फडके, नारायण सीताराम : (४ ऑगस्ट १८९४–२२ ऑक्टोबर १९७८). युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्यसमीक्षक. जन्म नगर जिल्ह्यातील कर्जतचा. त्यांचे वडील सीताराम म. फडके हे वेदान्ती होते. वेदान्तनिदर्शन (१९१३) हा व्यासंगपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. फडक्यांचे प्राथमिक शिक्षण वडूज (जि. नासिक), बार्शी (जि. सोलापूर), पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. १९१७ साली ते एम्.ए. झाले. तत्पूर्वीच, १९१६ मध्ये न्यू पूना कॉलेजात (आजचे स. प. महाविद्यालय) ते प्राध्यापक झाले. महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी ह्या नोकरीचा राजीनामा दिला (१९२०) आणि केसरी व मराठा ह्या पत्रांच्या कचेरीत उपसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. तथापि महात्मा गांधींची काही धोरणे न पटल्यामुळे ह्या चळवळीपासून दूर होऊन पुन्हा प्राध्यापकी करण्याचा, तसेच राजकारणात न पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर दिल्ली, सिंध हैदराबाद, नागपूर, कोल्हापूर येथील महाविद्यालयांतून तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून १९४९ मध्ये ते निवृत्त झाले. मध्यतंरी, म्हणजे १९४२ साली, पहिली पत्नी हयात असताना त्यांनी कमल दीक्षित ह्यांच्याशी दुसरा विवाह केला. उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी मोठा लौकिक संपादिला होता. प्राध्यापक असताना रत्नाकर हे मासिक (१९२५) आणि झंकार हे साप्ताहिक (१९४०) त्यांनी सुरू केले. १९५१ मध्ये ‘अंजली प्रकाशन’ ह्या संस्थेची त्यांनी स्थापना केली. अंजली नावाचे एक नियतकालिकही (वासंतिक व दिवाळी अंक) ते काढू लागले. त्याच वर्षी ते कोल्हापूर सोडून पुण्यास स्थायिक झाले. पुणे येथेच ते निवर्तले.
ना. सी. फडके ‘मेणाचा ठसा’ ही फडके यांची पहिली कथा केरळ कोकिळ ह्या मासिकात प्रसिद्ध झाली (१९१२). अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरीकर्त्रीच्या टेंपरल पॉवर ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. मात्र कादंबरीलेखन हे त्यांचे विशेष कर्तृत्वाचे क्षेत्र ठरले. कला ही कलेसाठीच असते, वाचकांना सौंदर्यदर्शन घडविणे व आल्हाद देणे हेच कादंबरीकाराचे प्रमुख कार्य, ह्या भूमिकेतून त्यांनी प्रमाणबद्ध, आटोपशीर आणि लाघवयुक्त कादंबऱ्यांचे एक युगच मराठीत सुरू केले. कुलाब्याची दांडी (१९२५), जादूगार (१९२८), दौलत (१९२९), अटकेपार (१९३१), निरंजन (१९३२) ह्या त्यांच्या आरंभीच्या कादंबऱ्यांतील प्रणयरम्यता, कुशल, सफाईदार व्यक्तिरेखन, चतुर संवाद आणि मोहक भाषाशैली ह्या गुणांनी वाचकांच्या मनांची पकड घेतली. त्यानंतरच्या उद्धार (१९३५), प्रवासी (१९३७), अखेरचं बंड (आवृ. दुसरी, १९४४) ह्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांतून प्रणयरम्यतेला त्यांनी गंभीर विषयांची जोड दिली आणि महाराष्ट्रातील काही असामान्य व्यक्तिमत्त्वांचे दर्शन त्यांतून घडविले. तथापि हे करीत असताना कल्पितालाही त्यांनी वाव दिला आणि ह्या कादंबऱ्या ‘चरित्रात्मक’ होऊ दिल्या नाहीत. गेल्या पन्नास-साठ वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा उपयोग त्यांनी आपल्या पुढील कादंबऱ्यांतून पार्श्वभूमीसाठी करून घेतला. बेचाळीसचे पत्रीसरकार (झंझावात, १९४८), काश्मीरचे स्वातंत्र्योत्तर राजकारण (जेह्लम, १९४८), गोवामुक्तीचे आंदोलन (उजाडलं ! पण सूर्य कुठे आहे ? १९५०) अशा काही कादंबऱ्या त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ऋतुसंहार (१९५८), कुहू ! कुहू ! (१९६०), ही का कल्पद्रुमांची फळं ? (१९६१), एक होता युवराज (१९६४) ह्या त्यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांपैकी काही होत. हेमू भूपाली ही त्यांची अखेरची कादंबरी अंजलीच्या १९७८ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. सखोल, अनाकलनीय, गूढ व झपाटून टाकणारे जीवनानुभव फडके ह्यांच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येत नाहीत तथापि कांदबरीलेखनाबाबत त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेशी आणि लेखनतंत्राशी त्या नेहमीच सुसंगत राहिल्या. त्यांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. कलंक शोभा (१९३३) ह्या त्यांच्या कादंबरीवरून मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संगृहीत केलेल्या आहेत.
मराठीतील लघुनिबंधाचे ते एक आद्य प्रवर्तक होत. त्यांच्या प्रसन्न आणि लालित्यपूर्ण लेखनशैलीची प्रचीती त्यांच्या लघुनिबंधांतूनही येते. गुजगोष्टी (१९३३), नव्या गुजगोष्टी (१९३७), धूम्रवलये (१९४१) हे त्यांचे महत्त्वाचे लघुनिबंधसंग्रह.
फडके ह्यांचे समीक्षात्मक लेखनही विपुल आहे. ‘कलेकरता कला’ ही त्यांची भूमिका, तसेच तंत्रबद्धतेचा आग्रह ह्या लेखनातून सातत्याने प्रकटतात. क्लेटन हॅमिल्टन ह्याच्या द आर्ट ऑफ फिक्शन ह्या ग्रंथाच्या प्रभावाखाली लिहिलेल्या प्रतिभा-साधनात (१९३१), तसेच लघुकथालेखन : मंत्र आणि तंत्र (१९५२) ह्या त्यांच्या ग्रंथात कलेच्या संदर्भातील त्यांच्या तंत्रदृष्टीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते. आपल्या भूमिकेच्या पुष्ट्यर्थ साहित्य आणि संसार (१९३७), वेचलेले मोती (१९४१), प्रतिभाविलास (१९६६) इ. पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. वक्तृत्व, संगीत आणि क्रिकेट ही त्यांची साहित्याखेरीज आणखी काही आवडती क्षेत्रे. श्रेष्ठ वक्त्यांच्या, गायकांच्या आणि क्रिकेट सामन्यांच्या आपल्या आठवणी त्यांनी अनुक्रमे असे वक्ते अशी व्याख्याने (१९६०), नादलुब्धांच्या आठवणी (१९६२), अशा झुंजा असे झुंजार (१९६७) ह्या पुस्तकांत आपल्या खास शैलीत सांगितल्या आहेत.
बाबुराव पेंटर : व्यक्ति आणि कला (संपा. १९५४), किर्लोस्कर : व्यक्ति आणि कला (१९६४), नाट्याचार्य खाडिलकर (१९७२) आणि खाडिलकरांच्या नाट्यकृती (१९४९) हे फडके ह्यांनी लिहिलेले काही उल्लेखनीय चरित्रग्रंथ. त्यांतून चरित्रनायक आणि त्यांच्या कृती ह्यांचे रहस्योद्ग्राही विवेचन त्यांनी केले आहे. दादाभाई नवरोजी, टेरेन्स मॅक्स्विनी, डी व्हॅलेरा, म. गांधी इ. थोरांची चरित्रे त्यांनी मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली आहेत.
फडके ह्यांनी नाट्यलेखनही केले आहे (युगांतर १९३१, संजीवन १९३४, काळे गोरे १९४५, जानकी १९५० इ.) तथापि नाटककार म्हणून ते फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनात माझ्या साहित्यसेवेतील स्मृती (१९४३) ह्या पुस्तकाचा अंतर्भाव होतो. १९६९ साली माझं जीवन : एक कादंबरी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. स्वतःच्या कादंबऱ्यांची आणि लघुनिबंधांची विस्तृत चर्चा त्यानी अनुक्रमे मी व माझ्या कादंबऱ्या आणि मराठी लघुनिबंधाचा जनक कोण ? (१९७६) ह्या पुस्तकांतून केलेली आहे.
ह्यांखेरीज तर्कशास्त्र, मानसशास्त्र, संततिनियमन इ. विषयांवरही त्यांनी इंग्रजीतून आणि मराठीतून पुस्तके लिहिली आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या १८९ इतकी आहे. रत्नागिरी येथे १९४० साली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ ही किताबत देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या पत्नी कमला फडके (१९१६–८०) ह्यांनीही कथा-कादंबऱ्यादी लेखन केलेले आहे.
संदर्भ :
- देशपांडे, मा. का. प्रो फडके-चरित्र आणि वाङ्मय, पुणे, १९३९.
- देशपांडे, मा. का, संपा. प्रो. फडके ह्यांचे वाङ्मयदर्शन, मुंबई, १९४०.
- पत्की, वि. वा., कोल्हटकर, शि. न. युगप्रवर्तक फडके, मुंबई, १९६७.