एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे म्हणता येईल. इस्लामधर्मीय सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त जो उत्सव होतो, त्यास उरूस वा जुलूस म्हणतात. त्या त्या देवतेविषयी किंवा तीर्थक्षेत्रांतील एक वा अनेक देवतांविषयी पूज्यभाव वा सत्पुरुषाविषयी आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी भाविक लोक जत्रेला येतात. देवता वा सत्पुरुष यांच्या आराधनेकरीता तेथे स्नान, दर्शन, पूजाअर्चा, श्राद्ध, भजन, किर्तन, क्रीडा, नृत्य, मेळा, मिरवणूक, शर्यती, भोजन इत्यादी सत्कर्मे केली जातात.

भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे. जत्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून या लोकप्रिय संस्कृतीची लोकप्रियता आपल्याला महाराष्ट्रातील घराघरांत भिंतीवर टांगून ठेवलेल्या दिनदर्शिकेवरील गावोगावच्या जत्रेविषयक दिलेल्या माहितीवरून लक्षात येते. जत्रा हे सामाजिक-सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्त्वाचे स्रोत आहे. वेगवेगळ्या कबरी, समाधी, मठ, शिलालेख, जुने मंदीर, संगम, राजाचे थडगे अशा  स्थानांजवळ जत्रा भरविली जाते. खासकरून या जत्रा सत्पुरुषांची जयंती, पुण्यतिथी, कार्तिक वद्य एकादशी, महाशिवरात्री, पौर्णिमा, चैत्रपौर्णिमा, गणेशचतुर्थी इत्यादी निमित्ताने भरतात. साधारणत: जत्रांचा कालावधी दोन दिवसांपासून ते पंधरा दिवसांपर्यंत असतो. गावजत्राची संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक व्यवहार असून ती महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळून येते. भारतीय समाजाच्या दैनंदिन जीवनात या जत्रांचे सांस्कृतिक व्यवहारात महत्त्वाचे स्थान आहे.

जत्रेच्या काळात त्या त्या देवतेचे विशेष पूजोपचार होतात. त्यांत देवतेची रथात बसवून वा पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. प्रथा असेल, तर त्या देवतेचा विवाहसमारंभही जत्रेच्या काळात सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा होतो. जत्रा हा प्रामुख्याने देवतेचा वा सत्पुरुषाचा धार्मिक उत्सव असल्यामुळे त्यात भाविकांनी त्या देवतेचे दर्शन घेणे, पूजोपचार करणे, नवस करणे वा फेडणे, प्रसादग्रहण करणे इत्यादी गोष्टींना विशेष महत्त्व आहे. नवस फेडताना त्या त्या देवतेच्या सात्विक वा तामस प्रकृतीनुसार तसेच रूढ संकेतानुसार साखर, गूळ, खोबरे, मिठाई इत्यादी वाटणे; नारळ, खण, पूजाद्रव्ये, पशु-पक्ष्यांचे बळी अर्पण करणे; बगाडादी आत्मक्लेशकारक प्रकार करणे, मद्य, तांदळाची दारू अर्पण करणे इत्यादी प्रकारे भाविक लोक देवतेस संतुष्ट करतात. बंगालमध्ये नवरात्रात कालीस पशुबली देण्याची चाल आहे. महाराष्ट्रातही कही देवींपुढे बोकड, कोंबडे इत्यादींचा बली देण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतातही पोलेरम्म देवीची जत्रा महत्त्वाची असून तिला रेड्याचा बली देतात. पंढरपूरच्या विठोबाची यात्रा आषाढी व कार्तिकी एकादशीस मोठ्या प्रमाणावर भरते. सर्व महाराष्ट्रातून तसेच इतरही राज्यांतून दिंड्यासोबत वारकरी, भजनी मंडळी पायी चालत वा वाहनात बसून या जत्रेस येतात. यास ‘वारी’ म्हणतात. मरीआईच्या जत्रे वेळी अहीर व्यापारी आपली दुकाने सजवतात. जत्रेच्या दिवशी परधान (मुख्य) पुरुष व स्त्रिया जत्रेतील बाजारात नटूनथटून फिरत असतात. जत्रेच्या निमित्ताने त्या आपल्या नवऱ्याकडून नवे कपडे व मण्यांच्या माळा मिळवितात. या वेळी पुरुषाची जुनी प्रियसी त्याच्याकडे येऊन काही बक्षिस मागते आणि त्याने ते दिले नाही, तर त्याचे धोतर ओढण्याची किंवा त्याला अपशब्द बोलण्याची प्रथा आढळून येते. ओरीसात पुरी येथेही जगन्नाथाची मोठी रथयात्रा होते व तेथे सर्व भारतातून लोक जमतात. हरीद्वार, प्रयाग (अलाहाबाद), उज्जैन व नासिक येथे दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा किंवा दर सहा महिन्यांनी भरणारा अर्धकुंभमेळा याही भारतातील विशेष महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर लोकसमुदाय जमणाऱ्या जत्राच होत. लक्षावधी लोक या कुंभमेळ्याला जमतात व पवित्र तीर्थात स्नान करतात. कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारक मानले जात असल्यामुळे त्याला हिंदूच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.

जत्रेच्या या प्रधान धार्मिक अंगासोबतच तिला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशीही अंगे आहेत. जत्रेत आजूबाजूच्या खेडोपाडी तयार होणाऱ्या वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होऊन, त्यांवर खेड्यांतील कारागिरांचा चरितार्थ चालतो. जत्रेत आबाल-वृद्ध, स्त्रीपुरुष सणाप्रमाणे यथाशक्ती वेशभूषा करून मोठ्या सख्येने सहभागी होऊन सामाजिक जीवनाचा उत्साहपूर्ण अनुभव घेतात. प्राचीन काळी दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे जत्रांमधून त्या त्या परिसरात तयार होणाऱ्या वस्तूंना व मालाला चांगलीच मागणी असे. म्हणूनच जत्रेलाही एक उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून महत्त्व होते आणि आजही काही प्रमाणात ते आहे. कापड, भांडीकुंडी, खाद्यपदार्थ, मिठाई, बैलगाड्या व दमण्या, जनावरे, खेळणी इत्यादी वस्तूंचा व्यापार जत्रांमधून विशेष प्रमाणावर चालतो. महाराष्ट्रातील काही जत्रा तर विशिष्ट जनावरांच्या व्यापारांसाठीच प्रसिद्ध आहेत. उदा., नगर जिल्ह्यातील कानिफनाथाची जत्रा गाढवांच्या व खेचरांच्या व्यापारासाठी, तर नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील खंडोबाची जत्रा घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या जत्रेला खंडोबाची जत्रा म्हणण्याऐवजी लोक ‘घोड्यांची जत्रा’ म्हणूनच ओळखतात.

जत्रांतून तमाशा, दशावतारी नाटके, कुस्त्यांचे फड, बैलगाड्यांच्या शर्यती, सर्कस, चित्रपट, आकाशपाळणे, फिरते लाकडी घोडे, जादूचे खेळ इत्यादी करमणुकीच्या कार्यक्रमांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. जत्रेमध्ये विविधवस्तू तथा पशूधनाची खरेदी-विक्री, जात पंचायतीच्या बैठका, राजकीय व्यवहार, कीर्तन, भजन, प्रवचन इत्यादी असतात. विविध स्तरांतील लोक एकत्र जमल्यामुळे त्यांच्यात होणारी विचारांची व कल्पनांची देवाणघेवाण यांमुळे त्यांचे सांस्कृतिक उद्बोधनही जत्रेत होते व सामाजिक एकात्मता दृढ होण्यास मदत होते. वर्षभर भटकणाऱ्या जमातींसाठी जत्रा हे एकत्र भेटण्याचे महत्त्वाचे ठिकाण असते. यानिमित्ताने वर्षानंतर ते एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने नवे नातेसंबंध जोडण्यासाठी जत्रा हे एक महत्त्वाचे स्थळ असते. तसेच नातेवाईकसुद्धा जत्रेला एकत्र जमतात आणि त्यानिमित्ताने आपापल्या मुलामुलींचे सोयरिक जुळवीत असतात. त्यामुळे जत्रा हे विविध व्यवहारासाठींचे असे मिश्र ठिकाण ठरते.

वेळेनुसार आणि अवकाशानुसार जत्रेचे वर्गीकरण केले जाऊ शकते. काही जत्रा या काही काळापुरत्याच विशिष्ट प्रदेशासाठी मर्यादित असतात, तर काही जत्रा देशभर पसरलेल्या असतात व त्यांना कोणत्याही प्रदेशाचे बंधन नसते. जत्रा या शहरी तसेच ग्रामीण असू शकतात. जत्रांची वर्गवारी काळ, प्रदेश आणि भौगोलिकतेनुसार करता येते; परंतु गावजत्रा या ग्राम दैवतांशी संबंधित असतात. काही ठिकाणी सत्पुरुष, देवी-देवता व बाबा महाराज इत्यादींच्या भोवती गावजत्रा भरत असतात. गावजत्रांचा अभ्यास समाजशास्त्रात फारसा झालेला नाही. मानवशास्त्रज्ञांनी गावजत्रांबाबत काही वर्णने त्रोटक प्रमाणात केली आहेत. दुसऱ्या बाजूने भारतीय समाजशास्त्राने भारतीय समाजाचा अभ्यास परंपरा आणि आधुनिकता या द्वैती पद्धतीने केलेला आहे. याचाच अर्थ, दैनंदिन ग्रामीण जीवनातील व्यवहारांचा अभ्यास संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनातून केलेला आहे. ‘ग्रामीण समाजशास्त्र’ या उपशाखेतसुध्दा गावजत्रा हे लोकप्रिय संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून त्याकडे बघितले गेले नाही.

वसाहतकालीन गावजत्रा : ब्रिटिशकालीन दस्तावेजांमध्ये आणि जिल्हा गॅझेटिअरमधून धार्मिक मेळावा, अनेक धर्माच्या लोकांचा मेळावा, वेगवेगळ्या समुदायांचा सांस्कृतिक व्यवहार आणि आर्थिक बाजार हे गावजत्रांकडे पाहण्याचे तीन दृष्टिकोन समोर येतात. अशा प्रकारे जत्रा ही एक धार्मिक बाब म्हणून अथवा सांस्कृतिक व्यवहार म्हणून ज्या नोंदी या दस्तावेजांमध्ये केलेल्या आहेत, त्या वर्णनात्मक स्वरूपाच्या नोंदी आहेत. जत्रेत होणारे धार्मिक विधी, पूजा, नवस, कौल, पशूबळी, दैवते व त्यांचे स्वभाव व नैवेद्यांचे प्रकार, उपासना पद्धती, मनोरंजन, खेळ आदी रूढी संकेतांची वर्णने या दस्तावेजांमध्ये पाहायला मिळतात. तसेच जत्रेत होणाऱ्या जनावरे, अन्नधान्य इत्यदी वस्तुविनिमयाच्याही वर्णनात्मक नोंदी दिसून येतात.

समाजशास्त्रीय अभ्यास : सोन्थायमर गुंथर यांनी महाराष्ट्रातील खंडोबाच्या जत्रेचा प्राच्यविद्याशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अंगांनी केलेला अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या मते, ‘फोक रिलिजन’ ही एक प्रकारे धार्मिक जाणिवेची संरचना असते. जी प्रत्यक्ष अनुभवातून ओळखता येते. विशेषतः जत्रा ही समाजातील विविध समुदाय आणि व्यक्तींना त्यांची स्व:ची समज वा दृष्टी आणि सामाजिक पार्श्वभूमीची देवाण-घेवाण विधीद्वारे नोंदविण्याची एक जागा वा स्थळ असते. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ११,४२५ जत्रा भरतात. जत्रा हा शब्द उत्सव या शब्दाचा समानार्थी आहे. जत्रा ब्राह्मणी कालक्रमानुसार न भरता त्या हंगामानुसार आणि शेतीच्या चक्रानुसार भरतात. जत्रा भरण्याची तारीख कौल घेऊन ठरविली जाते, असे म्हणतात. जत्रा या बहुतांश वेळा पुनरुत्पादन आणि जीवन यांच्याशी संबंधित असतात. शेतकी चक्र आणि मानवी विकास यांचा प्रवाह जत्रेमुळे चालू असल्याचे प्रतीक मानले जाते. शिवाय ते पुढेही चालू कशा राहील, याचे भाकित जत्रेच्या शेवटी भक्ताच्या अंगात देव येऊन त्यांच्या तोंडून वर्तविलेल्या युद्ध, शेती, पाऊस इत्यादींच्या भविष्याने जत्रेची सांगता होते.

तत्कालीन वसाहतिक दस्तावेजांमध्ये जत्रांकडे धार्मिक मेळावे अथवा सांस्कृतिक व्यवहार म्हणून पाहिले गेले असले, तरी सोन्थायमर यांनी जत्रांचे त्याहून अधिक सखोल विश्लेषण केले आहे. ते जत्रा व लोकधर्म यांत सूक्ष्म भेद करतात. त्यांच्या मते, ‘जत्रेत देव आणि भक्त हे एकाच पातळीवर येऊन सामुदायिक आराधनेत सहभागी होतात; तर लोकधर्मात मात्र व्यक्तीचे अमूर्तीकरण होऊन आराधनेचे स्वरूप हे व्यक्तिगत  मुक्तीपुरतेच मर्यादित होते’. सोन्थायमर यांच्या अभ्यासात सहभागी भक्तगण वाघ्या-मुरळी यांच्याकडून करमणूक, लैंगिक सेवा, लाठीकाठी आणि बैलगाड्यांच्या शर्यती यांसारखे खेळ आणि बहुतांश लोक धार्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी जत्रेला येतात. त्यांनी आपल्या अभ्यासातून भक्तगण मृत्यू, धोका आणि आजार यांच्यापासून वाचण्यासाठी जत्रेमध्ये सहभागी होतात, जत्रेत देवतेची उपासना करतात आणि आपल्या मंगल भविष्याची मागणी करतात असे मत मांडले आहे. ते जत्रांकडे सामाजिक पार्श्वभूमीच्या देवाण-घेवाणीचे स्थळ म्हणून पाहतात.

जत्रा या सांस्कृतिक व्यवहाराबद्दल लोकांची समज काय आहे, हे समजून घेणे या पातळीवर खूपच कमी अभ्यास झालेला आहे. जत्रेत सहभागी लोकांचा जत्रेविषयी मत हा मुद्दा खूप कमी अभ्यासकांनी विचारात घेतला आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालांमध्ये जत्रेचा एक बाजारपेठ म्हणून मर्यादितच विचार केल्यामुळे त्यांच्या अहवालातील नोंदींमध्ये आर्थिक व्यवहार आणि काही सांस्कृतिक वैशिष्ट्यांबाबत त्रोटक उल्लेख आढळून येते. शिवाय त्यांनी जत्रेतील अंधश्रद्धांवर भर देऊन स्थानिक तत्कालीन भारतीय लोकांचे गूढ, धार्मिक परंपरा यांचे आकर्षण जास्त अधोरेखित केल्याचे दिसते. इंग्रजांच्या मते, ‘लोक फक्त धार्मिक विधींसाठी आणि व्यापारी उलाढालींसाठी जत्रेस येतात’. ब्रिटिशांनी गावजत्रांमधून कोणत्या जातवर्गांच्या सांस्कृतिक व्यवहारांची अधिसत्ता उत्पादित आणि पुनरुत्पादित केली जाते, या मुद्द्यांवर कोणताही प्रकाश टाकलेला नाही. किंबहुना तत्कालीन भारतीय समाज हा एकसंध मागासलेला होता, असे त्यांनी मत नोंदवल्याचे दिसून येते. सोन्थायमर यांनी खंडोबाच्या जत्रेत समाजातील सर्वच समाजस्तर जाती-धर्म-वर्ग बाजूला ठेऊन सर्वजण एकाच पातळीवर येतात, असे आकलन मांडले आहे. सर्व जत्रांविषयीच्या वसाहतकालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नोंदींचा, अहवालांचा आढावा घेतल्यास सर्वसाधारण त्या धार्मिक मेळावा, आर्थिक मेळावा व बाजारपेठ-व्यापार केंद्र आणि सांस्कृतिक मेळावा, मनोरंजन व क्रीडा या स्वरूपात जत्रेकडे पाहिले गेले आहे. आनंद पाटील यांच्या मते, ‘जत्रेच्या निमित्ताने लोक कलाकारांना घरी बोलावून त्यांच्याकडून लोककलांचे सादरीकरण करून घेतले जाते. या प्रसंगी आप्त-इष्टांनाही बोलावणे असते व तेही आनंदात सहभागी होतात’. त्यांनी जत्रेतील प्रसंगांना भावनांच्या पातळीवर पाहतात; मात्र ते त्यातील अशा प्रसंगांचा होत असलेला उपभोग व त्यांतून जात, लिंगभाव रचनांची होणारी पायाभरणी आणि पुनरुत्पादन लक्षात घेत नाहीत.

हिंदू व्यक्तिने जसे आयुष्यात एकदा तरी काशीची यात्रा करावी असे म्हटले जाते, तसेच प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने मक्केची हाज (हज) यात्रा करावी असे म्हटले जाते. जगातील सर्वच इस्लाम धर्मीय लोक जमेल तेव्हा हजची यात्रा करण्यात कृतकृत्यता मानतात. याशिवाय मदीना व करबला येथील यात्रांनाही इस्लाम धर्मात महत्त्व आहे. अजमीर येथील चिश्ती ख्वाजा मुइनुद्दीन यांच्या प्रसिद्ध उरूसास भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील मुस्लिम मोठ्या संख्येने येतात. दिल्ली येथील निजामुद्दील औलियाचा उरूसही प्रख्यात आहे. बहुतेक उरूसांत मुस्लिमांप्रमाणेच हिंदू धर्माचे लोकही मोठ्या संख्येने भाग घेतात. शीख धर्मात शीख गुरूंची जन्म व निधनस्थाने पवित्र मानली जातात व तेथे शीख धर्माचे लोक ठराविक दिवशी एकत्र जमतात. अमृतसर, नांदेड, आनंदपूर (पंजाब), पाटणा (बिहार) इत्यादी ठिकाणचे गुरुद्वारा त्यांची पवित्र तीर्थस्थाने होत. ख्रिस्ती व ज्यू या धर्मांत जेरूसलेमला आगळे महत्त्व आहे. जेरूसलेमची यात्रा करणे, हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे धार्मिक कर्तव्य मानले जाते. ख्रिस्ती धर्मात बेथलीएम, नाजरेथ, रोम इत्यादी पवित्र स्थानांच्या यात्रांनाही महत्त्व आहे. बौद्ध धर्मात लुंबिनी, बोधगया (गया), सारनाथ, कुशिनगर इत्यादी ठिकाणच्या यात्रा करणे विहित मानले जाते. जैन धर्मात तीर्थकरांचा जन्म, निष्क्रमण, ज्ञान, निर्वाणादी स्थाने तसेच संमेदशिखर, मंदारगिरी, गिरनार, पावापुरी इत्यादी सिद्ध क्षेत्रे आणि अब्रू, शत्रुंजय पर्वत, श्रवणबेळगोळ, चंपापूर इत्यादी पवित्र ठिकाणच्या यात्रा करणे श्रेयस्कर मानले आहे. आदिवासी लोकांतही त्यांच्या देवांच्या तसेच आदिपुरुषांच्या जयंति-पुण्यतिथीनिमित्त यात्रा भरतात. उदा., कचारगड यात्रा (मध्य प्रदेश).

जगातील सर्वच धर्म, पंथ, जाती, जमातींत काही ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी एकत्र जमून त्या देवतेविषयीचा, सत्पुरुषाविषयीचा, नदी, तलाव इत्यादी जलाशयाविषयीचा वा पर्वत, ग्राम तसेच अवतारी पुरुषांच्या समाधी, जन्म-मृत्यू इत्यादिकांच्या स्थानांविषयीचा आपला आदरभाव व्यक्त करण्याची प्रवृत्ती आढळते आणि म्हणूनच जत्रा वा यात्रा या सर्वच धर्मांत व समाजांत आढळतात. या जत्रांच्या स्वरूपात, कर्मकांडात व जमणाऱ्या लोकसमुदायांच्या लहानमोठ्या संख्यामानात फरक पडणे स्वाभाविक आहे.

भारतातील बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर व द्वारका ही चार धामे काशी, प्रयाग व गया ही त्रिस्थळी अयोध्या, मथुरा माया इत्यादी सप्तपुऱ्या बारा ज्योतिर्लिंगे बावन्न शक्तिपीठे तसेच नेपाळातील पशुपतिनाथ दक्षिणेतील कांचीपुरम्, पक्षितीर्थ, तिरुपती, उत्तर भारतातील हरद्वार, हृषीकेश, वृंदावन, पुष्कर इत्यादी पवित्र स्थाने होत. त्या ठिकाणी यात्रा करणे हिंदू धर्मात विशेष पुण्यप्रद मानले जाते.

जत्रेचे बदलते स्वरूप : जत्रा हा विषय समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आजही महत्त्वाचा आहे. सांस्कृतिक व सामाजिक इतिहास समजून घेण्यासाठी जत्रा हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. जत्रांचा एक ऐतिहासिक प्रवास लक्षात घेतल्यास भारतातील आणि जागतीक भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील बदलांसोबतच जत्रांमधील बदल अगदी जत्रा भरण्याच्या कालावधीपासून ते त्यामधील विक्री होत असलेल्या वस्तू आणि सेवा यांच्यातील बदल अगदी स्पष्टपणे दिसून येतो. या बदलांमधून पारंपरिक व्यवसाय, कौशल्ये मोडित निघाल्याचे आपल्याला दिसते. तसेच नवे व्यवसाय व कौशल्ये उदयाला आल्याचेही दिसते. आज जत्रा राजकीय व्यवहारांचे, जाती, जमाती यांच्या मेळाव्यांचे ठिकाण बनत आहे. गावजत्रेतील पारंपरिक मनोरंजनाचे प्रकार, वस्तू, खानपान, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक व्यवहार मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. नव्या आधुनिक व्यवसायांनी नव्या प्रकारच्या अदृश विषमतांना जन्म दिल्याचेही आढळून येते. जत्रा हे एकाच वेळी आनंद उपभोगण्याचे ठिकाण असले, तरी ते त्याच वेळी सामजिक विषमता आणि धार्मिक विचार पुनरुत्पादन करणारे क्षेत्र ठरते. वासाहतिक काळापर्यंत जत्रा हे एक वार्षिक प्रसंग वा कार्यक्रम होता; मात्र आता त्याला वेगवेगळ्या नवीन कार्यक्रमांतून एक कायम स्वरूप येतांना दिसते.

भारतातील प्रत्येक प्रांतात हजारो जत्रा वर्षभर वेगवेगळ्या स्थळी भरत असतात. महाराष्ट्रातही लहानमोठ्या हजारो जत्रा दरवर्षी भरतात. त्यांतील काही महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमणाऱ्या जत्रांची गावे, नावे व जिल्हे (कंसात) पुढीलप्रमाणे : श्री विठोबा (पंढरपूर–सोलापूर), श्रीज्ञानेश्वर (आळंदी–पुणे), श्री तुकाराम महाराज (देहू–पुणे), श्री खंडोबा (जेजुरी–पुणे), श्री जोतिबा (वाडी रत्नागिरी–कोल्हपूर), श्री तुळजाभवानी (तुळजापूर–उस्मानाबाद), हाजीमलंग उरूस (वाडी–ठाणे), बाबा दिवाणसाहेब उरूस (भिवंडी–ठाणे), श्री अंबरेश्वर (अंबरनाथ–ठाणे), श्री महालक्ष्मी (महालक्ष्मी–मुंबई), श्री विठोबा (वडाळा–मुंबई), हजरत मख्दुम फकीह अलीसाहेब उरूस (माहीम–मुंबई), माऊंट मेरी (वांद्रे–मुंबई), श्री सप्तशृंगीदेवी (सप्तशृंगगड–नासिक), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (त्र्यंबकेश्वर–नासिक), श्रीरामनवमी व रथोत्सव (नासिक), श्री कालिकादेवी (तळोदा–धुळे), श्री मुक्ताबाई (कोथली–जळगाव), श्री साईबाबा (शिर्डी–नगर), श्री कानिफनाथ (मढ–नगर), श्री सोमेश्वर (करंजा–पुणे), श्री नाथ म्हस्कोबा महाराज (वीर–पुणे), श्री काळुबाई (मांढरदेव–सातारा), श्री शंभुमहादेव (शिंगणापूर–सातारा), श्री खंडोबा (पाली–सातारा), श्री सिद्धनाथ (खरसुंडी–सांगली), श्री यल्लमादेवी (जत–सांगली), संत नाथ (वैराग–सोलापूर), श्री नागनाथ (मोहोळ–सोलापूर), श्री गद्दा (सोलापूर), श्री नाथ षष्टी (पैठण–औरंगाबाद), श्री नागनाथ (औंढा–परभणी), शाह तुराब उल् हक उरूस (परभणी), श्री परळी वैजनाथ (परळी–बीड), श्री दत्तजन्म (माहूर–नांदेड), श्री खंडोबा (मालेगाव–नांदेड), श्री महासिद्ध बाबा (धानोरा–बुलढाणा), श्री बालाजी (देऊळगाव राजा–बुलढाणा), श्री सखाराम महाराज (लोणी–अकोला), श्री बहिरम (कारंजा–बहेरम–अमरावती), श्री महादेव (सालवर्डी–अमरावती), श्री विठ्ठल–रुक्मिणी (कौंडिण्यपूर–अमरावती), श्री रंगनाथस्वामी (वणी–यवतमाळ), श्री अंबादेवी (केळापूर–यवतमाळ), श्री नानाजीमहाराज (कापसी–वर्धा), श्रीराम (रामटेक–नागपूर) यांव्यतिरिक्त भैरवजत्रा, भैरवीजत्रा, पर्जन्योत्सव, गायजत्रा, इंद्रजत्रा, कुमारीजत्रा, मच्छिंद्रजत्रा, नारायणजत्रा, गणेशजत्रा इत्यादी जत्रा आहेत.

बहुतांश अभ्यासकांनी जत्रा या सामाजिक व सांस्कृतिक व्यवहारांकडे वेगवेगळ्या भूमिकेतून एकाच तथ्याकडे जास्त लक्ष देत आपले जत्रेविषयीचे विश्लेषण केले आहे. उदा., जत्रेकडे काहींनी सर्कस, करमणूक व उपजीविका; काहींनी अविवेकी व थरारक; काहींनी कृषी संस्कृतीतील माणसांच्या मनाचे अन्न, अब्राह्मणी परंपरेने दिलेली सामाजिक समता, एकता आणि त्यातून ब्राह्मणी सत्तांना मिळालेले आव्हान अशा विविध दृष्टीने बघितलेले दिसते. थोडक्यात, संस्कृतीची भौतिकता, प्रतीकात्मकता, राष्ट्रीयता, धर्म, कायदा आणि सत्ता यांची गुंतागुंत जत्रा या प्रतलावर दिसते.

संदर्भ :

  • १. केतकर, श्री. व्यं., महाराष्ट्रीय ज्ञानकोश, खंड १६, १७, १८, १९, २०, २१, १९१६ ते १९२६.
  • जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृती कोश, खंड,,,, पुणे, २००५.
  • महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती, नंदादिप, मुंबई, १९४२.
  • Appadurai, Arjun, Public Culture, New Delhi, 2003.
  • Government of India, Census of India, 1861, Vol. X, Part VII-B, Fairs and Festivals of Maharashtra, Delhi, 1969.
  • Palshikar, Sanjay, Inhabiting Times and Producing Space, 2006.
  • Vora, R.; Feldhaus, A., Region, Culture, and Politics in India, 2006.
  • Sontheimer, Guntherdietz, The Folk Festival (Jatra) in the Religious traditions of Maharashtra : The case of khandoba, New Delhi, 1995.
  • Sontheimer, Guntherdietz, Folk Culture, Folk religion and oral Traditions as component in Maharashtra culture, New Delhi, 1995.

समीक्षक : प्रियदर्शन भवरे