नारळासारखा दिसणारा आणि त्याच्यासारखा उंच व सरळ वाढणारा एक वृक्ष. पोफळी वृक्ष अॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅरेका कॅटेचू आहे. सामान्य भाषेत या वृक्षाला व त्याच्या फळांना सुपारी असे नाव आहे. तो मूळचा मलेशिया किंवा फिलिपीन्स येथील असावा, असे मानतात. आशिया आणि पूर्व आफ्रिका या खंडांत पोफळी वृक्ष आढळत असून भारत, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, चीन वगैरे देशांत त्याचा प्रसार झालेला दिसून येतो. भारतात महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय तसेच अंदमान-निकोबार या राज्यांत पोफळीचे वृक्ष आढळून येतात.

पोफळी (अॅरेका कॅटेचू) : (१) बाग, (२) फुलोरा, (३) कच्ची व पिकलेली फळे.

पोफळीचा वृक्ष १२–३० मी. उंच वाढतो. खोड सरळ, गुळगुळीत व वलयांकित राखाडी रंगाचे असते. पाने ६–९ संयुक्त व पिसांसारखी असून पर्णिका १-२ मी. उंच आणि ३०–६० सेंमी. लांब असतात. पर्णवृंत म्हणजे देठ, पान आणि खोड या दरम्यानचा भाग मोठा व विस्तारित असतो. छद दुहेरी, आक्रसलेला आणि गुळगुळीत असतो. नर-फुले आणि मादी-फुले एकाच कणिशात येतात. मादी-फुले खाली, संख्येने कमी व एकेकटी किंवा २-३च्या झुबक्यात असतात. नर-फुले वर, लहान, संख्येने अधिक व वृंतहीन असतात. फळ आठळीयुक्त, गोलाकार व सु. ४-५ सेंमी. लांब असते. ते कच्चे असताना कवच हिरवे असते व त्यांतील बी मऊ असते. फळ पक्व झाल्यावर नारिंगी किंवा लाल होते. ते सुकल्यानंतर बी टणक होऊन तिचा रंग करडा तपकिरी होतो. पोफळीचे फळ हे खरे दृढफळ नसून ते आठळीयुक्त फळ आहे. पोफळ फळाची कठीण साल काढल्यावर मिळणाऱ्या बीजाला सुपारी म्हणतात.  सुपारीचे बी वाळवून पांढरी सुपारी मिळते. सुपारीचे बी पाण्यात उकळले की सुपारीचा रंग तांबडा होतो आणि तिला भरडी सुपारी म्हणतात. सुपारीचे बी दुधात उकळून वाळवले की ‍ तिच्यापासून चिकणी सुपारी तयार होते.

सुपारी कृमिनाशक म्हणून खातात. कच्च्या सुपारीचा रस सारक म्हणून वापरतात. जनावरांत चपटकृमीचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना सुपारी खाऊ घालतात. सुपारीपासून कात बनविता येतो. सुपारी चघळण्याने लाळ अधिक पाझरते. तसेच दात किडण्यापासून वाचतात. परंतु ती सतत चघळल्यास दात काळे पडतात व ते हिरड्यांपासून सुटू शकतात. सुपारीच्या सेवनाने श्वासाची दुर्गंधी दूर होते, तसेच पचनास मदत होते. सुपारीच्या अतिसेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. मूत्रविकार, मुतखडा आणि योनिमार्गाच्या विकारांवर औषध म्हणून सुपारी वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content