साक, जोनास : ( २९ ऑक्टोबर, १९१४ – २३ जून, १९९५)
न्यूयॉर्क शहरात जोनास साक यांचा जन्म झाला. जोनास महाविद्यालयात गेले आणि सुरुवातीच्या काळात जरी त्यांना कायद्याचे शिक्षण घ्यावे असे वाटत होते तरी नंतर त्यांच्या मनात जीवशास्त्राविषयी कुतुहूल जागृत झाले आणि त्यांनी १९३९ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकिय पदवी प्राप्त केली. त्यानंतर वैद्यकीचा व्यवसाय न करता त्यांनी आपला पुढचा मार्ग वैद्यकीय संशोधनाचा आहे असे ठरविले आणि माऊंट सिनाई इस्पितळात त्यांनी संशोधक डॉक्टर म्हणून आपले कार्य सुरु केले. १९४२ मध्ये मिशिगन विद्यापीठात त्यांना एन्फ्लुएंझा विषाणूंवर लस शोधण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि रोगपरिस्थिती विज्ञान शाखेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक देखील झाली. त्या वेळी एन्फ्लुएन्झा विषाणूचा शोध नुकताच लागला होता आणि त्यांच्या विरुद्ध लस तयार करण्याचे आव्हान मोठे होते. न्यूयॉर्क विद्यापीठातील त्यांचे मार्गदर्शक आणि मित्र थॉमस फ्रान्सिस यांनी त्यांना लस निर्मिती कशी करावी हे शिकविले होते. त्यामुळे त्यांना या लसीची निर्मिती करण्यात यश आले. १९४७ मध्ये त्यांची नेमणूक पिट्सबर्ग विद्यापीठाच्या वैद्यकीय संस्थेतील विषाणू प्रयोगशाळेच्या निदेशक पदावर झाली. या ठिकाणी कार्यरत असतांना त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय शिशु अर्धांगवायू प्रतिष्ठानकडून (आताची मार्च ऑफ डाईम्स ही संस्था) अनुदान मिळाले आणि त्यांनी पक्षाघाती पोलिओ या रोगची लस तयार करण्याचे काम सुरू केले.
अमेरिकेत पोलिओची पहिली जीवघेणी साथ १८९४ मध्ये व्हरमॉण्ट या प्रांतात पसरली होती. या रोगाचे विषाणू मध्यवर्ती चेतासंस्थेवर हल्ला करतात आणि त्यामुळे स्नायू शिथिल आणि दुबळे होतात. अर्धांगवायूचा झटका येतो आणि मूल दगावण्याचा मोठा धोका असतो. जी मुले बरी होतात त्यांचे हात पाय कायमचे अधू होतात आणि जन्मभर अपंगावस्थेत त्यांना जीवन कंठावे लागते. अमेरिकन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतांना फ्रँकलिन रूझवेल्ट यांना ३९ व्या वर्षी पोलिओ झाला होता. त्यामुळे त्यांचे पाय कायमचे अधू झाले होते. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मार्च ऑफ डाईम्स या संस्थेची स्थापना करण्यास मदत केली आणि तिच्याच मार्फत नंतर साक यांना भरघोस आर्थिक मदत मिळाली.
१९५० च्या आसपास त्यांचे पोलिओवरचे संशोधन सुरू झाले. त्यावेळी पोलिओने अमेरिकेत हजारो मुले या रोगामुळे अपंग होत होती आणि रोगाची साथ पसरत चालली होती. त्यांच्या पालकांमध्ये खूपच भीतीचे वातावरण होते. अशा वेळी साक यांना या दुर्धर विषाणू रोगाविरुद्ध लस निर्माण करण्यात यश आले. त्यांनी त्यावेळी जिवंत निर्विष केलेले विषाणू न वापरता फॉर्माल्डिहाइड द्रावणाने मारून टाकलेले विषाणू वापरून पोलिओ प्रतिबंधक लस निर्माण केली. साक यांनी हजारो माकडांवर केलेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आपल्या संस्थेच्या प्रांगणातील बालकांवर या लसीचा प्रयोग केला आणि त्याच वेळी आपल्या स्वतःला. पत्नीला आणि तीन मुलांनासुद्धा त्यांनी ही लस टोचली.
थॉमस फ्रान्सिस यांच्या मार्गदर्शनाखाली १९५४ मध्ये ६ ते ९ वर्ष गटांतील दहा लाखाहून अधिक मुलांचे लसीकरण करण्यात त्यांना यश आले. त्यांनी आपल्या शोधाचे निष्कर्ष अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकात जाहीर केले. त्यांनी आपल्या शोधाचे एकस्व (पेटंट) देखील घेतले नाही.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी एका विशेष समारंभात व्हाईट हाऊस मध्ये जोनास साक यांचा सत्कार केला आणि त्यांना १९५५ मध्ये मानपत्र दिले.
१९६२ मध्ये साबिन (S–हायपरलिक) यांची तोंडावाटे घेण्याची पोलिओ प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आणि या दोन्ही लशींच्या एकत्रित उपयोगामुळे जगभरातून पोलिओ हटविण्यात यश आले. २०१३ साली सर्व देशांमधून केवळ ४१६ पोलिओचे रुग्ण नोंदले गेले. त्यातील बरेच रुग्ण आफ्रिकेतील अविकसित देशात होते.
जोनास साक यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारात कॉमनवेल्थ पेनिन्सिल्व्हानियाच्या राज्यापालांतर्फे पदक, न्यूयॉर्क विद्यापीठातर्फे साक यांच्या नावे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, लास्कर पुरस्कार, जिमी कार्टर या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या हस्ते अध्यक्षीय पदक, रोटरी इंटरनॅशनलतर्फे साक यांचा २४ ऑक्टोबर हा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय पोलीओ दिन म्हणून जाहीर झाला.
संदर्भ :
- About Jonas Salk-Salk Institute for Biological Studies –Salk Institute for Biological Studies- Retrieved February 22, 2016.
- A Science Odyssey People and Discoveries Salk produces polio vaccine.pbs.org Retrieved March 3, 2016.
समीक्षक : रंजन गर्गे