जनाश, होल्गर विन्द्कील्डे : ( २३ मे, १९२७ – ८ सप्टेंबर, १९९८ ) जनाश विन्द्कील्डे होल्गर यांचा जन्म जर्मनीतील होल्झमिन्देन (Holzminden) येथे झाला.  विज्ञानाशी संबंधित त्यांची पहिली नोकरी जर्मनीच्या समुद्र तटावरील पक्षी संग्रहालयात वॉर्डन म्हणून होती. गॉटिंगेन (Gottingen) विद्यापीठात त्यांनी पदवीपूर्व शिक्षण घेतले. कॉलेजच्या सत्रांच्यामध्ये ते मासेमारीच्या बोटींवर काम करीत. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात काम करीत असताना, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायन जीवशास्त्राच्या ज्ञानाच्या त्यांच्या कक्षा रुंदावल्या. समुद्री सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ क्लाऊड झोबेल (Claude ZoBell) ह्यांनी त्यांना कॅलिफोर्नियामधील ला जोला (La Jolla) येथे स्वतःच्या, समुद्राचा अभ्यास करणाऱ्या स्क्रिप्स (Scripps) संस्थेच्या प्रयोगशाळेत काम करण्याचे आमंत्रण दिले. १९५५ साली होल्गर यांना जीवशास्त्रात गॉटिंगेन विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली. पुढे त्यांनी पाच वर्षे मॅक्स प्लांक सोसायटीमध्ये सहवैज्ञानिकाचे काम केले. अनेक पदवी, पदव्युत्तर, संशोधक आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. तेथे त्यांनी मरीन बायोलॉजी लॅब (MBL) मध्ये मायक्रोबियल इकॉलॉजीच्या अभ्यासक्रमासाठी संचालक म्हणून काम पहिले. आपल्या संशोधनावर त्यांनी जगभर अनेक व्याख्याने दिली.

प्रमुख वैज्ञानिक म्हणून त्यांनी अटलांटिक, प्रशांत, भूमध्य आणि काळ्या समुद्रात ३५ हून अधिक संशोधन मोहिमा काढल्या. त्यांनी मुख्यत्वे तीन विषयांवर संशोधन केले: खाऱ्या पाण्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या वाढीच्या प्रक्रियांचा अभ्यास, कमी तापमान आणि जास्त दाबाचा त्यांच्यावर होणारा परिणाम आणि पाण्याच्या तापमानाच्या नियंत्रणासाठी असणाऱ्या नलिकांमधील प्रक्रियांचा अभ्यास. त्यांनी सहकाऱ्यांबरोबर प्रथमच खोल समुद्रात सूक्ष्मजीवाणूंच्या विघटन प्रक्रियांचा अभ्यास केला. नलिकांमधील जीवाणूंच्या वाढीचा वेग मोजण्यात आणि गंधकिय पदार्थ वापरून रसायनांच्या निर्मितीच्या अभ्यासात त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान आहे. १९९६ मध्ये, एका सूक्ष्म जीवाणूला त्यांचे नाव देऊन (Methanococcus jannaschii) त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच वर्षी त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ संस्थेने होल्गर डब्ल्यू. जनाश अध्यासनाची स्थापना केली त्यांना समुद्रातील प्रयोगांचे उत्तम संयोजन करण्याची आणि पूर्ण करण्याची कला अवगत होती. त्यांचे अनेक पडताळे आजही वैज्ञानिकांना उपयोगी ठरतात.

जनाश यांनी २०० पुस्तके लिहिली. त्यांचे Small is Powerful: Recollections of a Microbiologist and Oceanographer पुस्तक लोकप्रिय होते. अनेक वैज्ञानिक संशोधन मासिकांच्या संपादकपदी त्यांनी काम केले तसेच Advances in Aquatic Microbiology and Current Perspectives in High Pressure Biology सारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन केले.

जनाश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात ओशनोग्राफीचे हेन्री ब्रायंट बिगेलो मेडल, अप्लाइड आणि सूक्ष्मजीवशास्त्राचे फिशर सायंटिफिक पुरस्कार, स्क्रीप्स संस्थेचा ऑफ ओशनोग्राफीचा कोडी पुरस्कार, फुलब्राईट पुरस्कार  हे होत.
कर्करोगाच्या दीर्घ आजाराने त्यांचा  मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे