रॉबर्ट व्हिटाकर यांनी १९६९ मध्ये प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत एकपेशीय आभासी केंद्रक असेलल्या सजीवांचा समावेश केला जातो. यातील सजीव बहुवंशोद्भवी (Polyphyletic; ज्या सजीवांची उत्पत्ती समान पूर्वजापासून झालेली नाही असे सजीव) आहेत. सर्व जीवाणूंचे वर्गीकरण एकाच मोनेरा सृष्टीमध्ये करण्यात आले आहे. मोनेरा सृष्टी वेगळी करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वस्वी वेगळ्या रचनेचे रायबोसोम. त्यांच्यामध्ये 70S रायबोसोम असते. त्यामुळे आभासी केंद्रक व दृश्य केंद्रक अशा वर्गीकरणाऐवजी इतर सृष्टीहून हा महत्त्वाचा घटक वर्गीकरणामध्ये ठरला.
जीवाणू पृथ्वीवरील सर्वात प्रथम आस्तित्वात आलेले सजीव असावेत. जीवाणू सर्वत्र आढळतात. ते अतिशय वैविध्यपूर्ण अशा अधिवासांमध्ये आढळतात. जीवाणूमध्ये केंद्रक प्राथमिक स्वरूपाचे असून त्याला केंद्रकाभ म्हणतात. जीवाणूंच्या केंद्रकाभोवती पटल/प्रकलावरण (Nuclear membrane) नसते. त्यांच्या पेशीमध्ये वेटोळ्या आकाराचे डीएनए रेणूपासून तायर झालेले एकच गुणसूत्र असते. काही जीवाणूंमध्ये डीएनए रेणू अनियमितपणे पेशीद्रव्यात विखुरलेले असतात. पेशीद्रव्यात रायबोसोम, मिसोझाम, प्लाझ्मिड ही पेशीअंगके असून यांना पटल नसते. मात्र त्यात तंतुकणिका, गॉल्जी-पिंड, लवक, अंतर्द्रव्य जालिका इ.पेशीअंगके नसतात. यांखेरीज पेशीद्रव्यात पुटीका असून त्यांमध्ये ग्लायकोजेन, नायट्रोजन, सल्फर इ. पदार्थ साठलेले असतात. मायकोप्लाझ्मा जीवाणू गटाखेरीज इतर सर्व जीवाणूंमध्ये पेशीपटल पेशीभित्तिकेने वेढलेले असते. हालचालींसाठी कशाभिका (Flagella) आणि झलरिका (Pili) असतात. लैंगिक पुनरुत्पादनादरम्यान झलरिकांचा उपयोग होतो. त्यांच्यात ऑक्सिश्वसन (उदा., बॅसिलस सबटिलिस), विनॉक्सिश्वसन (उदा., क्लॉस्ट्रिडियम) आणि ऑक्सिविनॉक्सिश्वसन घडून येते. जीवाणूंमध्ये अलैंगिक (द्विखंडन किंवा मुकुलन) व लैंगिक (संयुग्मन) प्रजनन घडून येते.
जीवाणू पेशी रचना साधी सोपी दिसत असली तरी इतर सजीवांप्रमाणे त्यांचे वर्तन गुंतागुंतीचे असते. जीवाणू पेशीत चयापचयाच्या स्वयंपोषी, परपोषी यांसारख्या विविध पद्धती आढळतात. काही जीवाणू प्रतिकूल परिस्थितीत निष्क्रिय अवस्थेत अनेक काळ सुप्तावस्थेत राहतात. पोषक वातावरण मिळाले की ते सक्रिय होतात. असंख्य जीवाणू वनस्पती व प्राण्यांच्या शरीरात परजीवी स्वरूपात असतात. उदा., मायकोप्लाझ्मा. मानवी शरीरातील परजीवी जीवाणूंची संख्या मानवी पेशीहून अधिक आहे.
मोनेरा सृष्टीचे वर्गीकरण सायनोबॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया व यूबॅक्टेरिया या तीन वर्गांत केले जाते.
(१) सायनोबॅक्टेरिया (Cyanobacteria) : यामध्ये नील-हरित शैवालांचा समावेश होतो. नीलहरीत शैवाल पेशीमध्ये हरीतलवक असल्याने एके काळी त्यांचा समावेश वनस्पती सृष्टीमध्ये करण्यात आला होता. नावाप्रमाणेच त्यांचा रंग नीळा-हिरवा असला तरी काही अपवाद असतात. ती गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात, जमिनीवर किंवा जमिनीत आढळतात. शरीर एककोशिक (उदा., ग्लीओकॅप्सा, क्रकॉकस, मायक्रोसिस्टिस इ.), सामुहिक व तंतुयुक्त (उदा., ॲनाबीना, नॉस्टॉक, ॲसिलॅरिया इ.) असते. लैंगिक प्रजनन नसते. जमिनीतील नील-हरित शैवलांतील श्लेष्मल द्रव्यांमुळे नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंना पोषण मिळते. शिवाय कित्येक नील-हरित शैवले स्वत:च नायट्रोजनाचे स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवितात. तसेच त्यांमध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या मदतीने ते स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात (उदा., नॉस्टॉक, ॲनाबीना).
(२) आर्किबॅक्टेरिया (Archaebacteria) : यातील जीवाणूंना आद्यजीवाणू किंवा आदिजीवाणू असे म्हणतात. ते अत्यंत विषम स्थिती जसे हिम, प्रचंड दाब असलेले सागर तळ, खोल समुद्रातील ज्वालामुखीमधून निघालेले उष्ण पाणी अशा वैविध्यपूर्ण अधिवासांत आढळतात. इतर सजीव जेथे टिकाव धरू शकत नाहीत अशा ठिकाणी हे जीवाणू आढळतात. प्रतिकूल परिस्थितीत राहण्याऱ्या या जीवाणूंना चरमसीमा सजीव म्हणतात. यांची पोषणपद्धती स्वयंपोषी (Autotrophic) असते. पेशीभित्तिकेची रचना इतर जीवाणूंपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असून ती जीवाणूंना प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यास मदत करते.
अधिवासावरून याचे तीन प्रकार पडतात –
(i) उष्ण अधिवासी जीवाणू / तापरागी जीवाणू : गरम पाण्याचे झरे, वाळवंट व समुद्रतळाशी असलेल्या ज्वालामुखीच्या उगमस्थानी हे जीवाणू आढळतात. उदा., पायरोलोबस फ्युमारी (Pyrolobus fumarii).
(ii) मिथेन अधिवासी जीवाणू : रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यात हे जीवाणू आढळतात. उदा., मिथेनोबॅक्टेरियम ब्रँटी (Methanobacterium bryantii).
(iii) लवण अधिवासी जीवाणू / लवणरागी जीवाणू : हे जीवाणू मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात आढळतात. उदा., हॅलोबॅक्टिरियम सॅलायनॅरम (Halobacterium salinarum).
(३) यूबॅक्टेरिया (Eubacteria) : यातील जीवाणूंना खरे जीवाणू असेही म्हणतात. उदा., रायझोबियम आणि क्लॉस्ट्रिडियम. यातील जीवाणू निसर्गात सर्वत्र आढळतात. त्यांची पेशिभित्तिका दृढ असून पेप्टिडोग्लायकन यापासून बनलेली असते. ते कशाभिकेच्या साहाय्याने हालचाल करतात. पोषण, आकार आणि सूक्ष्मजीव अभिरंजन पद्धती यांनुसार यूबॅक्टेरियाचे प्रकार पडतात.
(अ) पोषणानुसार प्रकार
(i) स्वयंपोषी यूबॅक्टेरिया : याचे प्रकाशसंश्लेषी (स्वत:चे अन्न स्व:त तयार करणारे) व रसायनपोषी असे दोन उपप्रकार पडतात. नायट्रोजन, सल्फर किंवा इतर द्रव्यांच्या ऑक्सिडीकरणाने ऊर्जा मिळवणाऱ्या जीवाणूंना रसायनपोषी जीवाणू म्हणतात; उदा., सेलेनोमोनास (Selenomonas).
(ii) परपोषी यूबॅक्टेरिया : याचे परजीवी (अन्नासाठी आश्रयींवर अवलंबून असणारे), मृतोपजीवी (मृत शरीरावर वाढणारे आणि त्याचे विघटन घडवून आणणारे) आणि सहजीवी (आश्रयींवर वाढणारे व त्यांना उपकारक असणारे) असे तीन उपप्रकार पडतात.
(ब) आकारानुसार प्रकार
(१) गोलाणू (Coccus) : उदा.,स्ट्रेप्टोकॉकस (Streptococcus)
(२) दंडाणू (Bacillus) : उदा.,एश्चेरिकिया कोलाय (E. Coli)
(३) मळसूत्री (Spirillum) : उदा., ट्रिपोनेमा पॅलिडस (Treponema pallidum)
(४) तंतुमय (Filaments) : उदा., मायक्रोथ्रिक्स पार्विसेला (Microthrix parvicella)
(५) स्वल्पविरामी (Coma shaped) : व्हिब्रिओ कॉलेरा (Vibrio cholera)
(६) वृंत/देठ असलेला (Stalked) : कॉलोबॅक्टर क्रेसेंटस (Caulobacter crescentus)
(७) मुकुल असलेला (Budded) : ऱ्होडोमायक्रोबियम व्हॅनिली (Rhodomicrobium vannielii)
(क) सूक्ष्मजीव अभिरंजन पद्धतीनुसार प्रकार
गिबॉन्स व मुरे या वैज्ञानिकांनी १९७८ मध्ये ग्रॅम अभिरंजन पद्धतीवरून (Grams Staining) जीवाणूंचे वर्गीकरण केले आहे. ग्रॅमअभिरंजन पद्धती रंजकद्रव्य प्रतिसाद यांवरून जीवाणूंचे पुढील प्रकार पडतात.
(i) ग्रॅम-धन जीवाणू (Gram-Positive) : उदा., स्टेफायलोकॉकस (Staphylococcus), मायकोबॅक्टेरियम (Mycobacterium) इ.
(ii) ग्रॅम-ऋण जीवाणू (Gram-Negative) : उदा., एश्चेरिकिया कोलाय, ऱ्होडोमायक्रोबियम व्हॅनिली.
याशिवाय मॅग्नेटोस्पिरीलम मॅग्नेक्टिकम (Magnetospirillum magneticum), मॅग्नेटोबॅक्टेरियम बव्हॅरिकम (Magnetobacterium bavaricum) यांसारखे जीवाणू चुंबक संवेदना दर्शवितात. त्यांना चुंबक अनुचलनी जीवाणू (Magnetotactic bacteria) असे म्हणतात.
उपयोग : जीवाणू अनेक महत्त्वाच्या औद्योगिक प्रक्रियांचे आधारभूत घटक आहेत. चीज, लोणची व सॉसेज यांसारख्या किण्वन केलेल्या खाद्यपदार्थांचे उत्पादन तसेच वाहितमल व इतर अपशिष्टे यांच्यापासून मिथेन वायूची निर्मिती यांमध्ये जीवाणूंचा संबंध येतो. वैद्यकाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व असलेले प्रतिजैव पदार्थ जीवाणूंमुळे तयार करता येतात. पर्यावरणातील प्रदूषक द्रव्यांचे निर्विषीकरण, उपयुक्त द्रव्यांचे उत्पादन इत्यादी गोष्टींसाठी भावी काळात जीवाणूंचा वाढत्या प्रमाणात उपयोग करून घेतला जाईल. जैव तंत्रविद्येवर आधारलेले नवनवीन उद्योग पुढे येत असून त्यांच्यामध्ये जीवाणूंचे कार्य महत्त्वाचे ठरणार आहे.
पहा : चुंबक अनुचलनी जीवाणू; जीवाणू पेशी; तापरागी सजीव; पंचसृष्टी वर्गीकरण; पेशीअंगके; लवणरागी जीवाणू.
संदर्भ :
- http:/www.britannica.com/science
- http://biologydictionary.net/monera
- http:/biologytutovista.com/organism/kingdom-monera.htm
समीक्षक : मोहन मद्वाण्णा