भोसले, द. ता. : (१० मे १९३५). दशरथ तायाप्पा भोसले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक व लोकसंस्कृतीचे अभ्यासक. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सरकोली (ता. पंढरपूर) या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकोली या गावी तर माध्यमिक शिक्षण सांगोला येथे आणि पदवीचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे झाले. पदवी परीक्षेसाठी त्यांना पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तर पदव्युत्तर शिक्षण व पीएच. डी. चे संशोधन पुणे विद्यापीठातून झाले. रविकिरण मंडळाची कविता  या विषयावर त्यांनी पीएच. डी. चे संशोधन वि. म. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, सातारा, विटा, मंचर व पंढरपूर या विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी बत्तीस वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. ग्रामीण साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती संस्था यांचे ते सदस्य होते. द.ता. भोसले हे ग्रामीण साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग असणारे पहिल्या पिढीतील लेखक आहेत. चळवळीच्या निमित्ताने अनेक ग्रामीण साहित्य संमेलने, परिसंवाद व कृतीसत्रे यामध्ये त्यांचा सहभाग होता. कृषी संस्कृती आणि गावगाडा हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे.

कथा, कादंबरी, ललित, समीक्षा, चरित्र व वैचारिक अशा साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी विविधांगी स्वरुपाचे लेखन केले. त्यांच्या काही साहित्‍यकृतींचे हिन्दी व इंग्रजीत भाषांतर झाले आहे. ग्रामीण साहित्य, विनोदात्‍म साहित्य, संस्कृतिचिंतन, चरित्रलेखन व बोलीभाषा हे द. ता. भोसले यांचे लेखनविषय राहिले आहेत. विशेषतः ग्रामीण साहित्य, त्याचबरोबर लोकसंस्कृती विषयांवर त्‍यांनी लेखन केले आहे. कृषीसंस्कृती, लोकविधी, ग्रामीण जीवनाचा समृद्ध अनुभव, बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म आकलन, सामान्य माणसांच्या जगण्याविषयीची संवेदना व भाषेच्या मार्मिक वापरामुळे त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे.

द. ता. भोसले यांनी विपुल प्रमाणात कथात्म साहित्य लिहिले. ग्रामवास्तवाच्‍या गंभीर कथांबरोबरच विनोदात्‍म व रूपककथाही त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथांमधून मराठी जीवनाचे ग्रामीण चित्रण आले आहे.अल्पभूधारक शेतकरी, मजूर, कष्टकरी हे त्यांच्या कथेचे नायक राहिले आहेत. ग्रामीण जीवनातील दारिद्र्य, भूक, उपासमार, शोषण, लोकमानस, ताणतणाव, बदलत्या गावगाड्याविषयी त्‍यांनी लिहिले. जगण्यावर विलक्षण प्रेम करणारी माणसे, त्यांचे स्वभाव, विसंगती, इरसालपणा त्यांच्या कथांमध्ये येतो. खसखशीचा मळा (१९९९),जन्‍म (२००३),पाळत (२००६),अगं अगं म्हशी (२००६), पाऊस (२००६), अन्न (२००८), मनस्विनी (२००९),आटआटनगरीच्या कथा (२०१५), कथा रत्‍नावली (२०१८), सुखाचा शोध (२०१९) हे त्यांचे कथासंग्रह आहेत. इथे फुलांना मरण जन्‍मता (२००८), मी आणि माझा बाप  (२००८),डायरी एका चंद्राबाईची (२०१८), कवडसे आणि काळोख  (२०२०) या त्यांच्या कादंबर्‍या होत. मी आणि माझा बाप ही त्‍यांची विनोदात्‍म कादंबरी अधिक लोकप्रिय ठरली. तर वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या जगण्यातील अस्वस्थ वास्तव डायरी एका चंद्राबाईची  या कादंबरीमधून आले आहे.

लोकसंस्‍ती स्‍वरूप आणि विशेष  (२००५), संस्‍कृतीच्‍या पाऊलखुणा  (२००८), चावडीवरचा दिवा  (२००८), लोकसंस्‍कृतीः बंध अनुबंध  (२००९), लोकसंस्‍कृतीः दर्शन आणि चिंतन  (२०१८) इत्यादी लोकसंस्कृतीपर लेखन त्यांनी केले आहे. ग्रामीण गावागाडा, कृषीसंस्कृती, सण- उत्सव, देव देवता, त्यांचे उपासक, ग्रामीण आहार,अलंकार, पशूधन या सर्वांविषयीचे चिंतन त्यांच्या संकृतीविषयी लेखनामधून आले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोप पावत चाललेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा सामाजिक व सांस्कृतिक अंगाने त्यांनी विस्ताराने मांडल्या आहेत. ग्रामीण संस्कृती आणि निसर्ग यांच्यातील सुंदर नाते भौगोलिक पर्यावरणासह लोकजीवनाचे अनेक पैलूंचे चित्रण त्यांच्या लेखनात आहे. ग्रामीण बोलीतील शब्दकोश  (२००६) या शब्‍दकोशात त्‍यांनी ग्रामीण बोलीभाषेतील शब्द व त्या शब्दांना असलेले लोकसांस्कृतिक संदर्भ या नोंदी घेतल्या आहेत. लोपलेल्या सुवर्णमुद्रा  या तीन भागातील ग्रंथांमधून बोलीभाषेतील म्हणींचे उदाहरणांसह संकलन आहे.

द. ता. भोसले यांनी समीक्षालेखनही केले आहे. कथा-कादंबरी, कविता, वैचारिक लेखन, आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकाराविषयी त्यांनी समीक्षालेखन केले. उपयोजित स्वरुपाचे हे समीक्षालेखन ऐतिहासिक आढाव्याचे, त्या त्या काळात निर्माण झालेली साहित्यनिर्मिती व वाङ्मयीन अभिरुची याबाबतची चर्चा करणारे आहे.  साहित्य, समाज आणि संस्कृती हा त्यांच्या समीक्षा लेखनाचा केंद्रबिंदू आहे. महात्‍मा फुलेः एक चिंतन  (१९७०), पाठराखण  (२००८), जोती म्‍हणे  (२००९), ग्रामीण साहित्‍यः एक चिंतन  (२००९), शब्द प्रदेशाची पाऊलवाट  (२०११), साहित्‍यःआस्‍वाद आणि अनुभव  (२०१८), एक कवी एक कविता (२०२०) या ग्रंथांमधून त्यांचे समीक्षालेखन आहे. द. ता. भोसले यांचे ललितलेखन हे वैशिष्ट्यपूर्ण आणि आत्मपर स्वरुपाचे आहे. आपला भूतकाळ, गाव, तेथील भौगोलिक परिस्थिती, निसर्गाची बदलती रुपे, त्यातून बहरत जाणारे ग्रामीण लोकजीवन व संस्कृती यांना या ललित लेखनाने अधोरेखित केले आहे. पार आणि शिवार  (२०००), बाळमुठीतील दिवस  (२००५), परिघावरची माणसं  (२००९), आठवणीतले दिवस  (२०१०), संवाद बळीराजाशी  (२०१८) हे त्यांचे ललितलेखनपर ग्रंथ आहेत. तसेच कुमारांचे कर्मवीर (२००३) व लोकोत्तर गाडगेबाबाः जीवन आणि कार्य  (२००८) या दोन चरित्रग्रंथांमधून चरित्रनायकांच्या सामाजिक कार्य स्‍वरूप कथन केले आहे.

भाषेवरची मजबूत पकड, संवादकौशल्य, रसाळ व प्रवाही निवेदन, सूक्ष्म वातावरण निर्मिती, नाट्यमयता, ग्रामीण बोलींचा चपखल वापर, समर्पक अलंकाराचे उपयोजन यामुळे त्यांचे साहित्य वेगळे व वैशिष्ट्येपूर्ण ठरते. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठीचे एकूण सहा पुरस्कारासह महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, भैरुरतन दमाणी पुरस्कार, दै.केसरीच्या वतीने दिला जाणारा न. चिं. केळकर पुरस्कारासह अनेक मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ :

  • इंगोले, कृष्णा (संपा ), ग्रामीण साहित्य आणि वास्तव  (डॉ. द. ता. भोसले गौरव ग्रंथ), स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २०११.
  • कदम, महेंद्र ; जाधव, वामन व सहलेखक (संपा), माती आणि संस्कृती (प्रा. द. ता. भोसले साहित्‍य समीक्षा), बळीवंश प्रकाशन, नांदेड, २०१३.