स्त्रीवादी पुरातत्त्व हा पुरातत्त्वीय पुराव्यांचा स्त्रीवादी दृष्टीकोनातून अर्थ लावण्याचा आग्रह धरणारी संमिश्र स्वरूपाची विचारधारा असून ती पुरातत्त्वविद्येची एकसंध अशी शाखा नाही. स्त्रीवादी पुरातत्त्वीय विचारधारेत सुधारणावादी, मार्क्सवादी, पर्यावरणवादी व वर्णभेदविरोधी अशा अनेक छटा असलेल्या, प्रामुख्याने शोषणविरोधी विचारसरणींचा समावेश आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या स्त्रीवादी चळवळींचा सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर परिणाम झाला. पुरातत्त्वविद्येतील सैद्धांतिक मांडणीवरही स्त्रीवादी दृष्टीकोनाचा प्रभाव पडला आहे.
स्त्रीवाद म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणे. निसर्गामुळेच जरी स्त्री व पुरुष यांच्यात जैविक पातळीवर लिंगभेद (Sex) निर्माण झाले असले, तरी स्त्री-पुरुष हे लिंगभेदभाव (Gender) जैविक अथवा ईश्वरनिर्मित नाहीत, तर ते पुरुषप्रधान सामाजिक रचनेमुळे निर्माण झालेले आहेत, हा स्त्रीवादी दृष्टीकोनाचा मुख्य गाभा आहे. स्त्री-पुरुष लिंगभेदावर आधारलेल्या विषमतेविरुद्ध पाश्चात्त्य जगात १९६० नंतर स्त्रीवादी चळवळींनी जोर धरला. मवाळ व जहाल अशा अनेक स्त्रीवादी गटांनी प्रस्थापित पुरुषकेंद्रित सिद्धांतांना आव्हान दिले आणि इतिहास, साहित्य, समीक्षा, मानवशास्त्र व समाजशास्त्र अशा अनेक क्षेत्रांना जबरदस्त हादरे देण्यास सुरुवात केली.
प्राचीन काळातील जीवन, चालीरिती व एकूणच संस्कृतीसंबंधी निष्कर्ष काढताना राजकीय, सामाजिक व आर्थिक अशा सर्व महत्त्वाच्या भूमिका पुरुषांकडे होत्या, असे पुरातत्त्वविद्येत गृहीत धरले जाते हा स्त्रीवादी पुरातत्त्वाचा मुख्य आक्षेप आहे. घराबाहेरची सर्व कामे पुरुषांची (टोळीप्रमुख, लढवय्या, शिकारी, व्यापारी, वाहनचालक) व घराच्या आतील नाजूक कलाकौशल्याची आणि मुलेबाळे यांच्यासह घर सांभाळणे ही कामे स्त्रियांची असे गृहीतक असल्याने ठोकळेबाज पद्धतीने निष्कर्ष काढले जातात. प्रागैतिहासिक काळात हत्यारे बनवणे व शिकार करणे ही कामे फक्त पुरुष करत होते व त्यामुळे ते दूरवर प्रवास करत असत. याउलट स्त्रिया एकाच जागी राहून मुलांचे संगोपन करत असत असे कोणताही वैज्ञानिक आधार नसताना मानले जात होते. स्त्रीवादी पुरातत्त्वज्ञांनी या श्रमविभागणीचे गृहीतक नाकारले.
संस्कृतीमधील स्त्रियांची भूमिका दुय्यम होती, असे मानल्यामुळे पुरातत्त्वीय विवेचनात जणू काही प्राचीन काळात स्त्रिया अस्तित्वातच नव्हत्या अशा प्रकारे मांडणी केली जाते, हे पुरातत्त्वविद्येच्या स्त्रीवादी अभ्यासकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. याचे कारण काय असावे हे सांगताना हे अभ्यासक असे सांगतात की, पुरातत्त्वविद्येच्या आरंभापासूनच प्रामुख्याने पुरातत्त्वज्ञ हे पुरुषप्रधान पाश्चात्त्य जगातले, उच्च आर्थिक वर्गातले पुरुष होते. तसेच त्यांची धार्मिक पार्श्वभूमीही स्त्रियांना कमी लेखणारी होती. त्यामुळे प्राचीन काळाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मुळातच पूर्वग्रहांवर आधारलेला होता. समानतेवर आधारलेल्या स्त्रीवादी विचारांची जाणीवच नसल्याने स्त्री व पुरुष अशा सर्वच पुरातत्त्वज्ञांनी असे करणे चालू ठेवले. तसेच इतर स्त्रीवादी चळवळींप्रमाणे पुरातत्त्वातील स्त्रीवादी विचारधारांनाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष, उपेक्षा, उपहास व बोचरी टीका यांचा सतत सामना करावा लागला.
पुरातत्त्वीय संशोधनात १९८० नंतर स्त्रीवादी विचारांचा समावेश झाला. प्रारंभी त्यांचे स्वरूप पुरुषकेंद्रित विवेचनावर टीका करणे असे होते; तथापि पुढील काळात पुरातत्त्वीय अभ्यासातून ‘अदृश्य’ असलेल्या स्त्रियांच्या भूमिकांचा शोध कसा घेता येईल, याकडे स्त्रीवादी पुरातत्त्वज्ञ सकारात्मक पद्धतीने पाहू लागलेले दिसतात. स्त्रीवादी पुरातत्त्वज्ञ हे प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वीय विचारप्रणालींचा अंगीकार करून ‘ज्ञानाच्या पर्यायी प्रकाराचा’ (Alternative forms of knowledge) पुरस्कार करतात. या विचारांमधून प्रागितिहासातील स्त्रियांच्या स्थानाबद्दलच्या आधिक व्यापक अशा संशोधनाला चालना मिळाली. तसेच पुरातत्त्वविद्येच्या अभ्यासक्रमांमध्ये स्त्रीवादी पुरातत्त्वाचा समावेश झाला. असे असले तरी अद्यापही जगभरात सगळीकडे पुरातत्त्वीय संशोधनात व प्रकाशनांमध्ये पुरुषकेंद्रित पूर्वग्रह आढळतात.
संदर्भ :
- Battle-Baptiste, Whitney, Black Feminist Archaeology, Walnut Creek, California, 2011.
- Bolger, Diane, Ed., A Companion to Gender Prehistory, UK : Wiley-Blackwell, 2013.
- Nelson, Sarah Milledge, Handbook of Gender in Archaeology, Lanham, 1997.
- Skogstrand, Lisbeth, ‘Is Androcentric Archaeology really About Men?ʼ, Archaeologies : Journal of the World Archaeological Congress, 7(1) : 56-74, 2011.
- Wylie, A. ‘Gender theory and the archaeological record. Why is there no archaeology of gender?ʼ, Engendering archaeology : women in prehistory (J. M. Gero and Margaret Conkey Eds.,), pp. 31-54, Oxford, 1991.
समीक्षक : सुषमा देव