महालक्ष्मी यात्रा पणज : जेष्ठागौरी मंदिर पणज महाराष्ट्रातील धार्मिक परंपरेत शिव-पार्वती यांची पूजा अनेक वर्षापासून केली जात आहे. पार्वती हीच जेष्ठा गौरी म्हणून लोकांच्या मनात रूढ आहे. त्यामधून जेष्ठागौरी व कनिष्ठा गौरी यांची पूजा उगम पावली आहे. भारतीय लोकजीवनात मातृसत्ताक व पितृसत्ताक अशा दोन्ही संस्कृतीचा समन्वय साधला गेला आहे. मात्र प्राचीन भारतीय लोकजीवनानुसार भारतातील मूळ संस्कृती मातृसत्ताक होती ही बाब लक्षात येते. अकोट तालुक्यामधील पणज गावातील स्त्री-स्वरूपातील महालक्ष्मी ‘जेष्ठागौरी व कनिष्ठा गौरी’ यांची पूजा भक्तिभावाने केली जाते. पार्वती, अंबा, लक्ष्मी, दुर्गा, ईनामाय यांच्या पूजा वेगवेगळ्या अनुषंगाने लोकमानसाने केल्या आहेत. श्रावण-भाद्रपद महिन्यातील जेष्ठागौरी ही महालक्ष्मी नावाने पूजली जाते. महाराष्ट्रातील अनेक गावात महालक्ष्मीची पूजा केली जाते. तीन दिवस हा पूजन सोहळा बहुतेक गावात साजरा होतो. जेष्ठागौरी अनुराधा नक्षत्रात आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन त्यानंतर मूळ नक्षत्रात विसर्जन केल्या जाते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज हे गाव याला अपवाद आहे. पणजला जेष्ठागौरीचे कायम स्वरूपी मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिराचे वैशिष्ट असे की येथे देवीचे मुखवटे हे ओबड धोबड असून  दगडांचे आहेत. यासंदर्भात धनरूपी महालक्ष्मीची एक आखायिका सांगितली जाते. करडे सरदाराने नदीच्या काठावर मंदिर बांधून येथे महालक्ष्मीची स्थापना केली. हे मंदिर दगडी असून मंदिराच्या समोर दीपमाळ आहे. तेव्हा पासून पणज या गावाला महालक्ष्मीचे माहेर मानले जाते. सध्या या मंदिराचे पूजेचे व दिवाबत्तीचे काम वंश परंपरेने चालत आले आहे. त्यांची राऊत घराण्याची परंपरा – घटूजी – संपत – गणपत – शाहादेव – शंकर अशी पाचवी पिढी मंदिर व्यावस्थापनाचे कार्य करीत आहे. पणज गावातील जेष्ठागौरीची म्हणजेच  महालक्ष्मीची यात्रा भाद्रपद अष्टमीच्या दिवशी भरते. यात्रौत्सव तीन दिवस चालतो. नवमीच्या दिवशी जेवण दिले जाते. पूर्वी मंदिराजवळील विहिरीमधून स्वयंपाकासाठी भांडी निघत असत असा लोकसमज आहे. गौरीच्या उत्सवात लोकवर्गणी करून गावजेवण भंडारा केला जातो.

संदर्भ : गाडगीळ, स.रा., लोकायत, लोकवाङमयगृह प्रा.लि., मुंबई, १९८४.