सैद, एडवर्ड : (१ नोव्हेंबर १९३५–२५ सप्टेंबर २००३). पॅलेस्टिनी-अमेरिकन साहित्य-समीक्षक, तत्त्वज्ञ व विचारवंत. त्यांचा जन्म जेरूसलेम येथे एका प्रॉटेस्टंट-ख्रिस्ती पंथीय कुटुंबात झाला. त्यांच्या बालवयातच झालेल्या इझ्राएलच्या स्वातंत्र्ययुध्दाने (१९४७-१९४८) अनेक पॅलेस्टिनींना देशोधडीला लावले. या काळात सैद यांच्या कुटुंबाने कैरो येथे स्थलांतर केले.

निर्वासित म्हणून दुसऱ्या देशात आयुष्य काढण्याच्या क्लेशदायक अनुभवाच्या झळा सैद यांनी कोवळ्या वयापासूनच भोगाव्या लागल्या. त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या भावविश्वावर व वैचारिक जडणघडणीवर झाले. पुढे अमेरिकन नागरिकत्व घेतल्यानंतरही या युध्दाचे व पॅलेस्टिनी नागरिकांच्या यातनांचे तीव्र भावनिक व मानसिक पडसाद त्यांच्या लिखाणातून व विचारसरणीतून उमटत राहिले. त्यातून त्यांची राजकीय-सामाजिक विचारसरणी घडत गेली. १९४७ नंतर काही काळ कैरो येथे वास्तव्य करून नंतर ते न्यूयॉर्कला गेले. त्यांचे बहुतेक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. प्रिन्स्टन विद्यापीठातून बी. ए. (१९५७) तसेच हार्व्हर्ड विद्यापीठातून इंग्रजी वाङ्मयात एम्. ए. (१९६०) व पी एच्. डी. (१९६४) या पदव्या त्यांनी मिळवल्या.

१९६३ पासून ते कोलंबिया विद्यापीठात तौलनिक साहित्याचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. या काळातच त्यांनी पॅलेस्टाइन प्रश्नावरचा अभ्यास व लिखाण सुरू केले. ह्या सुमारास जोसेफ कॉनरॅड या लेखकावर प्रबंध लिहून त्यांनी आपले पहिले पुस्तक जोसेफ कॉनरॅड अँड द फियशन ऑफ ऑटोबायॉग्रफी (१९६६) प्रसिध्द केले. कॉनरॅड हा जन्माने पोलंडचा असला, तरी परागंदा होऊन आयर्लंडमध्ये राहात होता. त्यामुळे सैद यांना या लेखकाविषयी मानसिक-वैचारिक जवळीक वाटली असावी. या नंतरची त्यांची महत्त्वाची वाङ्मयीन समीक्षेची पुस्तके म्हणजे – बिगिनिंग्ज : इंटेन्शन अँड मेथड (१९७४), द वर्ल्ड, द टेक्स्ट अँड द क्रिटिक (१९८३), नॅशनॅलिझम, कलोनिॲलिझम, अँड लिटरेचर : येट्स अँड डीक्लोनायझेशन (१९८८) इत्यादी सैद यांनी एकूण अठरा ग्रंथ लिहिले. त्यांपैकी ओरिएंटलिझम (१९७८) हा त्यांचा सर्वात प्रसिध्द ग्रंथ असून त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय विचारविश्वात मान्यता मिळाली, आणि त्यानंतर प्रसिध्द झालेल्या त्यांच्या कल्चर अँड इंपीरिॲलिझम (१९९३) या ग्रंथाने त्यांच्या मान्यतेवर कीर्तीचा कळस चढवला. त्यांच्या ओरिएंटॅलिझम या ग्रंथाने उत्तर-वसाहतवादाला पायाभूत असणाऱ्या तात्त्विक भूमिकेची मांडणी केली. उत्तर-वसाहतवादी (पोस्ट कलोनिअल) समीक्षासिध्दांताची मांडणी करणारा आद्य व प्रमुख सिध्दांतकार म्हणून सैद यांची ख्याती आहे. ओरिएंटॅलिझम या ग्रंथात सैद यांनी, पश्चिमी साम्राज्यवादी दृष्टिकोणातून पाश्चात्त्य विचारवंतांनी पूर्व व पौर्वात्य संस्कृती यांसंबंधी विचार करण्याची जी ज्ञानचौकट उभारली, तिचा ऊहापोह केला आहे. पाश्चात्त्य देशांचा अरब व मुस्लिम जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण हा पूर्वग्रहदूषित व साम्राज्यवादी असल्याचा दावा सैद यांनी केला. ख्रिश्चन व मुस्लिम यांच्यातील धर्मयुध्दांतील (क्रूसेड्स) पराभवामुळे खिश्चनांनी अरब मुस्लिमांची धास्ती घेतली होती. या भीतीतून पाश्चिमात्य देशांनी प्राच्यवादाची (ओरिएंटॅलिझम) ज्ञानचौकट निर्माण केली. कोणतीही शासनसंस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी अशा नियामक ज्ञानसत्तेची चौकट उभी करत असते तसेच पाशवी बळापेक्षा सांस्कृतिक वर्चस्वाच्या (हेजेमनी) आधारे समाजजीवनात बदल घडवून आणता येतो, ही गृहीतके सैद यांच्या सैध्दांतिक प्रतिपादनामागे होती. सैद यांच्या मते पूर्व (ओरिएंट) हे प्रत्यक्ष वास्तव असले, तरी यूरोपीय विचारवंतांनी ते अवास्तव व अतिवास्तव बनवले. त्यांनी लावलेला पूर्वेचा व पौर्वात्य संस्कृतीचा हा शोध कपोलकल्पित, पूर्वग्रह दूषित व अन्यायकारक आहे. पाश्चात्य भाष्यकारांचा हा  प्राच्यवाद म्हणजे वस्तुत: ज्ञानमीमांसा व सत्ताशास्त्र यांच्या आधारे पूर्व व पश्चिम यांतला भेद विशद करणारी विचारधारा आहे. सैद यांचे पौर्वात्य जगासंबंधीचे विवेचन हे अरब व इस्लाम यांच्यापुरतेच मर्यादित आहे. या इस्लामी पूर्वेला पाश्चात्त्य देशांनी नेहमीच अप्रगत, मागासलेले, अविवेकी व क्रूर मानले. पौर्वात्य संस्कृतीला त्यांनी गूढरम्यतेचा, धार्मिक, श्रध्दाळूपणाचा वारसा बहाल केला. पाश्चात्त्यांनी स्वत:बद्दलची प्रतिमा मात्र विवेकी, बुध्दिप्रामाण्य-वादी, मानववादी व प्रगल्भ असल्याचा दावा केला. अशा प्रकारे पाश्चात्त्य वसाहतवाद्यांनी ‘ स्व’ आणि ‘ पर ‘ (पौर्वात्य वा प्राच्य) या संकल्पना वापरून आपल्या विचारांची मांडणी केली. आधुनिक पाश्चात्त्य  स्वला आपल्यामधले जे जे अनिष्ट पैलू नाकारावयाचे होते (उदा., क्रौर्य, कामुकता-लैंगिकता, संस्कृतीची व नैतिक मूल्यांची भ्रष्टता, आळशीपणा इ.) ते ते सर्व त्यांनी पौर्वात्यांवर लादले आणि शिवाय पौर्वात्य संस्कृतींना गूढरम्यतेची, धार्मिक श्रध्दाळू-पणाची जोड दिली. पाश्चात्त्यांचा हा ‘पर’  खुद्द पौर्वात्यांनी ‘स्व’ म्हणून बौध्दिक सहमतीच्या आधारे स्वीकारला. अशा प्रकारे पाश्चात्त्यांनी पौर्वात्य समाजावर गाजवलेले सांस्कृतिक वर्चस्व प्राच्यवादात दिसून येते, असे सैद यांचे प्रतिपादन आहे. त्यांच्या मते पौर्वात्य आणि पाश्चात्त्य देशांमधील परस्परसंबंध हे नेहमीच सत्तासंघर्षाचे व वर्चस्व प्रस्थापित करण्याचे राहिले आहेत. विसाव्या शतकातील अमेरिकन प्राच्यवादात इस्लामचा ऊहापोह एक कपोलकल्पित विचारप्रणाली व धार्मिक आचारसंहिता यांची सरमिसळ अशा दृष्टिकोणातूनच केला जातो. इस्लामचा विचार पूर्वग्रह व राजकीय हितसंबंध यांच्या चौकटीतच पाश्चात्त्यांनी केला, ही सैद यांची खंत आहे. कल्चर अँड इंपीरिॲलिझम या ग्रंथात सैद यांनी संस्कृती ही राजकारण व विचारप्रणाली यांमधील अनेक मुद्यांसंबधीच्या संघर्षाची युध्दभूमी मानून विश्लेषण केले आहे. साम्राज्यवाद अद्यापही आर्थिक, लष्करी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे, असे सैद मानतात. सैद यांचे विचार एकांगी असल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. साहित्याकडे ‘ साम्राज्यवादाचा सांस्कृतिक अभ्यास ’ एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून त्यांनी पाहिले, अशी टीकाही झाली. असे असले तरी, सैद यांनी द वर्ल्ड, द टेक्स्ट, अँड द क्रिटिक (१९८३) या आपल्या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेत पंथनिरपेक्ष समीक्षा (सेक्यूलर क्रिटिसिझम) अशी एक संकल्पना मांडली. मुख्यत: पारंपरिक वा पोथीनिष्ठ मार्क्सवादी समीक्षेला विरोध करण्यासाठी त्यांनी ही संकल्पना वापरली असली, तरी एक दृष्टीने एकूणच पंथीय समीक्षेला विरोध करणारी ही समीक्षा आहे. ही पंथनिरपेक्ष समीक्षा वर्चस्व, नियंत्रण, दडपशाही, सनातनवाद यांच्या विरोधात उभी ठाकलेली असून मानवी स्वातंत्र्य आणि त्याच्याशी सुसंगत जीवनमूल्ये यांना समृध्द करणारी आहे. या ठिकाणी सैद यांची भूमिका आधुनिकतेच्या व उदारमतवादी मानवतावादाच्या खूप जवळ जाते.

पॅलेस्टाइनच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी सैद यांनी सक्रिय राजकारणाचा आश्रय घेतला. १९७७ ते १९९१ या दरम्यान ते ‘ पॅलेस्टाइन नॅशनल कॉन्फरन्स ’ चे सभासद होते. पॅलेस्टिनी प्रश्नांची सर्वांगीण चर्चा त्यांनी आपल्या लिखाणातून केली. ओरिएंटॅलिझम व त्या बरोबरच कव्हरिंग इस्लाम (१९८१) व द क्वेश्चन ऑफ पॅलेस्टाइन (१९८४) व या ग्रंथांतून त्यांनी पॅलेस्टाइनच्या प्रश्नावर ठोस वैचारिक भूमिका मांडली. नंतरच्या काळातील आफ्टर द लास्ट स्काय (१९८६), पॉलिटिक्स ऑफ डिस्पझेशन : द स्ट्रगल फॉर पॅलेस्टिनियन सेल्फ डिटरमिनेशन : १९६९–१९९४ (१९९४) आणि पीस अँड इट्स डिसकन्टेंट : एसेज ऑन पॅलेस्टाइन इन द मिडल ईस्ट पीस प्रोसेस (१९९६) हे पॅलेस्टाइन प्रश्नावरचे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ होत. स्वदेशातून हद्दपार झालेल्या व देशोधडीला लागलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या दु:खा विषयीच्या आत्मीयतेतून त्यांनी, वरील ग्रंथांतून विशद केलेली वैचारिक भूमिका व प्रतिपादन साकारले आहे. सैद यांनी पॅलेस्टाइनच्या स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीची मागणी केली, तसेच इझ्राएलमधल्या पॅलेस्टिनींना समान हक्क मिळावेत व त्यात इझ्राएलला परतण्याचा हक्कही समाविष्ट असावा, अशाही त्यांच्या मागण्या होत्या आणि त्यासाठी अमेरिकेने इझ्राएलवर दडपण आणावे, असेही सैद यांचे म्हणणे होते. अनेक अरब व मुस्लिम राजवटीही सैद यांच्या टीकेचे लक्ष्य ठरल्या. सैद यांनी आउट ऑफ प्लेस (१९९९) ह्या आपल्या आठवणींवजा पुस्तकातून आपल्या मनातील उपरेपणाची व उखडलेपणाची भावना व्यक्त केली आहे. अमेरिकेत राहात असल्याने व ख्रिश्चन असल्याने मुस्लिम व पॅलेस्टिनींना आपल्याविषयी प्रेम वाटत नाही तर पॅलेस्टाइनचा व मुस्लिम राष्ट्रवादाचा कट्टर पुरस्कार केल्यामुळे ख्रिश्चन व अमेरिकन लोकही आपल्याला परके मानतात, अशी ही उपरेपणाची खंत त्यांच्या लिखाणातून व विचारसरणीतूनही व्यक्त होताना दिसते. संगीत हाही सैद यांच्या खास आस्थेचा व जिव्हाळ्याचा विषय होता. म्यूझिकल एलॅबोरेशन्स, पॅरलल्स अँड पॅरॅडॉक्सेस : एक्स्प्लोरेशन्स इन म्यूझिक अँड सोसायटी (सहलेखक – डॅन्येल बारेनबॉम) व ऑन लेट स्टाइल : म्यूझिक अँड लिटरेचर अगेन्स्ट द ग्रेन ही त्यांची तीन पुस्तके त्यांचे संगीतविषयक प्रेम व व्यासंग यांची साक्ष पटवणारी आहेत. १९९९ मध्ये सैद यांनी डॅन्येल बारेनबॉम या अर्जेंटिनी-इझ्रायली वाद्यवृंद-संचालकासमवेत ‘ वेस्ट-ईस्टर्न दिवाण ऑर्केस्ट्रा ‘ ची स्थापना केली. या वाद्यवृंदात इझ्राएल, पॅलेस्टाइन व भोवतालच्या अरब राष्टांतील अनेक युवकांचा समावेश होता. सैद स्वत: उत्तम पियानोवादक होते. संस्कृति-मीमांसक, ठाम सैध्दांतिक भूमिका मांडणारे साहित्य-समीक्षक, संगीतज्ञ, इतिहासकार, राजकीय विश्लेषक अशा अनेक अंगांनी त्यांची वैचारिक कारकीर्द उजळून निघाली आहे.

न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Hart,William D., Preliminary remarks : Edward Said and the Religious Effects of Culture, Cambridge University Press,2000.