मॅक्कार्टी, मॅक्लीन : (९ जून १९११ – २ जानेवारी २००५) मॅक्लीन मॅक्कार्टी यांचा जन्म अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील साउथ बेंड येथे झाला. वडलांच्या नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी बदल्या होत असल्याने, मॅक्लीन यांचे प्राथमिक शिक्षण अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत झाले. शाळकरी वयात मॅक्कार्टी यांनी मायक्रोब हंटर हे पॉल द  क्रुईफ या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने लिहिलेले पुस्तक वाचले. त्यातून त्यांना सूक्ष्मजीवांच्या अद्भुत सृष्टीबद्दल माहिती आणि विज्ञानाबद्दल नवा दृष्टीकोन मिळाला. इतर तीन समविचारी मित्रांबरोबर त्यांनी हौशी रसायन संशोधक नावाचे मित्रमंडळ स्थापन केले. या मंडळाचा कारभार त्यांच्या तळघरातून चालत असे.

ते वैद्यकपूर्व शिक्षण घेण्यासाठी स्टॅन्फर्ड विद्यापीठात गेले. नव्याने उदयास येणाऱ्या जीवरसायनशास्त्रात जेम्स लक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यकृतातातील प्रथिनांच्या चयापचयासंबंधी संशोधन केले. अधिक अनुभवासाठी बालरोगांच्या विशेष अभ्यासासाठी त्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये उमेदवारी केली. पुढे स्टॅन्फर्ड विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी जॉन्स हॉपकिन्स या अमेरिकेच्या प्रख्यात हॉस्पिटलला संलग्न वैद्यकीय विद्यापीठात, शिक्षण घ्यायला सुरुवात केली. या अनुभवामुळे मॅक्कार्टी यांना न्यूयॉर्क विद्यापीठात विल्यम टिल्लेट यांच्याकडे संशोधक सहाय्यक पद मिळाले. टिल्लेट यांनी मॅक्कार्टी यांना रॉकफेलर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून मॅक्कार्टी यांच्या आवडत्या जीवाणूशास्त्र विषयाचा अभ्यास करण्याचे सुचवले. टिल्लेट यांनी स्वतः तेथे काम केले होते. मॅक्कार्टी यांनी पुढे रॉकफेलर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये साठ वर्षांपेक्षाही जास्त काळ काम केले.

रॉकफेलर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रसिद्ध आणि अनुभवी प्रा. ओस्वाल्ड एव्हरी यांची प्रयोगशाळा होती. मॅक्कार्टी यांचे रॉकफेलरमधील संशोधन काम सुरू होण्यापूर्वी ग्रिफिथ फ्रेडरिक या जीवाणुशास्त्रज्ञाने इंग्लंडमध्ये स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया (Streptococcus pneumonia) या रोगकारक जीवाणूच्या अनुवंशिकतेवर संशोधन केले होते. डीएनए रेणूचा तेव्हा शोध लागला नव्हता. एका पिढीतील लक्षणे अनुवंशिकतेने पुढील पिढीत कशी जातात हे त्यावेळी अज्ञात होते. ग्रिफिथ यांनी न्यूमोनियाच्या स्ट्रेप्टोकॉकायच्या गुळगुळीत पृष्ठभाग असणाऱ्या जीवाणू वाणावर प्रयोग केले. गुळगुळीत पृष्ठभागामुळे उंदराच्या शरीरातील श्वेतपेशींना स्ट्रेप्टोकॉकाय ओळखता येत नसे. परिणामी ते जीवाणू मारले जात नसत. पण जीवाणूंच्या विषामुळे उंदीर न्यूमोनियाने मरत. स्ट्रेप्टोकॉकाय जीवाणूंचे विविध प्रायोगिक क्रिया केलेले वाण ग्रिफिथ उंदरांमध्ये अंत:क्षेपित करून त्यांना न्यूमोनिया संसर्ग होतो का पहात. न्यूमोनिया-संक्रामक गुळगुळीत पृष्ठभागधारक स्ट्रेप्टोकॉकाय जीवाणू, खरखरीत पृष्ठभागधारक न्यूमोनिया असंक्रामक स्ट्रेप्टोकॉकायना विशेष परिस्थितीत स्वत:सारखे मारक, न्यूमोनिया-संक्रामक बनवतात हे ग्रिफिथ यांनी सप्रयोग दाखवले. परंतु निरुपद्रवी खरखरीत पृष्ठभागधारक असंक्रामक स्ट्रेप्टोकॉकायचे गुणधर्म का बदलतात. याचे गुळगुळीत स्ट्रेप्टोकॉकाय जीवाणूंकडून खरखरीत स्ट्रेप्टोकॉकायकडे कोणतातरी घटक हस्तांतरित होतो असे मोघम उत्तर होते. या रूपांतरणावर प्रकाश टाकता येतो का या दृष्टीने ओस्वाल्ड एव्हरी, कॉलिन मॅक्लिओड आणि मॅक्लीन मॅक्कार्टी या संशोधक त्रयीने संशोधन सुरू केले. आनुवंशिक घटक किंवा जनुक म्हणजे डीएनए. त्यापूर्वी अनेक वर्षे जॉर्ज गॅमॉवसारख्या काही ख्यातनाम संशोधकांना वाटत होते तसे, जनुक म्हणजे प्रथिन नाही. हे प्रथमच यांच्या संशोधनातून निर्विवाद सिद्ध झाले.

मॅक्कार्टी आणि सहसंशोधकांनी गुळगुळीत स्ट्रेप्टोकॉकाय या न्यूमोनिया-संक्रामक जीवाणू वाणातून पाच प्रकारचे रेणू काढले. काही विकरांच्या प्रक्रिया करून ते शुद्ध रूपात आणले. कर्बोदके, मेदपदार्थ, प्रथिने, आरएनए आणि डीएनए हे ते पाच प्रकारचे रेणू. यातील वेगवेगळ्या प्रकारचे रेणू खरखरीत पृष्ठभागधारक न्यूमोनिया-असंक्रामक स्ट्रेप्टोकॉकाय जीवाणूंबरोबर उंदरांच्या वेगवेगळ्या गटांना टोचले. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, आरएनए या प्रकारचे रेणू खरखरीत पृष्ठभागधारक न्यूमोनिया-असंक्रामक स्ट्रेप्टोकॉकाय जीवाणूंबरोबर उंदरांमध्ये अंत:क्षेपित केले. तेव्हा उंदीर जिवंत राहिले. परंतु डीएनएचे रेणू खरखरीत पृष्ठभागधारक न्यूमोनिया-असंक्रामक स्ट्रेप्टोकॉकाय बरोबर उंदरांमध्ये टोचले तेव्हा उंदीर मेले. डीएनएमुळे न्यूमोनिया-असंक्रामक स्ट्रेप्टोकॉकाय संक्रामक स्ट्रेप्टोकॉकायमध्ये रूपांतरित होतात असे नक्की झाले. डीएनए हा रेणू सजीवांचे गुण ठरवतो आणि अनुवांशिकरीत्या पुढील पिढ्यांकडे नेतो ही रेण्वीय जीवशास्त्रातील पायाभूत संकल्पना एव्हरी, मॅक्लिओड आणि मॅक्कार्टी यांच्या ज्ञानातून आणि परीश्रमातून मिळाली.

 अनुवांशिकता ही केवळ कल्पना नाही तो आधार देणारा एक रेणू आहे. तो म्हणजे डीएनएमधील बदल सजीवाची रचना आणि वर्तणूक यात बदल घडवू शकतो. झालेले असे बदल टिकाऊ व हस्तांतरणीय असतात. हा या संशोधनामुळे माहीत झालेला नवा आणि मौलिक पैलू होता. या कामाबद्दलचा शोधनिबंध प्रकाशित झाला होता. त्यातील विचार, संशोधक वर्तुळात हळूहळू स्वीकारले गेले. स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया सारख्या घातक जीवाणूंवर पुन्हा तसेच प्रयोग करून खात्री करण्यास फारसे कोणी संशोधक उत्सुक नव्हते ही बाबही मॅक्कार्टींच्या शोधनिबंधातील संकल्पनांचा लगेच स्वीकार न होण्यात अडसर होती. तपशीलवार तथ्ये आणि माहितीचे काटेकोर विश्लेषण यात अग्रेसर मानला गेलेला हा शोधनिबंध पुढील फक्त दहा वर्षात निदान तीनशे संशोधनात उद्धृत करण्यात आला.

मॅक्कार्टीं आणि सहकारी यांच्या बीज शोधानंतर फक्त नऊ वर्षात वॉटसन आणि क्रीक यांनी डीएनएची संरचना प्रसिद्ध केली आणि तो शोध युगप्रवर्तक मानला गेला.

निवृत्त झाल्यावरही मॅक्कार्टी कार्यमग्न राहिले. रेबेका लान्सफील्ड यांच्याबरोबर, जीवाणू संसर्गाने होणाऱ्या सांध्यांवर आणि हृदयातील स्नायू आणि झडपांवर परिणाम करणाऱ्या संधिवात (ऱ्हुमॅटिक) तापावर मॅक्कार्टी यांनी काम केले. या प्रकल्पात मॅक्कार्टींचे जीवशास्त्राचे आणि वैद्यकाचे ज्ञान उपयोगी पडले. मॅक्कार्टी यांच्यापूर्वी उच्च अधिकार पदावर असण्याचा रॉकफेलर रूग्णालयामधील संधिवात तापाचे रुग्ण उपलब्ध होणे हा घटकही मोलाचा ठरला. अमेरिकन नौसेनेत दुसऱ्या महायुद्ध काळात मॅक्कार्टी लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत होते त्यामुळे त्यांना आरमारी रुग्णालयामधील रोग्यांच्या रक्त, घशातील द्रव इ. चे स्ट्रेप्टोकॉकाय युक्त नमुनेही सहज मिळू शकले.

मॅक्कार्टी यांनी लिहिलेल्या त्यांच्या आठवणींवर आधारित द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल या पुस्तकात या प्रयोगमालिकांचे आणि त्यातून मिळालेल्या माहितीचे विवेचन आहे. एव्हरी आणि मॅक्लिओड यांनी या तिघांचे एकत्र काम सुरु होण्यापूर्वीच पूर्वतयारी कशी केली होती याचेही वर्णन त्यांनी केले आहे.

मॅक्कार्टी यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वूल्फ सन्मान, रॉबर्ट कॉख पदक आणि रॉबर्ट कॉख पुरस्कार, हार्वर्ड विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, अमेरिकेतील सर्वोच्च मानला जाणारा विज्ञान पुरस्कार, अल्बर्ट लास्कर बेसिक मेडिकल रिसर्च ॲवार्ड असे सन्मान मिळाले.

मॅक्कार्टी चौदा वर्षे रॉकफेलर विद्यापीठाच्या रूग्णालयामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच हेलन हे व्हिटनी फाउंडेशनच्या आणि अनेक अमेरिकन विद्यापीठांच्या सल्लागार मंडळांवर होते. चाळीस वर्षं जर्नल ऑफ एक्स्पेरिमेंटल मेडिसिनचे संपादक होते.

वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकारामुळे न्यूयॉर्क येथील सेंट ल्यूक रूजवेल्ट विद्यापीठाच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले .

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा