पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला. तो भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे दहा किमी. अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे. या गावातील शाळेसमोरून गडावर जाता येते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८३ मी. असून पायथ्यापासून उंची ३४५ मी. आहे. हा किल्ला विचित्रगड या नावाने देखील ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो.

किल्ल्याची चढण खडी असून फरसबंदी वाटेचे अवशेष ठिकठिकाणी दिसतात. किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आणि एक चोर दरवाजा आहे. पहिला दरवाजा हा उत्तरपूर्व दिशेकडे आहे. त्यावर गणेशपट्टी असून त्याचे गणेश दरवाजा असे नाव आहे. दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवडी आहे. परंतु त्यावरील छत कोसळले असल्याने तेथे फक्त मोकळी जागा दिसते. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर सुरुवातीला बांधलेल्या पायऱ्यांची आणि नंतर कातळात खोदलेल्या पायऱ्यांची एक वाट असून ती गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत जाते.

दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असून उत्तम बांधणीचा आहे. या दरवाजाच्या कमानीच्या दोन्ही बाजूला व्याघ्र आणि शरभ यांची शिल्पे आहेत. या दरवाजाची बांधणी व दगडाच्या ठेवणीवरून हा गडाचा जुना दरवाजा असण्याची शक्यता आहे. दरवाजा वक्राकृती पद्धतीने बांधलेला असून पायऱ्यांच्या मार्गांनी आल्यावर तो सहज दृष्टीस पडत नाही. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवडी असून त्याचे छत कोसळलेले आहे. याच भागात उजवीकडे एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. सदर टाक्यात बारमाही पाणी असून ते पिण्यायोग्य आहे. यानंतर काही बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. तिसरा दरवाजा उत्तम स्थितीत असून या दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर देवनागरी आणि फार्सी भाषेतील शिलालेख आणि त्यावर गजमुखाची शिल्पे कोरलेली आहेत. इतिहास अभ्यासक ग. ह. खरे यांच्या मते, हा दरवाजा दुसरा मुहंमद आदिलशाह याच्या कारकिर्दीत १६५६ साली बांधला गेला आहे.
शिलालेख :
देवनागरी – हजरत सुलतान महमद पादशाहा साहेब कारकिर्दीत विठ्ठल मुद्गलराव हवालदार किल्ले रोहीडा
फार्सी – हजरत सुलतान मुहम्मदशाह पादशाहा साहिब इतअमीर दर्वाझह हीना बोसवर विथल मुद्गलराव हवालदार किल्मह रोहीरह दर सनह १०५६

किल्ल्याची सर्व प्रवेशद्वारे एकापाठोपाठ एक काटकोनामध्ये उभी आहेत. किल्ल्यावर सात बुरूज असून त्यांची नावे अनुक्रमे सदरेचा बुरूज, सर्जा बुरूज, वाघजाई बुरूज, फत्ते बुरूज, पाटणे बुरूज, दामगूडे बुरूज आणि शिरवले बुरूज अशी आहेत. यांपैकी गडाच्या उत्तर बाजूला असलेला वाघजाई बुरूज आणि दक्षिणेस असलेला शिरवले बुरूज हे बांधणीत भव्य व आकर्षक आहेत. या दोन्ही बुरुजांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सर्ज्या बुरुजाचे महत्त्व वेगळे असून या बुरुजाच्या आतील बाजूस मधोमध गोलाकार खांब बांधलेला होता. या खांबाचे अवशेष अद्यापि पाहायला मिळतात. या खांबाच्या आधारावर या बुरुजाचे छत उभे केले गेले होते. काळाच्या ओघात छत कोसळले, तरी आधाराचा मधला खांब जागेवर आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर लगेच डाव्या बाजूस म्हणजे पश्चिमेस सदरेचे अवशेष आहेत. याच सदरेच्या मागील बाजूस लहानशा तलावाजवळ गडावरील रोहीडमल्ल देवाचे मंदिर आहे. सदर मंदिराचा जीर्णोद्धार अंदाजे ७ ते ८ वर्षांपूर्वी झालेला आहे. गडाच्या दक्षिण पश्चिम भागात पाटणे आणि दामगुडे बुरुजाच्या जवळ पाण्याच्या कोरीव टाक्यांची एक मालिकाच आहे. गडावरील उत्तरपूर्व भागातील सर्जा बुरुजाकडून उत्तर टोकावरील वाघजाई बुरुजाकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला चोर दरवाजा असून याच वाटेच्या उजव्या बाजूला एक बांधीव टाकी आणि काही जोत्यांचे अवशेष आहेत. गडावर पाण्याचे दोन तलाव व दहा टाकी आहेत. गडाच्या पश्चिम भागातील पाण्याच्या टाक्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून ही टाकी डोंगर उतारावर खोदलेली आहेत. त्यामुळे यात पावसाचे पाणी वाहत येऊन आपोआप जमा होते. तसेच ही टाकी एकमेकाला विशिष्ट उंचीवर जोडलेली असल्यामुळे एकापाठोपाठ एक टाकी भरतात. सर्व टाकी भरल्यावर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी यातून एक सांडवा तटबंदी बाहेर काढण्यात आलेला आहे.

किल्ल्याचा बराच भाग सपाट असला, तरी मध्यवर्ती भाग थोडा उंच असून या भागात गडावरील अनेक इमारतीचे अवशेष दडले असण्याची शक्यता आहे. गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीजवळ चुन्याच्या घाण्याचे अवशेष आहेत. या घाण्याकडून रोहीडमल्ल देवळाकडे येताना वाटेत एके ठिकाणी घाण्यातून काढलेल्या चुन्याची रास दिसून येते. गडावरील सर्वांत मोठा तलाव रोहीडमल्ल मंदिराच्या जवळ उत्तरेकडे आहे. मंदिराच्या दक्षिणेला बांधकामाची अनेक जोती आहेत. तेथे तोफगोळे, शिशाच्या लाद्या, बंदुकीच्या गोळ्या, खापरांचे तुकडे, बांगड्या इ. पुरातत्त्वीय अवशेष मिळालेले आहेत.

रोहिडा किल्ल्याचा इतिहास हा आदिलशाही काळापासून (सोळावा शतक) ज्ञात आहे. हा किल्ला अनेक वर्षे आदिलशाही अंमलाखाली होता. १६४७ नंतर छ. शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले, त्यांपैकी एक रोहीडा असावा. गडाचा तिसरा दरवाजा हा १६५६ साली मुहंमद आदिलशाह याचे कारकिर्दीत बांधला गेला. छ. शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला. या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल हे महाराजांना येऊन मिळाले. महाराजांच्या काळात त्यांनी किल्ल्याचे नामकरण विचित्रगड केले. पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना देण्यात आला (१६६५). पुढे हा किल्ला आदिलशाही, मोगल व मराठे यांच्या ताब्यात टप्प्याटप्प्यांमध्ये राहिला (१६६५-७०). १६७० पासून मात्र हा किल्ला एक वर्षाचा (१६८९) अपवाद वगळता मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. १७०० मध्ये भोर हे संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळाले आणि हा किल्ला संस्थानच्या आधिपत्याखाली राहिला. पुढे संस्थान विलीन होईपर्यंत किल्ला मराठ्यांकडेच होता. १९४७ पूर्वी भोर संस्थान अस्तित्वात असताना किल्ल्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे हवालदार, सरनौबत, शिपाई, हरकाम्या व गुरव असे सरकारी नोकर कामाला होते, अशी नोंद आहे.
संदर्भ :
- खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, मुंबई, १९६७.
समीक्षक : संदीप परांजपे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.