ब्रेल, ल्वी : (४ जानेवारी १८०९–६ जानेवारी किंवा २८ मार्च १८५२). फ्रेंच अंधशिक्षक व विख्यात ब्रेल लिपीचा जनक. त्यांचा जन्म पॅरिसजवळील कूपर्व्हे येथे झाला. ते तीन वर्षांचे असतानाच वडिलांच्या वर्कशॉपमध्ये खेळत असताना तीक्ष्ण हत्यार लागून त्यांच्या डोळ्यांस दुखापत झाली व त्यांना अंधत्व आले. त्यांची संपूर्ण दृष्टी गेली. अंध असूनही शिक्षकांनी शिकविलेले ज्ञान केवळ श्रवण करून व त्यावर सतत चिंतन करून त्यांनी इतर मुलांबरोबरच आपल्या जन्मगावी शिक्षण घेतले. ते प्रथम क्रमांकाने पास होत असे. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर १८१९ मध्ये पॅरिसमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ब्लाइंड चिल्ड्रेन’ या संस्थेत ते उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. १८२६ पासून त्याच संस्थेत त्यांनी अध्यापक म्हणून काम केले. त्यांनी संगीतामध्ये विशेष प्राविण्य संपादन केले होते. ते स्वत: पियानो (Piano), ऑर्गन (Organ) व चेलो (cello) या वाद्यांचा उत्तम वादक होता.
ब्रेल हे स्वत: अंध असल्याने अंधांमध्ये स्पर्शज्ञान अतिशय तीव्र असते, याची जाणीव त्यांना होती. ते पॅरिस येथे असताना फ्रेंच लष्करातील अधिकारी कॅप्टन चार्ल्स बार्बर हे उठावदार टिंबे व रेघा यांच्या आधारे रणांगणावरील संदेशवहनासाठी त्यांनी तयार केलेल्या लेखनपद्धतीचे प्रशिक्षण सैनिकांना देण्यासाठी तेथे आले होते. त्यांच्या लेखनपद्धतीमध्ये शब्दांचा आवाज स्पेलिंगशिवाय ओळखला जात असे. ब्रेल यांनी स्वत: या लेखनपद्धतीचा विशेष अभ्यास केला व तिचेच परिष्करण करून त्यांनी स्वत:ची लिपी तयार केली. तीच पुढे ब्रेल लिपी (Braille Lipi) म्हणून विख्यात झाली. आधुनिक युगात ही लिपी अंधांना खूपच वरदान ठरली; कारण संगीत, गणित, संगणक कार्यक्रम इत्यादींमुळे वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे या लिपीचा वापर केला जातो. ब्रेल यांच्या या लिपी शोधामुळे अंधांना पुस्तकांचे मुद्रितविश्व खुले झाले, तसेच त्यांचे आयुष्यही प्रकाशमय झाले, असे म्हटले जाते.
ब्रेल यांचे पॅरिस येथे क्षयाच्या विकाराने निधन झाले. निधनानंतर त्यांच्या लिपीचा खूप प्रसार झाला. जगातील काही प्रमुख व्यक्तींनी त्यांच्या लेखनपद्धतीचा खूप विकास केला. त्यामुळे जगातील सर्व भाषांमध्ये त्यांच्या या क्रांतिकारक लिपीचा वापर केला जातो.
समीक्षक – संतोष गेडाम