सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए. : ( स्थापना १९४६ )
मलेरियाच्या परजीवी जीवाणूने यूरोपिअन लोकांच्या बरोबर अमेरिकेत प्रवेश केला. परंतु हा सूक्ष्मजीव नवीन वातावरणात जगायला, वाढायला त्याला डासांची आवश्यकता होती आणि अमेरिकेचा दक्षिण आणि उत्तर भाग म्हणजे अशा डासांचा नैसर्गिक अधिवास होता. त्यामुळे अनेक अमेरिकन लोक मलेरियाची शिकार झाले, त्यातले जे जगले ते पुनःपुन्हा तापाने बेजार होऊ लागले. अमेरिकेच्या आग्नेय भागातील गरमी, आर्द्रता वदलदल डासांच्या वाढीसाठी सुयोग्य होती. परंतु हा प्रश्न आग्नेय अमेरिकेपुरताच मर्यादित होता. दुसऱ्या जागतिक युद्धाने ही परिस्थिती अधिक बिकट बनवली. युद्धाच्या कालखंडात या ठिकाणी अमेरिकन सैन्याची अनेक प्रशिक्षण केंद्रे उभारली गेली, त्यातून प्रशिक्षित झालेल्या सैनिकांची रवानगी लढण्यासाठी जगभरात होत असे. मलेरियाग्रस्त सैनिक ही सैन्यासाठी जटील समस्या ठरली. लढाऊ सैन्याची तेव्हा अमेरिकेला निकड होती. १९४२ साली लष्करी क्षेत्रात मलेरियाला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेने अटलांटा येथे एक संस्था स्थापन केली. तिचे तेव्हाचे नाव होते राष्ट्रीय लष्कर मलेरिया नियंत्रण कार्यालय (Office of National Defence Malaria Control Activities). केवळ एक दशलक्ष डॉलर अनुदान आणि ३६९ कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर स्थापन झालेली ही संस्था पुढे चांगलीच नावारुपाला आली. १९४७ साली अटलांटा येथील एमरी विद्यापीठाने दहा डॉलरच्या नाममात्र रकमेत या उपक्रमाला ६ हेक्टर जमीन देऊ केली आणि संस्थेचे अटलांटा येथे कायमस्वरूपी मुख्यालय अस्तित्वात आले.
अमेरिकेत युद्धकाळात या केंद्राची ११६१ ठिकाणी कार्यालये स्थापन झाली. डॉक्टर्स, अभियंते, कीटकशास्त्रज्ञ एकत्रितपणे मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी झटू लागले. युद्ध संपुष्टात आल्यानंतर अमेरिकन सैन्य मायदेशी परतू लागले. त्यांच्यामार्फत उष्ण कटिबंधातील टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांनी अमेरिकेत पाय पसरू नयेत यासाठी या केंद्राचे संचालक जोसेफ मोन्तीन योजना आखू लागले. लवकरच या केंद्रात प्लेग, अमिबिक डिसेंट्री यासारख्या विविध रोगांवर संशोधन होऊ लागले, त्यामुळे १९६७ साली या केंद्राला ‘संसर्गजन्य रोग केंद्र’ असे संबोधले जाऊ लागले, तेव्हापासून अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्व तऱ्हेच्या रोगांच्या निदानासाठी वा नायनाटासाठी या संस्थेने इतकी मदत केली की १९७० सालापासून तिचे नाव पडले रोग नियंत्रण केंद्र ( Center for Disease Control), १९९२ साली तिच्या नावात ‘प्रतिबंधाची ’ही भर पडली (Centers for Disease Control and Prevention ).
हे केंद्र मुख्यत्वे रोगजंतु, रोगप्रसार आणि रोग प्रतिबंध यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. येथील शास्त्रज्ञ रोगाला आळा घालण्यासाठी रोग्यांचे व त्यांच्या भोवतालीच्या परिस्थितीचे निरीक्षण करीत असत, या अभ्यासातूनच त्यांना रोगप्रसार आणि परिस्थिती यांचे एकमेकांशी दृढ नाते आहे हे लक्षात आले, यातूनच विज्ञानाची एक नवीन शाखा उदयाला आली जिचे नाव आहे रोगपरिस्थिती विज्ञान (Epidemiology). सुरुवातीच्या मर्यादित यशानंतर मात्र येथील शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केले आणि त्यामुळे जगभरातील आरोग्यसेवा सुधारायला चांगलीच मदत झाली.
आज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवसेवा विभागाचे महत्त्वाचे अंग आहे आणि आरोग्य विकास, रोग प्रतिबंध आणि दक्षता या क्षेत्रात हे केंद्र आपले योगदान देत आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राची काही मुख्य कार्ये खालीलप्रमाणे:
- १९४६ साली अमेरिकेतून मलेरिया व १९४९ साली देवी हा रोग हद्दपार केला.
- १९५० साली नैऋत्य आशियात मलेरिया निर्मूलनासाठी तसेच सार्वजनिक आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर्स, अभियंते आणि कीटक शास्त्रज्ञांचा गट पाठवला.
- १९५५ मध्ये निष्क्रिय पोलियो लस अस्तित्वात आणली.
- १९६६ साली आफ्रिकन देशांना देवी निर्मूलनासाठी तसेच गोवर आटोक्यात राखण्यासाठी मदत देऊ केली.
- १९६९ साली प्राणघातक सांसर्गिक रोगांपासून शास्त्रज्ञांचा बचाव करण्यासाठी पहिली प्रतिबंधक प्रयोगशाळा (containment laboratory) उभारली.
- १९७४ मध्ये सीडीसीने आरोग्य शिक्षण विभाग स्थापन करून त्यामार्फत शाळांमधून आरोग्यविषयक शिक्षण द्यायला सुरुवात केली.
- १९७५ मध्ये दीर्घ मुदतीच्या रोगांसाठी वेगळा विभाग स्थापन केला आणि कॅन्सर, जन्मजात वैगुण्ये आणि परिसर आरोग्यावर लक्ष केंद्रित केले.
- १९७८ मध्ये प्रतीजैविकाला दाद न देणाऱ्या टिबीच्या पहिल्या प्रजातीचा अहवाल प्रसिध्द केला.
- १९८७ साली एड्सचा प्रसार, निदान आणि समुपदेशन यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
- २००२ मध्ये सीडीसीच्या अहवालानुसार १९८०च्या तुलनेत नवजात एड्स रुग्णांच्या संख्येत ८०%ची घट.
- २०१६ मध्ये झील्का विषाणूच्या प्रसाराचा अहवाल प्रसिध्द.
संदर्भ:
- https://www.cdc.gov/about/history/index.html
- https://www.cdc.gov/museum/timeline/1940-1970.html
- https://mosaicscience.com/story/brief-history-cdc
- https://orise.orau.gov/cdc/about-cdc.html
समीक्षक : रंजन गर्गे