभटीयभाष्य  या उपलब्ध ग्रंथांवरून ते पाचव्या शतकातील आर्यभटांच्या परंपरेतील उल्लेखनीय गणिती असल्याचा निष्कर्ष काढता येतो. त्यांच्या ग्रंथांमध्ये सातव्या शतकातील मैत्रक राजवटीची राजधानी असलेल्या वल्लभी नगराचा तसेच शिवराजपुर आणि भरूच या स्थानांचाही उल्लेख येतो, यावरून ते सौराष्ट्रातील असावेत आणि सातव्या शतकात होऊन गेले असावेत असे मानले जाते.

भास्कराचार्यांनी लिहिलेले महाभास्करीय  व लघुभास्करीय  हे ग्रंथ खगोलशास्त्रविषयक आहेत. त्यापैकी महाभास्करीय  या ग्रंथात सातव्या प्रकरणात त्यांनी दिलेले त्रिकोणमितीतील ज्या (साईन) फल काढण्याचे सूत्र लक्षणीय आहे. त्या सूत्रानुसार येणाऱ्या किंमती आधुनिक किंमतींच्या खूपच जवळच्या आहेत. त्यांचा आर्यभटी  हा भाष्यग्रंथ एक उत्कृष्ट टीकाग्रंथ मानला जातो. आर्यभटीयातील गणितपादातील संक्षिप्त गणिती सूत्रांचे त्यांनी गद्यात पद्धतशीर विवरण केले आहे आणि नमुन्याची उदाहरणेही दिली आहेत. मूळ पद्यश्लोकातील प्रत्येक शब्दाचे स्पष्टीकरण करताना आवश्यक तेथे नवीन पारिभाषिक शब्द वापरले आहेत. या विवरणात नमुना उदाहरण पद्यात दिलेले असले तरी उदाहरण सोडविण्याची रीत देताना अंक आणि आकृत्या यांचा आधार घेतला आहे. शिवाय अनेक उदाहरणांमध्ये आलेल्या उत्तराचा पडताळाही घेतला आहे.

भारतीय गणितात अनियमित आकाराच्या चौकोनांच्या गुणधर्मांचा विचार सर्वप्रथम भास्कराचार्य – १ यांनी केला आहे. त्यांनी आर्यभटांची केवळ दोन पद्यांमध्ये सांगितलेली अनिश्चित समीकरणे सोडवण्याची रीत उदाहरणे आणि त्यांची उकल देऊन सुगम केली. वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे आर्यभटांनी दिलेले गुणोत्तर (π ची किंमत) योग्य असून ही किंमत दहाच्या वर्गमूळाइतकी मानण्याची त्याआधीची रीत चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले.

संदर्भ :

  • Shukla K.S. and Sarma K.V.(ed) Āryabhaṭīya, pt.II, with the commentary of Bhāskara I and Someśvara, Indian National Science Academy, New Delhi. १९७६
  • पंत, मा. भ. आणि नेने, य. रा., भास्कराचार्य, मराठी विश्वकोश, खंड १२, १९७६, पृष्ठ ४९७.
  • https:// britannica.com/biography/Bhaskara 1

  समीक्षक : विवेक पाटकर