शील, कार्ल विल्हेल्म : ( ९ डिसेंबर, १७४२ – २१ मे, १७८६ )

कार्ल विल्हेल्म शील यांचा जन्म जर्मनीमधील स्ट्रालसंड गावी झाला. हे गाव जर्मनीत असले तरी स्वीडिश अधिपत्याखाली होते. त्यांचे वडील जॉकीम शील हे जर्मन होते आणि धान्याचे व्यापारी होते. त्यांच्या मित्रांनी कार्ल शील यांना विविध औषधांची चिकित्सापत्रे (प्रिस्क्रिप्शन्स वाचायला शिकविली आणि विविध रसायनांची माहिती सांगितली. औषध प्रणालींच्या नियमावलीची माहिती त्यांनी याच काळात करून घेतली.

वयाच्या चौदाव्या वर्षी कार्ल यांना गॉथेन्बर्ग येथे औषधशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी पाठविले होते. या ठिकाणी त्यांना आठ वर्षे शिकाऊ उमेदवार म्हणून राहावे लागले. हे शिकत असतांना त्यांनी आपले रसायनशास्त्राचे प्रयोग संध्याकाळनंतर करून पाहावयास सुरुवात केली कारण त्यांना त्या विषयाची गोडी निर्माण झाली होती. त्यांनी त्यासाठी फ्रेंच रसायनतज्ज्ञ निकोलस लॅमेरी, जर्मन रसायन प्राध्यापक कॅस्पर न्यूमन, जोहान कुंकेल आणि जॉर्ज स्टेहल यांच्या पुस्तकांचे भरपूर वाचन केले होते.  इ.स. १७६५    मध्ये त्यांनी स्वीडनमधील माल्मो या गावी एका डॉक्टरांच्या अनुभवी मदतनीसाबरोबर काम करावयाला सुरुवात केली. त्यांचा त्यावेळी लुंड विद्यापीठातील स्वीडिश शरीरविज्ञानाचे प्राध्यापक अँडर्स रेटझीस यांच्याबरोबर संबंध आला. त्यांनतर कार्ल शील यांची पुढील दोन वर्षे स्टॉकहोम आणि पाच वर्षे उपसाला या ठिकाणी व्यतीत केली आणि त्या कालावधीत अनेक नव्या शोधांची नोंद केली. या काळात त्यांची ओळख स्वीडिश रसायन तज्ज्ञ टॉर्नबर्न ब्रॅगमन यांच्याबरोबर झाली. इ.स. १७७५ मध्ये त्यांनी औपचारिकपणे डॉक्टरच्या मदतनिसाचा अभ्यासक्रम पुरा करीत परीक्षा दिली. त्यांना रॉयल स्वीडिश विज्ञान अकॅडेमीचे सदस्य म्हणून स्वीकारण्यात आले. या अकॅडेमीतर्फे देण्यात येणाऱ्या मानधनाचा उपयोग त्यांनी आपले रसायनशास्त्राचे प्रयोग करण्यासाठी खर्च केले.

टॉर्नबर्न ब्रॅगमन यांनी कार्ल शील जेथे काम करीत होते तिथून साल्ट पीटर या नावाने ओळखले जाणारे पोटॅशियम नायट्रेट विकत घेतले होते. परंतु त्यांची तक्रार अशी होती की आम्लाच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून लाल रंगाच्या वाफा येतात. त्यावर कार्ल शील यांनी दिलेले विवरण त्यांना एव्हढे भावले की त्यांनी शील यांना मँगॅनीज डायऑक्साईड या रसायनाच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. कार्ल शील यांनी हवेचा अभ्यास केला. त्यावेळी रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी हवा हे आवश्यक परंतु त्यात भाग न घेणारे माध्यम समजले जात होते. त्यांच्या अभ्यासातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की हवा हे दोन वेगवेगळ्या घटकांनी बनलेले मिश्रण आहे. एका घटकाचे नामकरण त्यांनी अग्नी तत्त्व (ऑक्सिजन) असे केले तर दुसऱ्या घटकाला त्यांनी ओंगळ (नायट्रोजन) असे संबोधले. त्यातील अग्नी तत्त्व असलेली हवा श्वास घेण्यासाठी आवश्यक आहे आणि ओंगळ हवा त्यासाठी उपयुक्त नाही असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोटॅशियम नायट्रेट, मँगॅनीजडाय ऑक्साईड, सिल्वर कार्बोनेट आणि पारद ऑक्साईड या पदार्थांच्या ज्वलनाचा अभ्यास केला. या सर्व अभ्यासातून आणि प्रयोगांमधून त्यांनी ऑक्सिजनचा शोध लावला होता. त्यांचे हे निष्कर्ष १७७७ मध्ये: हवा आणि अग्नीतत्त्व यावरील रासायनिक प्रबंध या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. परंतु जोसेफ प्रिस्टले आणि अँटोनी लव्हाजीए यांनी ऑक्सिजनवरच्या आपल्या प्रयोगांचे निष्कर्ष त्यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे ह्या शोधाचे श्रेय त्यांच्याकडे गेले. आपल्या ह्या प्रबंधात कार्ल शील यांनी उष्णतेचा प्रवाह वहन आणि अभिसरण या दोन वेगवेगळ्या मार्गांनी वाहू शकतो असेही नमूद केले होते. उष्णतेचा प्रवाह उत्सर्जन या पद्धतीने देखील वाहतो हे नंतर सिद्ध करण्यात आले होते.

१७७६ मध्ये त्यांना मँगेनीज डाय ऑक्साईडचे विश्लेषण करतांना क्लोरीन वायूचा आणि बेरियम हायड्रोक्साईडचा शोध लागला. त्याच्या नंतरच्या वर्षात आर्सेनिक या धातूवर संशोधन करतांना अर्साईन म्हणजे आर्सेनिक हैड्रॉइड आणि शील ग्रीन (हिरवा रंग) म्हणजे कॉपर आर्सेनाईट यांचा शोध लावला. १७७८  मध्ये त्यांनी कॅलोमेल बनविण्याची नवीन पद्धत शोधून काढली आणि मॉलिब्डीनम या धातूचा शोध लावला. फॉस्फरस या मूलतत्त्वाची मोठया प्रमाणावर उत्पादन करण्याची रीत त्यांनी शोधून काढली होती. त्यामुळे स्वीडन देश आगपेटयांचे उत्पादन करून निर्यात करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ शकला होता. १७८० मध्ये त्यांनी दुधात जो आंबटपणा निर्माण होतो त्यासाठी जबाबदार असलेले संयुग हे लॅक्टिक आम्ल असते हे सिद्ध केले होते. इ.स. १७८१ मध्ये त्यांनी टंगस्टन या धातूचा शोध लावला. या शिवाय त्यांनी सायट्रिक आम्ल, ग्लिसरॉल, हायड्रोजन सायनाईड, हायड्रोजन फ्ल्युओराइड आणि हायड्रोजन सल्फाईड या संयुगांचे देखील शोध त्यांनी लावले आहेत. १७८३ मध्ये त्यांनी प्रशियन निळ्या रंगाचे विश्लेषण केले आणि त्यात प्रुसिक आम्ल म्हणजे हायड्रोजन सायनाईड हे संयुग असते असे सिद्ध केले. या आम्लाचे विषारी परिणाम माहिती नसताना त्यांनी त्याची चव घेऊन पाहिली होती आणि त्याची नोंद करून ठेवली होती.

वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले.

 समीक्षक : रंजन गर्गे