रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च : ( स्थापना १९०१ )
रॉकफेलर वैद्यकशास्त्र संस्थेचा (हल्लीचे रॉकफेलर विद्यापीठ) उगम एका वैयक्तिक शोकांतिकेत दडलेला आहे. १८९८ पासून प्रख्यात भांडवलदार जॉन डी. रॉकफेलर, त्यांचा मुलगा जॉन डी. रॉकफेलर ज्युनिअर आणि सल्लागार फ्रेडेरिक गेट यांचे अमेरिकेत एखादे वैद्यकशास्त्र संशोधन केंद्र चालू करण्याचे घाटत होते, परंतु ते प्रत्यक्षात येत नव्हते. जानेवारी १९०१ साली जॉन डी. रॉकफेलर सीनिअर यांचा नातू रोहितांग ज्वराने (Scarlet fever) ने मरण पावला आणि त्या दुःखातून १९०१ साली अमेरिकेत न्यूयॉर्क येथे संसर्गजन्य रोगांविषयी संशोधन करण्यासाठी रॉकफेलर संस्थेची स्थापना झाली.
या काळात क्षय, टायफॉईड, घटसर्प यासारख्या जीवघेण्या रोगांना दर वर्षी हजारो माणसे बळी पडत होती. अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगांची अधिक माहिती व्हावी, त्यावरची उपचार पद्धती अस्तित्वात यावी यासाठी फ्रान्स येथील पाश्चर संस्था आणि जर्मनीतील रॉबर्ट कॉक संस्था आधीपासूनच कार्यरत होत्या. संस्थेचे पहिले संचालक सिमॉन फ्लेक्सनर यांच्या कारकिर्दीत व त्यांच्या देखरेखीखाली रॉकफेलर संस्थेत मूलभूत विज्ञानावर महत्त्वाचे संशोधन करण्यात आले. १९५३ साली संस्थेचे तिसरे संचालक डेतलेव ब्रोंत यांनी रॉकफेलर संस्थेचे रुपांतर रॉकफेलर विद्यापीठात केले आणि १९५४ पासून तिथे विद्यार्थी पीएच.डी. साठी संशोधन करू लागले. एकोणीसशे साठमध्ये या संस्थेत गणित आणि भौतिकशास्त्रात पारंगत असलेले संशोधक दाखल झाले. एकोणीसशे बहात्तर साली कॉर्नेल विद्यापीठाच्या सहयोगाने या संस्थेत प्रथमच स्नातक विद्यार्थ्यांसाठी एकत्रित एम.डी / पीएच.डी.चा कार्यक्रम उपलब्ध करण्यात आला. नंतर यात स्लोन केटरिंग संस्थेची भर पडली व सध्याचा तीन संस्थांचा एकत्रित अभ्यासक्रम राबवण्यात येऊ लागला.
पहिली जवळपास सहा तपे या संस्थेत फक्त मुलभूत व उपयोजित विज्ञानावरच संशोधन केले जाई. १९१० साली रॉकफेलर संस्थेच्या परिसरात एक हॉस्पिटल उघडण्यात आले आणि त्यावेळेपासून इथे संशोधकांसाठी वैद्यकीय संशोधनाचे दालनही खुले झाले. १९३७ साली थॉमस रिव्हर्स हॉस्पिटलचे संचालक झाले आणि त्यांनी जीवाणूशास्त्राबरोबरच विषाणुशास्त्राचा वेगळा विभाग स्थापन केला.
पेटन रॉस (Payton Rous), हिदियो नोगुची (Hideyo Noguchi), ओस्वाल्ड अवेरी (Oswald T. Avery), रेने डूबोस (Rene Dubos), डेविड बाल्टिमोर (David Baltimore), अश्तोन कार्टर (Ashton Carter) आणि जीराल्ड एडलमन (Gerald Edleman) यांसारखे अनेक गुणवान विद्यार्थी या संस्थेत शिकून बाहेर पडले. छत्तीस नोबेल पारितोषिक विजेते या विद्यापीठाशी विद्यार्थी अथवा शिक्षक / मार्गदर्शक या भूमिकेतून संलग्न होते. अँथ्रॅक्स जीवाणूचा नायनाट, हिपेटायटीस विषाणूचे मानवपेशीमधील संवर्धन, नैराश्य आणि सिरोटोनिन या जीवरसायनामधील संबंध, एड्सच्या विषाणूची पेशींमधील प्रतिमा यासारख्या अनेकविध विषयांवर या संस्थेत काम केले गेले.
आज या विद्यापीठात सत्तरहून अधिक विभाग, दोनशेहून अधिक संशोधक, जवळपास साडेतीनशे रिसर्च स्कॉलर्स, हजारापेक्षा जास्त डॉक्टर्स, टेक्निशीयन्स किंवा सपोर्ट स्टाफ कार्यरत आहेत. आतापर्यंत इथून पीएच.डी. पदवी घेणाऱ्यांची संख्या बाराशेहून अधिक आहे. रॉकफेलर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उद्योग, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. विद्यापीठाचा स्वतंत्र छापखाना आहे. जर्नल ऑफ सेल बायोलॉजी, जर्नल ऑफ एक्सपिरीमेंटल मेडीसीन, जर्नल ऑफ जनरल फिजीओलॉजीसारख्या प्रथितयश संशोधन पत्रिका या छापखान्यातून प्रसिद्ध केल्या जातात.
संदर्भ :
- https://www.aprilsmith.org/lesson-3-john-d-rockefeller.html
- https://www.rockefeller.edu/about/history/
- https://rucares.org/clinicalresearch/mission-history
- https://www.topuniversities.com/universities/rockefeller-university
समीक्षक : रंजन गर्गे