जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळालेल्या भीमबेटका गुंफा व शैलाश्रय हे विविध प्रकारच्या चित्रांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भीमबेटका हे पुरास्थळ मध्यप्रदेशात भोपाळपासून ४५ किमी. अंतरावर आहे. भीमबेटका येथील चित्रे अनेक कालखंडांतील आहेत. चित्रांच्या संदर्भात सर्वांत प्राचीन कालखंड (कालखंड-१) उत्तर पुराश्मयुगीन आहे. कालखंड-२ व कालखंड-३ अनुक्रमे मध्याश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन आहेत.
भीमबेटका येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने लाल व पांढरा हे रंग आढळतात. काही चित्रांमधे हिरवा, पिवळा व काळा या रंगांचाही वापर केलेला आहे. बहुतेक चित्रांचे विषय वन्यप्राणी व शिकार यांच्याशी निगडित आहेत. तुलनेने अलीकडच्या काळातील चित्रांमधे पाळीव प्राणी, मिरवणुका व लढाईचे प्रसंग दिसतात. हत्ती व घोड्यांवर स्वार झालेले पुरुष भाले, ढाली-तलवारी व धनुष्यबाण इत्यादी शस्त्रांनी लढताना दाखवलेले आहेत. ज्या चित्रांमधे पाळीव प्राणी आहेत, ती ऐतिहासिक काळातली व वन्यप्राणी असणारी चित्रे त्यापूर्वीची म्हणजे प्रागैतिहासिक आहेत. प्रागैतिहासिक चित्रांमधले प्राणी नैसर्गिक शैलीत असून ते हालचाली करताना दिसतात. याउलट ऐतिहासिक काळातल्या चित्रांमधल्या प्राण्यांचे आकृतीबंध काहीसे कृत्रिम असून हे प्राणी स्थिर वाटतात. या चित्रांमधून प्रागैतिहासिक व ऐतिहासिक काळातील मानवांची सौंदर्यदृष्टी व कलाकुशलता तर दिसतेच, या खेरीज या चित्रांमधून त्या त्या काळातील लोकजीवनाविषयी फार मोलाची माहिती मिळते.
सर्व चित्रांचा नेमका काळ अचूकपणे ठरवणे अवघड आहे. ही चित्रे असलेल्या शैलाश्रयांमधील जमिनीच्या थरांमधे हिमटाईट या खनिजाचा चुरा आढळला आहे. या खनिजाचा वापर चित्रांमधील रंग बनवण्यासाठी केला जात होता. या चुऱ्याचे रेडियो कार्बन पद्धतीने कालमापन करणे शक्य आहे. या पद्धतीने आपल्याला चित्रांच्या काळाची सर्वसाधारण कल्पना येते. तसेच पुढील काळातील चित्रकारांनी पुर्वीच्या चित्रांवर चित्रे काढली असल्याने अनेक ठिकाणी चित्रांचे एकावर एक थर आढळतात. या चित्रांची शैली, चित्रणाची पद्धत, रंगकाम व आशय यांत फरक असल्याने चित्रांचे तौलनिक कालमापन करता येते.
शैलाश्रय क्रमांक दोन एफ – ६ ए, दोन एफ – ९ ए, तीन एफ – १ ए, दोन डी – १ ए व तीन ए – २४ यांच्यामध्ये शैलीबद्ध अशा मानवी आकृती आहेत. ही रेखाटने भीमबेटकाची सर्वांत प्राचीन चित्रे आहेत. शैलाश्रय क्रमांक तीन इ – १२ मधील लाल व पांढऱ्या रंगाने काढलेली गवा, म्हैस व रानडुकरांची चित्रे, ‘झू रॉक’ वरील गडद लाल रंगातले काळवीट, ‘प्लॅटफॅार्म रॉक’वरील गवे आणि इतर अनेक प्राण्यांची भव्य चित्रे ही सगळी याच कालखंडातील आहेत. मध्याश्मयुगातील चित्रे हा पुढील टप्पा आहे. ही चित्रे लाल (गडद जांभळा-लाल) आहेत. मानवी आकृत्यांमधे अनेक प्रकारचे कपडे व शिरोभूषणे दिसतात. त्यांच्या हातात लांब भाले किंवा काटेरी बाण व धनुष्ये असतात. प्राणी पकडण्यासाठी ते विविध प्रकारची साधने वापरताना दाखवलेले आहेत.
मध्याश्मयुग हे भीमबेटका येथील शैलचित्रांचे सुवर्णयुग होते. मध्याश्मयुगीन चित्रकारांनी गेंडा, गवा, म्हैस, नीलगाय, सांबर, हरिण, माकड, रानडुक्कर, कासव, मासा व इतर प्राण्यांची चित्रे नैसर्गिक शैलीत काढलेली आहेत. परंतु मानवी आकृत्या मात्र शैलीबद्ध आहेत. असे असले तरी सर्व चित्रे प्रवाही (dynamic) असून त्यांच्यात जोमदारपणा व लय आहे. पुढील काळातील चित्रांमध्ये असा प्रवाहीपणा आढळत नाही, असे विष्णू श्रीधर वाकणकरांचे मत आहे. मध्याश्मयुगीन चित्रांपासून ताम्रपाषाणयुगीन चित्रे मध्याश्मयुगीन चित्रांएवढी नैसर्गिक व प्रवाही नसल्याने ती सहज ओळखता येतात. मध्याश्मयुगीन चित्रांत शरीराचा आतील भाग क्ष-किरण तंत्रशैलीने किंवा मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या नक्षीने भरलेला असतो. याउलट ताम्रपाषाणयुगीन चित्रांत माळवा मृदभांड्यांवर आढळणाऱ्या आकारांसारखे जाळी, वेलांट्या किंवा भौमितिक आकार दिसतात. ऐतिहासिक काळातील चित्रांमध्ये ब्राह्मी व अलीकडच्या काळातील लिपींमधे लिहिलेली अक्षरे आढळतात. काही चित्रांत व मूर्तिकलेतील आकृतीबंधांमध्ये साम्य आहे.
भीमबेटका येथील प्रागैतिहासिक शैलचित्रे व त्यांचे एकूण पुरातत्त्वविद्येत स्थान यांसंबंधी संशोधन करून विष्णू श्रीधर वाकणकर यांनी १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘विंध्य भारतातील प्रागैतिहासिक शैलचित्रे’ असा होता. त्यांनी सातत्याने केलेल्या संशोधनामुळे आपल्या देशाचा हा मोठा सांस्कृतिक ठेवा जगाला माहिती झाला. तसेच यशोधर मठपाल यांनी भीमबेटकाच्या शैलचित्रांवर आधारित प्रबंध लिहून वीरेंद्रनाथ मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादन केली असून त्यांचा प्रबंध पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला आहे.
संदर्भ :
- Mathpal, Y. Prehistroic Rock Paintings of Bhimbetka, Central India, New Delhi, 1984.
- Misra, V. N. &. Mathpal, Y. ‘Rock Art of Bhimbetka Region, Central India’, Man and Environment 3: 27-33, 1979.
- Neumayer, E. Prehistoric Indian Rock Paintings, New Delhi, 1983.
- Wakankar, V. S. ‘Prehistoric Cave Paintings’, Marg 28 (4): 17-34, 1975.
- मिश्र, वीरेंद्रनाथ, अनु., जोगळेकर, प्रमोद, पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर, पुणे, २००२.
समीक्षक : सुषमा देव