महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक किल्ला. गोवा किल्ला असाही उल्लेख करण्यात येतो. हर्णे गावापासून एक किमी. अंतरावर हा किल्ला आहे.

हर्णे किल्ला.

किल्ल्यावर एक कमानयुक्त दरवाजा असून दरवाजात देवडी (ओटा, उंबरा) मात्र दिसत नाहीत. दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडील टेकडीवर बालेकिल्ला दिसतो. किल्ल्याच्या उत्तर व पश्चिमेला समुद्रकिनारा आहे. उत्तरेकडील तटबंदीमध्ये गडाचा उत्तम बांधलेला दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा सध्या बुजवलेला असून किल्ल्याच्या आतील बाजूनेच हा दरवाजा पाहता येतो. पूर्वी हाच उत्तराभिमुख दरवाजा मुख्य दरवाजा म्हणून वापरात होता. या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस प्रशस्त अशा देवड्या असून दरवाजावर मेघडंबरीसदृश्य बांधकामाचे अवशेष दिसतात. दरवाजावर दोन्ही बाजूला तळाशी व्याघ्रसदृश प्राण्याचे शिल्प कोरले आहे. डाव्या बाजूला गंडभेरूंड व त्याने हातापायात ४ हत्ती पकडले आहेत, असे शिल्प आहे.

किनार्‍याजवळील किल्ल्याचे अवशेष.

पूर्वाभिमुख दरवाजातून प्रवेश केल्यावर उत्तरेकडील तटावरून चालत गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीवर जाता येते. पश्चिमेला तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या भागातूनच गडाच्या बालेकिल्ल्यावरील टेकडीवर पोहोचता येते. बालेकिल्ल्यावर ब्रिटिश काळातील यूरोपियन बांधकाम शैलीतील दोन इमारतींचे अवशेष दिसतात. एक इमारत सर्वसामान्य इंग्रजांसाठी, तर दुसर्‍या इमारतीत ब्रिटिश अधिकारी (कलेक्टर) मुक्काम करीत. बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा होता. बालेकिल्ल्याच्या बुरुजाशेजारील दरवाजाचे दोन्ही बाजूंचे खांब दिसतात. कमान मात्र शिल्लक राहिलेली नाही. किल्ल्याची तटबंदी काही भागांत ढासळलेली आहे. किल्ल्याचे सात बुरूज आजही सुस्थितीत आहेत. बालेकिल्ल्यावरील इमारतींच्या अवशेषाशेजारी एक मोठा बांधीव तलाव आहे. याला बारमाही पाणी असते. पण हे पाणी सध्या पिण्यायोग्य नाही. बालेकिल्ला समुद्रापासून ४० फूट उंचीवर आहे. किल्ल्यामध्ये पर्यटकांचा तसेच गावकऱ्यांचा फारसा वावर नसल्याने किल्ल्यात खूप झाडे वाढली आहेत.

किल्ल्यावरील कमानयुक्त दरवाजा.

इ. स. १७५४ मध्ये आंग्र्यांच्या आरमाराने गोवा किल्ल्याजवळ डच कंपनीच्या तीन जहाजांवर हल्ला केला. यात डचांची दोन जहाजे जळाली व तिसरे मोडकळीस आले, तर आंग्य्रांचीही काही जहाजे जळाली. १६ एप्रिल १७५५ च्या सुमारास रामाजी महादेव यांनी आंग्रे यांचे चार किल्ले घेतले. त्यामध्ये गोवा दुर्ग होता. इ. स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या तहानुसार सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबरच हा किल्लादेखील पेशव्यांकडे आला. त्यानंतर इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत अनेक किल्ले त्यांच्या वर्चस्वाखाली आले. कर्नल केनेडी या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला. इ. स.  १८६२ साली किल्ल्यामध्ये १९ सैनिक व ६९ जुन्या तोफा होत्या. आज किल्ल्यामध्ये एकही तोफ पाहायला मिळत नाही.

हर्णे किल्ल्याची बांधणी नक्की कोणाच्या कारकिर्दीत झाली, हे सांगता येत नाही. किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केला तर काही निष्कर्ष काढता येतील. किल्ल्यावरील बांधकाम, दरवाजा इ. अवशेष पाहता किल्ल्याची बांधणी विविध काळांत झाली असावी. उत्तरेकडील दरवाजा आदिलशाही कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे. छ. शिवाजी महाराजांच्या काळात सुवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती करण्यात आली. पुढे आंग्रे व पेशवे काळातही काही डागडुजी झालेली दिसून येते. इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेल्यावर त्यांनी गडावर इमारतींची बांधणी केल्याचे दिसते.

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग – २, पुणे, १९०५.
  • जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.

                                                                                                                                                                                                                      समीक्षक : जयकुमार पाठक