ओझोन किंवा ट्रायऑक्सिजन हे O3 रेणुसूत्र असलेले ऑक्सिजनचे एक प्रारूप (allotrope) आहे. याच्या एक रेणूत ऑक्सिजनचे तीन रेणू असून त्याची संरचना खालीलप्रमाणे:

ओझोन संरचना

 

ह्या वायूच्या  दाहक वासानुरूप त्याला  ozon  ह्या मुळातील  ग्रीक भाषेतील शब्दार्थान्वये  नाव दिले गेले.

गुणधर्म : प्रयोगशाळेतील तापमानाला ओझोन   फिकट निळ्या रंगाचा उग्र वास असलेला वायू असतो. ह्याचा द्रवणांक  -१९२ से.  तर उत्कलनांक  -११२ से. आहे. घन  किंवा द्रव स्थितीत तो गडद निळ्या रंगाचा  असतो.  ऑक्सिजन हा  जीवनाला अतिशय आवश्यक प्राण-वायू , तर त्याचा हा ‘थोरला भाऊ’ प्राण-घातक असे हे विचित्र नाते आहे.

उत्पादन :  निसर्गात ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासून सूर्यकिरणांद्वारे होते.  पृथ्वीवरच्या वातावरणातील स्थि​तांबरामध्ये (stratosphere)  २३९ नॅनोमीटर तरंगलांबी असलेल्या अतिनील किरणांच्या मदतीने  हवेतील ऑक्सिजनवर होणाऱ्या रासायनिक क्रियेतून ओझोन निर्माण होतो. विजा पडण्याच्या प्रक्रियेतही हा वायू तयार होतो. अर्थातच त्यावर कोणतेच नियंत्रण नाही. परंतु ओझोन अतिशय अभिक्रियाशील असल्याने वातावरणातील समांगी  भंजनाद्वारे (homolytic fission)  निर्मिलेल्या ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्साइड किंवा हॅलोजन ह्यांच्या मूलकाबरोबर (radical) त्याचा सहज संयोग होतो आणि ओझोन आपोआप नष्टसुद्धा  होतो . निसर्गातील हे चक्र पृथ्वीच्या उत्पत्तीपासून सुरू आहे.  ओझोन पृथ्वीभोवतालच्या क्षोभावरणातसुद्धा  (troposphere ) निर्माण होतो.  परंतु त्याची उत्पत्ती पृथ्वीवरील किंवा तिच्या अगदी नजीकच्या अवकाशाशी संबंधित  रासायनिक  क्रियांमुळे होत असते.   प्रयोगशाळेत ऑक्सिजन वायूवर विद्युत विसर्जनाद्वारे (electric discharge) ओझोन बनविला जातो. विविध मात्रांमध्ये ओझोनची निर्मिती करण्यासाठी उपकरणे उपलब्ध आहेत.

मानवावरील परिणाम : मानवाचे अस्तित्व नसलेल्या  ​स्थि​तांबरात  तारक, तर मानवाच्या  सान्निध्यातील क्षोभावरणात  मारक अशा  परस्परविरोधी ​भूमिका ओझोन​बजावतो.  सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांना शोषून घेण्याचे कार्य  स्थितांबरातील ओझोन करीत आल्याने मानवाचा तो रक्षणकर्ता ठरला आहे. ह्याउलट मानवानेच निर्माण केलेल्या विविध रसायनांच्या परिणामांमुळे होणारी ओझोनची  निर्मिती ही मानवाला अतिशय घातक असल्यामुळे क्षोभावरणात तो मानवाला मारक ठरतो. त्याच्या विविध मात्रेतील अस्तित्वाने श्वसनसंस्थेचे अनेक विकार उद्भवतात.  हवेत ओझोन अल्प प्रमाणात असला तरी त्याच्या अगदी थोड्याशा  (१ मायक्रोमोल म्हणजे साधारण  ५० ppm )  अस्तित्वाने सुद्धा डोळे चुरचुरणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात. ह्यापेक्षा अधिक मात्रेत ओझोन शरीरात गेल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.

रासायनिक क्रिया :  ओझोन अतिशय प्रभावी ऑक्सिडीकारक (oxidiser) आहे. म्हणजेच अनेक पदार्थांचे ऑक्सिडीकरण(oxidation) तो सहजासहजी घडवून आणतो.  अर्थातच अशा प्रक्रियेत ओझोनचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये होत असते.

व्दि- आणि त्रिबंधी (double- and triple bonded) सेंद्रिय पदार्थांबरोबरची ओझोनची रासायनिक क्रिया ही अतिशय महत्‍त्वाची आहे. अशा पदार्थांतील दोन कार्बन अणूंमधील सर्व व्दि- आणि त्रिबंध तुटून त्यावर ऑक्सिजनचे प्रत्यारोपण ह्या क्रियांतून घडते.  सर्व प्रकारची वैविध्यपूर्ण हायड्रोकार्बने भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने  त्यांपासून इतर उपयुक्त रसायने बनविण्यासाठी ह्या प्रक्रियेचा विस्तृत वापर रासायनिक उद्योगांमध्ये केला जातो.

ह्या प्रकारच्या रासायनिक क्रियेमुळेच ओझोनचा उपयोग कीटकनाशक म्हणून तसेच पाण्यात सूक्ष्मजीवनाशक म्हणून केला जातो. कृमी आणि सूक्ष्मजीवांच्या पेशीतील सेंद्रिय पदार्थांतील कार्बन बंध ओझोन तोडू शकतो आणि त्यामुळे कृमी नष्ट पावतात.

समीक्षक – श्रीनिवास सामंत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content