बुकनर, एडवर्ड : ( २० मे, १८६० – १३ ऑगस्ट, १९१७)

एडवर्ड बुकनर यांचा जन्म जर्मनीतील म्यूनिक या शहरात एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील अर्नस्ट बुकनर म्यूनिकमधील लुडविग मॅक्सीमिलीयन विद्यापीठातील न्यायवैद्यक (फोरेन्सिक मेडिसिन) विषयाचे प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी होते. त्यांची आई फ्रेडेरिक मार्टिन रॉयल कोर्टाच्या कोषागार अधिकारी होत्या. एडवर्ड यांचे भाऊ हॅन्स प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते.

एडवर्ड यांनी मॅक्सिमिलीयन जिम्नॅशियम नावाच्या माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. एडवर्ड यांनी पुढील शिक्षणासाठी टेक्निकल युनिव्हर्सिटी, म्यूनिक येथे प्रवेश घेतला. आर्थिक मदतीच्या अभावी त्यांना शिक्षणाऐवजी खाद्यपदार्थ टिकवून डबाबंद करण्याच्या कारखान्यात नोकरी करण्याची पाळी आली. रसायनशास्त्र विषयामध्ये त्यांना अधिक आवड निर्माण झाली. म्यूनिकमधील बव्हेरियन अकॅडेमीमध्ये प्राध्यापक ॲडॉल्फ वॉन बेयर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी म्यूनिकमधील वनस्पतीशास्त्र विभागातील कार्ल वॉन नेगेली यांच्यासमवेत वनस्पतीशास्त्र विषयाचा अभ्यास सुरू केला. साखरेचे किण्वनक्रियेद्वारे अल्कोहोल कसे तयार होते याचा अभ्यास त्यांनी केला. किण्वन क्रियेबद्दल सखोल संशोधन म्यूनिक विद्यापीठातील प्राध्यापक असलेले त्यांचे बंधू हँस यांच्याबरोबर त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. आंबविण्याच्या क्रियेमध्ये ऑक्सिजनची जरुरी असते अशी अट नाही, या लुई पाश्चरच्या वक्तव्याविरोधात एडवर्ड यांनी किण्वन क्रियेमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व असते हे दाखवून दिले. यीस्ट (किण्व) शिवाय किण्वन होऊ शकते हे सिद्ध केले. त्यांच्या संशोधनानंतर एडवर्ड यांना लॅमोन्ट शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांचे पोस्ट डॉक्टरेटचे काम पूर्ण झाले.

एडवर्ड यांना डॉक्टरेटचे मार्गदर्शक ॲडॉल्फ वॉन बेयर यांच्या प्रयोगशाळेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. पुढे ते म्यूनिक विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक झाले. थोड्याच कालावधीत वॉन बेयर यांच्याकडून मिळालेल्या अनुदानामुळे त्यांना स्वत:ची प्रयोगशाळा उभारता आली. किण्व पेशीमध्ये काही बिघाड झाल्यामुळे ती फुटते असे संशोधन त्यांनी केले. परंतु, प्रयोगशाळेच्या पदाधिकाऱ्यांना यामधून काही निष्पन्न होणार नाही असे वाटून तीन वर्षांसाठी त्यांचे संशोधन बंद केले. १८९५ साली एडवर्ड यांना क्यैल विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली आणि त्यांनी विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ टी. क्युरीयस यांच्या प्रयोगशाळेत काम करण्यास सुरुवात केली.

जर्मनीच्या ट्युबिंगेन विद्यापीठात १८९६ साली विश्लेषण औषधी रसायनशास्त्राचे विशेष प्राध्यापक म्हणून एडवर्ड रुजू झाले. त्यांचे वडील बंधू हायजीन इन्स्टिट्यूट, म्यूनिकमध्ये संचालक मंडळाचे सदस्य होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रयोगांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा त्यांना सहज उपलब्ध झाल्या. त्याचवर्षी एडवर्डला साखरेचे मद्यामध्ये रुपांतर करणारे झायमेझ (Zymase) संप्रेरक अचानक सापडले. एडवर्ड बुचनरने मद्य तयार करण्यासाठी लागणारी आंबविण्याची क्रिया ही यीस्टशिवाय होऊ शकते या शीर्षकाचा निबंध प्रसिद्ध केला. त्यावेळी अनेक शास्त्रज्ञांच्या शंका दूर करण्यासाठी त्यांना जवळपास १७ निबंध प्रसिद्ध करावे लागले.

बर्लिन येथील रॉयल अकॅडेमी ऑफ ॲग्रिकल्चर या संस्थेने एडवर्ड यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. बर्लिन विद्यापीठाने त्यांना अध्यक्षपद दिले. झायमोसीस (‘Zymosis’) नावाचे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले.

एडवर्ड बुकनर यांना १९०७ साली जीवरसायनशास्त्रातील संशोधनाबद्दल तसेच सजीव पेशीशिवाय आंबविण्याची क्रिया होऊ शकते या संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना ब्रेस्ल्यू विद्यापीठात सायकॉलॉजिकल केमिस्ट्री विषयाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच वुर्झबर्ग विद्यापीठात त्यांना प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. म्यूनिकमधील आपल्या बंधूंच्या प्रयोगशाळेत काम करीत असताना किण्वामधील अर्काची रोगप्रतिकारकता कशी वाढविता येईल यावर त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. १९०४-०५ या कालावधीत त्यांची जर्मन केमिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

पहिल्या महायुद्धात ते सामील झाले आणि रुमानियामध्ये शत्रूच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी होऊन लष्कराच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Eduard Buchner, Biographical, Nobel Prize.
  • Eduard Buchner, Childhood, life.
  • Eduard Buchner, Facts,
  • Eduard Buchner | German Biochemist | www.Britannica.com.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा