वाकणकर, विष्णू श्रीधर : (४ मे १९१९–३ एप्रिल १९८८). एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील नीमच या गावी झाला. शालेय जीवनापासूनच वाकणकरांना कलेविषयी, विशेषतः चित्रकलेबद्दल, ओढ होती. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी फिरून चित्रे काढायला व प्रवास करायला आवडत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आदिवासींमधे समाजकार्य व शैक्षणिक कार्य करण्यासाठी वाकणकर घनदाट जंगलात गेले असता, तेथे त्यांना प्राचीन चित्रे आढळून आली. पुढे हेच त्यांचे कार्यक्षेत्र ठरले. त्यांनी सु. पन्नास वर्षे जंगलात सतत पायपीट करून हजारो शैलचित्रे शोधून काढली. त्या चित्रांची वैज्ञानिक पद्धतीने नोंदणी करून छायाचित्रे काढली आणि उत्तम रेखाटने केली. तसेच ठिकठिकाणी शैलचित्रांची प्रदर्शने केली. अमेरिकन विद्वान आर.आर. ब्रूक्स यांच्या सहकार्याने त्यांनी शैलचित्रे या विषयावर भारतातले पहिले पुस्तक प्रकाशित केले (१९७६).

वाकणकरांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून फाइन आर्ट्स या विषयात पदविका मिळविली व एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना विख्यात फ्रेंच पुरातत्त्वज्ञ आन्द्रे लेरॉ-गुर्रन यांच्याकडे पुरातत्त्व व शैलचित्रे या विषयावर अभ्यास करण्याची संधी मिळाली (१९६२). ⇨ ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली (१९७३). त्यांचा प्रबंध ‘भारतातील प्रागैतिहासिक शैलचित्रेʼ असा होता.

ह. धी. सांकलियांनी मध्य प्रदेशातील महेश्वर व नावडातोली या नर्मदा नदीच्या तीरांवरील पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन करण्याची मोहीम हाती घेतली (१९५३–५९). वाकणकरांनी सांकलियांकडून उत्खननात सहभागी होण्याची परवानगी मिळवली व तेथे त्यांच्याकडून पुरातत्त्वीय उत्खननाची पद्धत शिकून घेतली. तसेच नर्मदा नदीच्या परिसरात असलेल्या प्रागैतिहासिक स्थळांच्या शोधमोहिमेत काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. या मोहिमेत वाकणकरांनी चतुर्थक (क्वाटर्नरी) काळाचे भूविज्ञान, पुराजीवविज्ञान व प्रागैतिहासिक काळ यांच्या अभ्यासाची प्राथमिक तंत्रे शिकून घेतली. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यामधे आवरा व मनोती या ठिकाणी मध्य प्रदेशच्या पुरातत्त्व व संग्रहालय खात्यातर्फे केलेल्या उत्खननात वाकणकरांचा सहभाग होता (१९६०).

वाकणकर यांनी मध्य प्रदेशातील ⇨भीमबेटका येथील प्रस्तरगुहांचे व तेथील गुहाचित्रांचे सर्वप्रथम समन्वेषण केले आणि त्यासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध केला (१९५५). पुढे त्यांनी विरेंद्रनाथ मिश्र यांच्या सहकार्याने भीमबेटका या प्रागैतिहासिक स्थळाचे उत्खनन केले (१९७३–७७). येथील गुहांमधे त्यांना प्राथमिक निक्षेपांत पुराश्मयुगीन अवजारे मिळाली. या संशोधनामुळे भारतीय उपखंडातील पुराश्मयुगीन पुराव्यांत फार मोठी भर पडली. वाकणकरांनी भौनेरवाली, विनायक, जोन्द्रा, लखाजौर, दिवेतिया, बांसकुवर आणि करीतलाई अशा अनेक टेकड्यांवर एक हजारपेक्षा जास्त पुरातत्त्वीय स्थळे शोधून काढली. उज्जैन जिल्ह्यातील कायथा (१९६६) आणि दंगवाडा (१९७४,१९८२) या दोन पुरातत्त्वीय स्थळांचे त्यांनी केलेले उत्खनन महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे इ. स. पू. ३,५०० ते इ. स. ६०० एवढ्या प्रदीर्घ काळातील माळव्याचा इतिहास उजेडात आला. या उत्खननामुळे माळवा प्रांतात शेती करून स्थिर जीवन जगणाऱ्या आद्य शेतकरी लोकांविषयी फार महत्त्वाची माहिती मिळाली.

वाकणकरांना प्रागैतिहास, इतिहासाचा संधिकाल किंवा शैलचित्रे यांच्याबरोबर नाणकशास्त्र, पुराभिलेखविद्या, संस्कृत साहित्याचा इतिहास अशा प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्वाच्या इतर कितीतरी शाखांमधे संशोधनाची आवड होती. प्राचीन इतिहासावरील त्यांचे प्रेम व त्याविषयीचा उत्साह त्यांच्या वाढत्या वयातही कायम होता. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांनी लुप्त सरस्वती नदीच्या शोधमोहिमेचे नेतृत्व केले (१९८५). हिमाचलच्या दुर्गम पहाडांमधे, राजस्थानच्या वाळवंटात, गुजरात, पंजाब व हरयाणा आदी प्रदेशांत त्यांनी शोधमोहीम राबविली. घग्गर-हाक्रा या नदीकाठी सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या अवशेषांचा मागोवा घेत असताना त्यांनी प्राचीन सरस्वतीच्या भौगालिक खाणाखुणांचा शोध घेतला. तसेच त्यांनी सरस्वतीविषयक लोकसाहित्याचेही संकलन केले. त्यांच्या या शोधमोहिमेला खूप प्रसिद्धी लाभली. वाकणकरांनी त्या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. मिळालेले पुरावे त्यांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी प्रदर्शित केले.

वाकणकरांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा होता. स्वच्छ पारदर्शी भूमिका, इतिहास व संस्कृतीविषयीचे प्रेम यांमुळे त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना ते आपलेसे करत. शहरी, ग्रामीण व आदिवासी अशा सर्व लोकांमधे कमालीच्या सहजतेने व साधेपणाने ते वावरत. वाकणकर हे एक शोधक (Explorer) होते. हजारो शैलाश्रय, अनेक प्रागैतिहासिक व ऐतिहासिक स्थळे शोधून काढणे ही त्यांची भारतीय पुरातत्त्वातील फार मोठी कामगिरी आहे. किंबहुना जागतिक ताम्रपाषाणयुगीन नकाशात भारताला स्थान मिळवून देण्याचे श्रेय सांकलियांच्या बरोबरीने वाकणकरांचेही आहे. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय शैलचित्रे या विषयाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्यांच्या अविरत परिश्रमांमुळेच शैलचित्र या विषयाला पुरातत्त्वविद्येत मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या प्रेरणेतून अनेक भारतीय व विदेशी विद्वान प्रागैतिहासिक शैलचित्रांवर संशोधन करत आहेत. तसेच ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाʼ ही संस्था दरवर्षी अधिवेशन भरवते आणि पुराकला नावाचे नियतकालिक काढते.

भारतीय पुरातत्त्वामधे वाकणकरांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले (१९७६). साउथॅम्प्टन येथे झालेल्या वर्ल्ड आर्कियॉलॉजिकल काँग्रेसमध्ये त्यांनी सहभाग घेतला (१९८६).

सिंगापूर येथे एका परिषदेसाठी गेले असताना त्यांचे निधन झाले. मध्य प्रदेश सरकारने वाकणकर यांच्या स्मरणार्थ उज्जैन येथे वस्तुसंग्रहालय स्थापन केले आहे व त्यांच्या नावाने संशोधनसंस्था सुरू केली आहे. तसेच वाकणकरांच्या नावाने दर दोन वर्षांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय पुरातत्त्वसंशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.

 

संदर्भ :

  • Misra, V. N. ‘Obituary : Vishnu Shridhar Wakankarʼ, Man and Environment XIII : 101-102, 1989.
  • Wakankar, V. S. ‘Chalcolithic Cultures of Malwaʼ, Prachya Pratibha,  IV (2), 1984.
  • Wakankar, V.S. ‘Painted Rock Shekters of Indiaʼ, Ph.D. Thesis : Deccan College, Pune, 1973.
  • Wakankar, V.S.  ‘Prehistoric Cave Paintingsʼ, Marg 28 (4) : 17-34, 1975.
  • मिश्र, विरेंद्रनाथ, अनु. जोगळेकर, प्रमोद पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर, पुणे, २००२.

समीक्षक – शरद राजगुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा