महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. मंडणगड या तालुक्याच्या गावातून चार किमी. अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर माथ्यापर्यंत जाता येते. या किल्ल्याची उंची पायथ्याच्या मंडणगड गावापासून ३०० मी. आहे.

मंडणगड.

माथ्यावर पूर्ण सपाटी असून गडाला बालेकिल्ला नाही. गडावरील शाळेसदृश्य खोलीच्या बांधकामापर्यंत गाडी जाते. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे गणेश मंदिर. हे मंदिर पायथ्याच्या मंडणगड गावातूनदेखील सहज दिसते. मंदिराचे नुतनीकरण झाल्याचे दिसून येते. मंदिराला लागूनच खालच्या बाजूला मोठा तलाव आहे. या तलावात बारमाही पाणी असते. तलावात उतरण्यासाठी पश्चिमेकडून पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या वाटेवर पूर्वी दरवाजा असावा, असे तेथील अवशेषांवरून दिसून येते. गडावर आणखी एक कोरडा मोठा तलाव दिसून येतो. दोन तलावांमधून पुढे गेल्यावर उजवीकडे एक कबर आहे. कबरीजवळच कुलपाच्या आकाराचे काही दगड आहेत.  कबर ज्या जोत्यावर आहे ते जोते एखाद्या मंदिराचे असावे, असे वाटते. ही कबर छ. शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ दर्यावर्दी आणि मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान याची असावी, असा समज आहे. या कबरीजवळ एक सुबक कोरीवकाम केलेला दगड आहे. कबरीपासून पुढे डावीकडे एका मोठ्या बांधकामाचे जोते आहे. या जोत्याजवळ सिमेंटच्या चौथऱ्यावर २.५ मी. लांबीची तोफ ठेवलेली आहे. या तोफेजवळील मोठ्या जोत्याशेजारी एक बांधीव चर तयार केलेला दिसतो. हा चर जांभ्या दगडात केलेला असून तो नैसर्गिक नाही. असाच एक चर शाळेजवळ आहे. या चराची लांबी दोन फूट व रुंदी एक फूट असून खोली अंदाजे दोन फूट आहे. हा चर का आणि कशासाठी बांधला असावा, याचा अंदाज येत नाही. गडावर तटबंदीचे अवशेष हे फारच कमी प्रमाणात दिसतात. गडावर बांधकामाची पाच ते सहा जोते आहेत.

गडावरील तोफ.

काही इतिहास अभ्यासक मंडणगड किल्ल्याचा इतिहास शिलाहार काळापर्यंतचा सांगतात; तथापि हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला, याचा कोणताही लेखी किंवा पुरातत्त्वीय पुरावा अद्याप उपलब्ध नाही. किल्ल्याच्या एकूण बांधकामावरून ते आदिलशाहीतील असावे, असे वाटते. निजामशाहीचा कोकणातील प्रांत निजामशाही संपुष्टात आल्यावर मोगल व विजापूरकरांनी वाटून घेतला. तेव्हा दक्षिण कोकणातील सर्व किल्ले विजापूरकर आदिलशहाकडे  राहिले. मंडणगडावरील बांधकाम याच काळातील असावे.

गडावरील कोरीव नक्षीकाम असलेला पाषाण.

मंडणगड किल्ला आणि परिसर छ. शाहू महाराजांच्या मराठी साम्राज्यात १७३३ मध्ये होता. सेखोजी आंग्रे राजाज्ञा न मानता या परिसरात कारवाया करीत आहेत, असे एक पत्र उपलब्ध आहे. ३१ मे १७३३ रोजी सेखोजी आंग्रे यांनी बाजीराव पेशवे यांना पत्र लिहिले. त्यामध्ये सेखोजी असे म्हणतात की, ‘अंजनवेल किल्ल्याचे साहाय्य मंडणगड, गोवळकोट व विजयगड हे किल्ले करतात. यांपैकी मंडणगड जिंकून घेतला आहे.’ यावरून असे दिसते की, मधल्या अल्प काळासाठी किल्ला जंजिरेकर सिद्दीकडे होता आणि इ. स. १७३३ मध्ये हा किल्ला आंग्र्यांकडे आला. रामाजी महादेव यांनी इ. स. १७५५ च्या मे महिन्यामध्ये जे सात किल्ले आंग्र्यांकडून घेतले त्यात मंडणगड होता. अखेर इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला.

 

 

 

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग – २, पुणे, १९०५.
  • जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे २०१३.

                                                                                                                                                                समीक्षक : जयकुमार पाठक