बंकर म्हणजे तळघर अथवा आश्रयासाठी जमिनीखाली बनवलेली जागा. बंकरचे चक्रीवादळांपासून बचाव करण्यासाठी बनवलेली तळघरे, सैनिकांना राहण्यासाठी अथवा युद्धसामग्री लपवून ठेवण्यासाठीचे लष्करी बंकर, युद्धकाळात शत्रूपासून दडण्यासाठी व बॉम्ब हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी बनवलेले बंकर, अण्वस्त्रांचा हल्ला झाल्यास त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठीचे जाड कवच असलेले बंकर असे बंकरचे अनेक प्रकार आहेत. विशेषतः पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांच्या काळात आणि नंतर अमेरिका व सोव्हिएत महासंघ यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात (१९४७—१९९१) बंकरचा बचावासाठी वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. अशा बंकरच्या रचनेचा आणि तिथे मिळणार्‍या वस्तूंचा विशेष अभ्यास करण्याच्या संकल्पनेतून बंकरचे पुरातत्त्व ही लष्करी पुरातत्त्वाची (Military Archaeology) उपशाखा निर्माण झाली. या क्षेत्रातल्या काही संशोधनांचा समावेश शीतयुद्धाचे पुरातत्त्व (Archaeology of Cold War) यात होतो.  लष्करी पुरातत्त्व या मूळ संशोधन क्षेत्रात उपयोगी पडणार्‍या या सर्व पद्धतींचा वापर बंकरचा अभ्सास करताना केला जातो. ल्यूक बेनेट यांनी बंकर हा वास्तूरचनेचा अगदी वेगळा प्रकार असल्याने त्याचा स्वतंत्र अभ्यास करावा, असे सुचवून अशा अभ्यासक्षेत्राला ’बंकारोलॉजी’असे नाव दिले आहे. तथापि या संज्ञेला मान्यता मिळालेली नाही.

एका भूमिगत बंकरचे प्रवेशद्वार.

बर्लिनमध्ये महायुद्धाच्या अखेरीस हिटलर राहात होता त्याला फ्यूरर बंकर (Führer bunker) असे म्हटले जात होते. हा बंकर जमिनीखाली १० मी. खोलीवर होता व त्यात अनेक मजले होते. हा बंकर सोव्हिएत फौजांनी १९४५-४७ मध्ये थोडाफार उद्ध्वस्त केला. बर्लिनमध्ये नवीन बांधकामांच्या वेळी १९८७-८८ मध्ये त्याचे काही भाग सापडले आणि तेथे उत्खनन झाले. परंतु त्याची फारशी माहिती तत्कालीन पूर्व जर्मन सरकारने प्रसिद्ध होऊ दिली नाही. नवनाझी गटांनी त्याच्या प्रचारासाठी वापर करू नये म्हणून त्यानंतर एकत्रित जर्मनीच्या सरकारांनी फ्यूरर बंकरला महत्त्व दिले नाही. तेथे कोणतेही वारसास्थळ अस्तित्वात नाही. योग्य ती पुरातत्त्वीय माहिती लोकांपर्यंत न आल्याने फ्यूरर बंकरसंबंधी अनेक दंतकथा निर्माण झाल्या.

पूर्व यूरोपमधील सोव्हिएत महासंघाच्या अंकित देशांमध्ये २३ ठिकाणी अण्वस्त्रे दडवून ठेवण्यासाठी प्रचंड मोठे बंकर तयार केलेले होते. शीतयुद्धाच्या काळात नाटो (NATO) देशांनी क्षेपणास्त्रे वापरून अण्वस्त्र हल्ला केला तर वेळेत प्रतिहल्ला करण्यासाठी सोव्हिएत महासंघाने ही व्यवस्था केली होती. वायव्य पोलंडमध्ये असलेल्या ब्रेझनिका-कालोनिया, कोल्मिनो आणि बोर्ने सुलीनोनो या तीन गावांमधील बंकरांचा आणि इतर इमारतींचा पुरातत्त्वीय अभ्यास झाला आहे. सोव्हिएत महासंघाने १९६० ते १९८० या दरम्यान या तीन ठिकाणी जमिनीखाली अण्वस्त्रे दडवून ठेवली होती. त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या लष्करी तळावर १०००० ते १५००० जण राहात होते. बंकर सोडून जाताना जरी तेथील महत्त्वाची सगळी यंत्रसामग्री नेण्यात आली असली, तरी लष्करी तळावरील अवशेषांमधून तेथील व्यवस्थेबद्दल दस्तऐवजांमध्ये उपलब्ध नसलेली नवीन माहिती मिळाली आहे.

बर्लिनमधील राइख्सबान्ह बंकरवरील इमारत व बंकरच्या भिंतीवरील गोळीबाराच्या खुणा.

लिखित पुरावे व नकाशे नष्ट करून शीतयुद्धाच्या काळातील अण्वस्त्र सज्जतेच्या स्मृती ’पुसण्याचा’ प्रयत्न करूनही त्या काळात काय घडत होते, हे पुरातत्त्व ठामपणाने सांगू शकते याचे एक उदाहरण पोलंडमधील बंकरच्या पुरातत्त्वात आहे. ऑब्जेक्ट ३००१ (पोडबोस्क्रो), ऑब्जेक्ट ३००२ (ब्रेझनिका-कोलोनिया) आणि ऑब्जेक्ट ३००३ (टेम्पेलेवो) या तीन बंकरमध्ये मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांचे साठे होते. हवाई छायाचित्रण, लेसर तंत्रज्ञान वापरून केलेले सर्वेक्षण, जुन्या काळात अमेरिकन हेरगिरी उपग्रहांनी घेतलेल्या व आता खुल्या झालेल्या प्रतिमा यांचा उपयोग करून अण्वस्त्र साठवलेल्या जागांचा अभ्यास करता आला. विशेष म्हणजे सोव्हिएत अभिलेखागारांमध्ये या जागांबद्दल जवळपास काहीही पुरावे मिळाले नव्हते.

शीतयुद्धाच्या काळात अण्वस्त्रांचा हल्ला झाल्यास त्यावेळी सरकार चालवण्यासाठी आणि प्रतिहल्ला करण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी १९५० पासून स्कॉटलंडमध्ये बार्नटन क्वारी, गेअरलॉक, कल्टीब्रागेन आणि किर्कन्यूटन या चार ठिकाणी बंकर तयार केले होते. ते १९९१ पर्यंत वापरात होते. त्यांचा पुरातत्त्वीय अभ्यास झाला असून ही आता पर्यटनाची केंद्रे बनली आहेत.

संदर्भ :

  • Bradley, Garrett & Ian, Klinke, ‘Opening the bunker : Function, materiality, temporality’, Environment and Planning C, 37(6): 1063-1081, 2019.
  • Bennett, L. ‘Bunkerology – A case study in the theory and practice of urban exploration’, Environment and Planning D : Society and Space, 29 : 421-434, 2011.
  • Kiarszys,  Grzegorz,  ‘The destroyer of worlds hidden in the forest : Cold War nuclear warhead sites in Poland’, Antiquity, 93(367) : 1-20, 2019.
  • MacDonald, S. Difficult heritage : Negotiating the Nazi past in Nuremberg and beyond, London, 2009.
  • Virilio, Paul, Bunker Archeology, New York, 1994.

                                                                                                                                                                                                                                   समीक्षक: सुषमा देव