पांढऱ्या बिडात निकेल व क्रोमियम मिसळून तयार होणाऱ्या मिश्रधातूंचा हा एक समूह आहे. नाय-हार्ड हे त्याचे व्यापारी नाव आहे. याच्या अंतर्गत रचनेत मुक्त स्वरूपातला कार्बन नसतो. सर्व कार्बन जखडलेल्या स्वरूपात असतात. अंतर्गत रचनेत कार्बाइड, मार्टेन्साइट व काही प्रमाणात शिल्लक ऑस्टेनाइट हे घटक असतात. निकेलमुळे ऑस्टेनाइट पर्लाइट हे रूपांतर रोखले जाते, त्याऐवजी मार्टेन्साइट व शिल्लक ऑस्टेनाइट तयार होते. क्रोमियममुळे मुक्त स्वरूपातील कार्बन रोखला जातो व कार्बाइड तयार होण्यास मदत होते. घर्षणामुळे होणाऱ्या झिजेस विरोध करणाऱ्या (Abrasion Resistant) मिश्रधातूंचे ASTM A 532 हे मानक आहे, त्यात नाय-हार्डच्या विविध प्रकारांचा समावेश केलेला आहे.

नाय-हार्डच्या प्रकारची निवड व नियंत्रण : घर्षणाने सतत झीज होत राहते. त्याचे प्रमाण हे काठिण्य व अंतर्गत रचनेतील कार्बाइडचे प्रमाण यावर अवलंबून असते. जिथे झिजविरोध ही प्रमुख गरज आहे व आघातविरोध ( Impact Resistance) हा दुय्यम आहे; तेथे Class 1 Type A (नाय-हार्ड – १) हा प्रकार वापरला जातो. जेथे सातत्याने आघात होणार आहे, त्याठिकाणी कमी कार्बन असलेला Class 1 Type B (नाय-हार्ड – २)  हा प्रकार वापरला जातो. कारण त्यामध्ये कार्बाइड कमी असतात व चिवटपणा जास्त असतो. Class 1 Type C (नाय-हार्ड – ३ ) हा प्रकार खास करून ग्राइंडिंग बॉलसाठी वापरला जातो. त्याचे रासायनिक घटक शिघर ओतीव काम करण्यास अनुकूल असतात. Class 1 Type D (नाय-हार्ड – ४ ) या प्रकारात निकेल व क्रोमियम जास्त प्रमाणात असतात. पहिल्या तीन प्रकारात कार्बाइड हे M3C (Iron carbide) या स्वरूपात असतात व त्याचे सलग जाळे असते. नाय-हार्ड – ४ मध्ये M7C3 या स्वरूपात क्रोमियम कार्बाइड असतात. कार्बाइडच्या जाळ्याची सलगतासुद्धा तोडली गेलेली असते. त्यामुळे आघाताखाली तुटण्याची (Fracture) शक्यता कमी होते. या प्रकारचा गंजविरोध (Corrosion Resistance) हादेखील चांगला असतो. उष्णतोपचार करून नाय-हार्डचे गुणधर्म आणखी सुधारता येतात. यासाठी प्रामुख्याने ताण समायोजन आणि पुनःतापण हे उष्णोपचार केले जातात.

वर्ग प्रकार

रासायनिक घटकांचे प्रमाण (%)

C Mn Si Ni Cr Mo P S
1 A २.८ ते ३.६० २.०० कमाल ०.८० कमाल ३.३० ते ५.०० १.४ ते ४.०० १.०० कमाल ०.३० कमाल ०.१५ कमाल
1 B २.४० ते ३.०० २.०० कमाल ०.८० कमाल ३.३० ते ५.०० १.४० ते ४.०० १.०० कमाल ०.३० कमाल ०.१५ कमाल
1 C २.५० ते ३.७० २.०० कमाल ०.८० कमाल ४.०० कमाल १.०० ते २.५० १.०० कमाल ०.३० कमाल ०.१५ कमाल
1 D २.५० ते ३.६० २.०० कमाल २.०० कमाल ४.५० ते ७.०० ७.०० ते ११.०० १.५० कमाल ०.१० कमाल ०.१५ कमाल

उपयोग : इतर समानधर्मी मिश्रधातूंपेक्षा नाय-हार्ड तुलनेने स्वस्त असते. त्यामुळे त्याचा खाणकामातील बॉल मिल लायनर व ग्राइंडिंग बॉलसाठी व्यापक प्रमाणात उपयोग केला जातो. नाय-हार्ड – १ हे ॲश वाहिनी, स्लरी पंप, रोलहेड, कोक क्रशरचे भाग, ब्रिक मोल्ड इत्यादीसाठी वापरले जाते. नाय-हार्ड – २ हे क्रशर प्लेट, पल्व्हरायझर पेग यासाठी वापरले जाते. नाय-हार्ड – ३  हे ग्राइंडिंग बॉलसाठी वापरले जाते. नाय-हार्ड – ४ हे  झीज घडवून आणणारे द्रावण (Abrasing Slurry) हाताळणाऱ्या स्लरी पंपासाठी, तसेच कोल पल्व्हरायझरच्या भागांसाठी वापरले जाते.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    समीक्षक : डॉ. पी.पी. देशपांडे