गॅमॉव, जॉर्जी अँटनोव्हिच : (४ मार्च, १९०४ ते १९ ऑगस्ट, १९६८) जॉर्ज अँटनोव्हिच गॅमॉव यांचा जन्म पूर्वीच्या रशियन साम्राज्यातील (सध्या दक्षिण-मध्य युक्रेन) ओडेसा या समुद्रकिनाऱ्यावरील शहरात झाला. जॉर्ज यांनी आईकडून रशियन आणि फ्रेंच भाषेचे धडे घेतले. बालवयातच ते खाजगी शिक्षिकेकडून जर्मन शिकले. महाविद्यालयात आल्यावर ते इंग्रजी भाषा शिकले. त्यांचे सुरुवातीचे लिखाण जर्मन किंवा रशियन भाषेत आहे. नंतर मात्र ते इंग्रजीत लिहू लागले. जॉर्ज यांना वयाच्या तेराव्या वाढदिवशी वडलांनी एक दुर्बीण दिली होती. त्यामुळे त्यांना गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करून शास्त्रज्ञ व्हावे असे वाटू लागले.

जॉर्ज रशियातील ओडेसा येथे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन लेनिनग्राड विद्यापीठातून पदवीधर झाले. अलेक्झँडर फ़्राइडमन यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रबंध लिहू लागले होते. प्रबंध लिहिण्याच्या काळातच फ्राइडमन यांचा मृत्यू झाल्याने नव्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोपेनहेगनमध्ये पुढील संशोधन केले.  इन्स्टिटयूट ऑफ थिऑरेटिकल फिजिक्समध्ये अणुकेंद्रक विषयावर त्यानी रॉबर्ट ॲटकिन्सन आणि फ्रिट्झ हाउटरमन यांच्या बरोबर संशोधन केले. ताऱ्यांची उत्क्रांती, सूर्यमालेची उत्पत्ती, सूर्यमालेतील ग्रह निर्मिती, त्यांवरील मूलद्रव्यांची निर्मिती – अशा विषयांवर त्यांचे लेख गणिती विवरणासह नेचर आणि अन्य प्रतिष्ठित जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत.

पीएच्.डी.पर्यंतचे त्यांचे शिक्षण रशियात लेनिनग्राडमध्येच झाले. उन्हाळी सुट्टीतींल एका अभ्यास सत्रासाठी आणि पुढील शिक्षणसंधींचा शोध घेण्यासाठी ते जर्मनीतील गॉटिन्जेन विद्यापीठात आले. अर्नेस्ट रदरफर्डचे मार्गदर्शन घेण्यासाठी गॅमॉव इंग्लंडला केंब्रिज विद्यापीठात प्रतिष्ठित कॅव्हेन्डिश प्रयोगशाळेतही गेले. त्यांना केंब्रिज विद्यापीठाची रॉकफेलर छात्रवृत्ती मिळाली. अर्नेस्ट रदरफर्ड यांच्या बरोबर त्यानी एक वर्ष काम केले. अणुकेंद्रकातून अल्फाकण उत्सर्जित होतात आणि अणुकेंद्रकाचा ऱ्हास होतो. या अल्फा ऱ्हासाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण गॅमॉवनी दिले. त्यातील गणिती विवेचन निकोलाय कोचीन यांच्या मदतीने केले होते. नोबेल पारितोषिक विजेते अणुशास्त्रज्ञ, नील्स बोहरना भेटण्यास ते डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला गेले. चर्चेनंतर बोहरनी त्यांची गुणवत्ता जोखून गॅमॉवना युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगनच्या इन्स्टिटयूट ऑफ थिऑरेटिकल फिजिक्समध्ये एका वर्षाच्या रॉयल डॅनिश अकॅडमीच्या छात्रवृत्तीवर येण्याचे आमंत्रण दिले.

पुढे दोन वर्षे, गॅमॉवचे वास्तव्य पुन्हा रशियात होते. ते केवळ अठ्ठावीस वर्षाचे असताना त्यांची अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ द युएसएसआरचे संवादी (corresponding) सदस्य म्हणून निवड झाली. अल्पकाळ त्यांनी लेनिनग्राड विद्यापीठात प्राध्यापकपद भूषवले. तसेच लेनिनग्राडच्या रेडियम इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी काम केले. या कार्यानुभवाचा उपयोग करून त्यांनी रेडियम इन्स्टिट्यूटच्या अभ्यासमंडळाला सायक्लोट्रोन  निर्मितीचा आराखडा संमत करण्यासाठी बनवून दिला.

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये एका आंतरराष्ट्रीय विज्ञानपरिषदेत त्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या समर स्कूलमध्ये व्याख्यातापद स्वीकारण्याचे आमंत्रण मिळाले. तेव्हाच वॉशिंग्टन डी.सी. मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात प्राध्यापकपदी येण्यासंबंधी बोलणी झाली. नंतरची वीसेक वर्षे, ते जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात भौतिकीशास्त्र विभागात प्राध्यापकपदी कार्यरत राहिले. वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांनी लंडनमधील जुने सहकारी आणि मित्र एडवर्ड टेलर यांच्याबरोबर बीटा ऱ्हासाच्या सिद्धांतावर काम केले. तसेच बीटा उत्सर्जनाचा गॅमॉव – टेलर निवडीचा नियम सूत्रबद्ध केला. गॅमॉव यांनी  विश्वउत्पत्तीसंबंधीची महास्फोट उपपत्ती नव्या स्वरूपात मांडली. ती मुळात बेल्जिअन विश्वउत्पत्तीतज्ज्ञ, जॉजेस हेन्री लामॅतर आणि अलेक्झँडर फ़्राइडमन यांनी प्रस्तावित केली होती. नंतर आपला मोहरा जीवशास्त्राकडे वळवण्याआधी विश्वउत्पत्तीबद्दल त्यांनी वीस लेख प्रकाशित केले. त्यातील काहींचे सहलेखक, टेलर होते. गॅमॉव यांनी  केंद्रातील अणुइंधन संपलेल्या लाल राक्षसी महाकाय ताऱ्यांच्या अंतर्रचनेबद्दल उपपत्ती मांडली.

पुढे ते अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली, येथे अतिथी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांना रेण्वीय जीवशास्त्रात रस निर्माण झाला. जिवंत पेशीत माहिती कशी साठवली जाते, संक्रमित केली जाते याबद्दल त्यांनी शोधनिबंध प्रकाशित केले.  जनुकीय संकेत (genetic code) ही कल्पना त्यांनी  मांडली. प्रायोगिक आधार मिळाल्यावर ती सर्वमान्य झाली. जनुकीय संकेत तीन नायट्रोजनी आधारांच्या संचांत कोडॉन्स (triplets) रांगेत रचलेले असावेत हा गॅमॉवचा कयास कालांतराने अचूक ठरला. एकूण अमिनो आम्ले वीस असतात पण ती दर्शवणारे कोडॉन्स ६४ – म्हणजेच बहुसंख्य कोडॉन्स, अतिरिक्त असतात. त्याअर्थी  अमिनो आम्लेदर्शक सांकेतिक भाषा अचूक नसून अघळपघळ असते असे गॅमॉवनी सुचवले, ते खरे ठरले.

तसेच गॅमॉवनी एक तर्क प्रथमच मांडला. तो म्हणजे – आनुवंशिकी संकेत भाषेचा उपयोग करून पेशीकेंद्रकातील माहिती प्रतिलेखित (transcribe) केली जात असावी. डीएनएतून संदेशवाहक आरएनएच्या रूपात आणली जात असावी. हा तर्कही बरोबर ठरला. अशा प्रकारे अणुभौतिकीशास्त्राची पार्श्वभूमी असलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या या शास्त्रज्ञाने रेण्वीय जीवशास्त्रात अगदी मूलभूत स्वरूपाची भर घातली. नोबेल विजेते फ्रान्सिस क्रिक यांना गॅमॉवशी वेळोवेळी झालेल्या चर्चांचा जीवशास्त्रीय संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उपयोग झाला हे नमूद केले आहे. निरेनबर्ग आणि मथाई यांनी आनुवंशिकी संकेत भाषा संकल्पनेला अंतिम पूर्ण रूप दिले पण  गॅमॉव यांचा त्यात मोठा वाटा होता.

कोपनहेगनमधील कार्यकालात गॅमॉवनी अशी उपपत्ती मांडली की अणुकेंद्रके एक प्रकारच्या केंद्रक द्रवाच्या छोट्या थेंबांसारखी असतात. अशा विचारातूनच कालांतराने अणुकेंद्रकांचे संम्मीलन आणि विखंडन या संकल्पना पुढे आल्या, रुजल्या.

शेवटी, गॅमॉव कॉलोराडो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले ते आयुष्याच्या अखेरपर्यंत तेथेच राहिले. गॅमॉव यांची फिजिकल सायन्स स्टडी कमिटीचा संस्थापक सदस्य म्हणून नेमणूक झाली. रशियाने स्पुटनिक उडवण्याच्या काळात उत्तम विज्ञानशिक्षण फार आवश्यक आहे हे अमेरिकेत सरकारी पातळीवर प्रकर्षाने जाणवले. तेव्हा माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्र शिकवण्याची पातळी उंचावण्यात गॅमॉव यांनी मदत केली.

त्यांच्या विषयज्ञानाचा, भाषाकौशल्याचा जगभरातील प्रभाव ओळखून युनेस्कोने त्यांना कलिंग पुरस्कार बहाल केला.

गॅमॉव यांनी विविध प्रकारचे विपुल लिखाण केले आहे. वन, टू, थ्री, इन्फिनिटी हे कल्पनारम्य विज्ञान पुस्तक आणि ॲडव्हेंचर्स ऑफ मिस्टर टॉम्किन्स ही पुस्तकमालिका त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनीही नव्या आवृत्या काढाव्या लागतात एवढी लोकप्रिय आहेत. काही पुस्तकांत स्वत: गॅमॉवनी काढलेली चित्रे आहेत. माय वर्ल्ड लाईन हे आत्मचरित्र गॅमॉवनी लिहायला घेतले होते. ते त्यांच्या हयातीनंतर प्रकाशित झाले.

विज्ञान प्रसारासाठी त्यांनी  लिहिलेली पुस्तके अभ्यासक्रमासाठी, किंवा अतिरिक्त वाचन म्हणून आजही वापरात आहेत. गॅमॉवना माहीत होते की विज्ञान, तंत्रज्ञान झपाट्याने वाढत, बदलत असले तरी त्यातील मूलभूत तत्वे शाश्वत असतात. त्यामुळे ती वाचकमनावर बिंबवली पाहिजेत.

साधारण १९३१ ते १९६१ या तीस वर्षात द कॉन्स्टिट्युशन ऑफ ॲटॉमिक न्युक्लीआय अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी; द स्ट्रक्चर ऑफ ॲटॉमिक न्युक्लीआय अँड न्युक्लीअर ट्रान्सफॉर्मेशन; ॲटॉमिक एनर्जी इन कॉस्मिक अँड ह्युमन लाईफ; द क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स, फिजिक्स फाउंडेशन्स अँड फ्रॉन्टिअर्स; द ॲटम अँड इट्स न्युक्लीअस ही त्यांनी एकट्याने लिहिली. थियरी ऑफ ॲटॉमिक न्युक्लीअस अँड न्युक्लीअर एनर्जी; मॅटर, अर्थ अँड स्काय  ही दोन पुस्तके अन्य एकेका सहलेखकाबरोबर लिहिली आहेत. रिचर्ड ब्लेड यांच्याबरोबर, गॅमॉवनी बेसिक थियरीज इन मॉडर्न फिजिक्स हे पाठ्यपुस्तक लिहायला घेतले होते. दुर्दैवाने ते पूर्ण होण्याआधीच गॅमॉव निवर्तले.

गॅमॉव यांचे अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील बोल्डर येथे मधुमेह आणि यकृत बिघाडानंतर निधन झाले.

त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कॉलोराडो विद्यापीठाच्या भौतिक विज्ञान विभागातर्फे जॉर्ज गॅमॉव व्याख्यानमाला आयोजित केली जाते.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा