रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारातील एक प्रसिद्ध किल्ला. खेड जवळील घेरा पालगडमधील किल्लामाची या गावाजवळून पायवाटेने गडाच्या उत्तरेकडील धारेवर पोहोचता येते.

पालगड.

उत्तरेकडील धारेवर पोहोचल्यावर गडाची तटबंदी व गडावर जाणाऱ्या बांधीव पायऱ्या दिसून येतात. अंदाजे ८० ते १०० जुन्या बांधणीतील पायऱ्या चढून गडाच्या दोन बुरुजांमधील दरवाजाजवळ जाता येते. दरवाजाची कमान सध्या अस्तित्वात नसली तरीही दोन बुरूज व कमान पेलणारे खांब दिसतात. बुरुजांमधून प्रवेश केल्यावर समोर एका मोठ्या वास्तूचे जोते आहे. या जोत्यावर दीड मीटर लांबीची एक तोफ आहे. दरवाजातून आत आल्यावर पायवाट उजवीकडे म्हणजेच पश्चिमेकडे जाते. गडावर बांधकामाची तीन जोती आहेत. गडाच्या मधोमध खडकात खोदलेली एक छोटी विहीर आहे. इतर गिरिदुर्गांप्रमाणे या किल्ल्यावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी नाहीत. उत्तर-पश्चिमेकडील तटबंदीवर एक तोफ उभी जमिनीत रोवून ठेवलेली आहे. गडावर एकूण दोन तोफा आहेत. गडाची तटबंदी व बुरूज दुरवस्थेत आहेत.

पालगड किल्ल्यावरील उभी तोफ.

काही भागांत साधारणतः पाच फुटापर्यंत तटबंदी दिसून येते. शिवकालीन बांधकामातील किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही किल्ल्याला एका पेक्षा जास्त दरवाजे असतात. पण पालगड किल्ल्याला एकच दरवाजा आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची बांधणी मात्र शिवकालीन वाटते. गडावर दुसरा दरवाजा असल्याचे अवशेष अद्यापि दिसून आलेले नाहीत.

तटबंदी, पालगड.

या किल्ल्याचे बांधकाम छ. शिवाजी महाराजांच्या काळात झाल्याचे पुरावे मिळत नाहीत. सभासद बखरीमध्ये महाराजांकडे असलेल्या किल्ल्यांची यादी असून त्यामध्ये पालगडचे नाव नाही. इ. स. १७२६ मध्ये कान्होजी आंग्रे यांचे जंजिरेकर सिद्दीबरोबर पालगड जिंकून घेण्यासाठी युद्ध झाले. या प्रसंगी कान्होजींना पालगड घेण्यात यश आलेले दिसत नाही. कारण इ. स. १७२९ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी पालगड जंजिरेकर सिद्दीकडून घेतला, अशी माहिती मिळते. यावरून हा किल्ला छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत बांधला गेला असण्याची शक्यता आहे. रामाजी महादेव यांनी १६ मे १७६५ रोजी जे सात किल्ले घेतले त्यात पालगड होता. किल्ल्याच्या पायथ्याच्या गावामध्ये साने गुरुजी यांचे स्मारक आहे. पालगड हे साने गुरुजींचे जन्म गाव असून त्यांच्या जुन्या घराचे नुतनीकरण करून स्मारक करण्यात आले आहे.

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
  • जोशी, शं. ना. आंग्रे शकावली, पुणे, १९३९.
  • जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.

                                                                                                                                                                                       समीक्षक : जयकुमार पाठक