फारक्वार ग्रॅहॅम : (८ डिसेंबर १९४७ )

फारक्वार ग्रॅहॅम यांचा जन्म ऑस्ट्रेलियामधील टांझानिया प्रांतातील होबार्ट येथे झाला. हे वनस्पती व शेतीशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे संशोधन कमी पाण्याच्या भागात भागात टिकू शकतील अशा पिकांच्या प्रजाती, वनस्पतीमधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा हवामान बदलावर होणाऱ्या परिणामाशी संबंधित आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्र व गणितातील बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी क्वीन्सलँड विद्यापीठातून जैवभौतिकशास्त्रात पुन्हा बी.एस्सी.पदवी मिळवली. १९७३ साली ते ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतून जीवशास्त्र विषयात पीएच्.डी. झाले. १९७३ ते १९७६ या अवधीत अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यानी संशोधन केले व १९८० पासून परत आपल्या मूळ संस्थेत म्हणजे ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीत वेगवेगळ्या पदावर संशोधनाचे काम केले. सध्या तेथेच ते मानद प्राध्यापक आहेत. त्यांचे वडीलही वैज्ञानिक असल्यामुळे त्यांना लहानपणापासून विज्ञानाचे घडे मिळाले. फारक्वार यांनी शेती संशोधन हेच जीवनाचे ध्येय मानले व त्या कामाला वाहून घेतले.

त्यांच्या जैवभौतिक प्रारूपांमुळे वनस्पतींपासून सगळ्या जंगलापर्यंत जैविक व्यवहार कसे चालतात याचा उलगडा झाला. त्यांनी या अभ्यासाच्या आधारे वनस्पतींचे कार्य कसे चालते याची गणितीय प्रारूपे तयार केली होती. वनस्पतींना पाणी किती लागते, वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वाढत असताना त्यांची वाढ किती होऊ शकते, कोणत्या वनस्पती किंवा झाडे जास्त कार्बन डायऑक्साइड असलेल्या वातावरणात जोमदार वाढतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यानी शोधली होती. त्यांना पर्णरंध्रांच्या कार्यात (स्टोमाटामध्ये) विशेष रस होता. पर्णरंध्रातून कार्बन डायऑक्साइड घेतला जातो व पाणी बाहेर टाकले जाते. त्यांची प्रारूपे आज जगातील कृषी व पर्यावरण वैज्ञानिक वापरतात. हवामान बदलामुळे वनस्पतीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे, वाऱ्याचा वेगही मंदावत आहे, अशी निरीक्षणे  त्यांनी मांडली. एकूणच त्यांची वनस्पतीशास्त्रातील निरीक्षणे आजही कसोटीला उतरणारी आहेत.

त्यांच्या संशोधनामुळे गव्हाच्या व शेंगदाण्याच्या नव्या प्रजाती निर्माण करता आल्या. प्रतिकूल हवामानात टिकाव धरणाऱ्या इतर पिकांच्या प्रजातीही अस्तित्वात आल्या, त्यामुळे अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले.

वनस्पतींची प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही पृथ्वीवरील जीवनाचा मूलाधार आहे. त्यामुळे या क्रियेबद्दलचे ज्ञान हे शेती उत्पादन व विविध जैविक व्यवहारासंबंधीचे विश्लेषण करण्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. या ज्ञानात त्यांनी मोलाची भर घातली.

फारक्वार यांनी प्रकाश संश्लेषणामधील आणि भूपृष्ठीय वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जनामधील कार्बन व ऑक्सिजनच्या स्थिर समस्थानिकांच्या विभाजन प्रक्रियेवर आधारीत प्रारूपे विकसित केली. या प्रारूपांचा वनस्पतीशास्त्र, शेतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, परिसंस्था परिस्थितीकी यामधील संशोधनात फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

फारक्वार ग्रॅहॅम यांना हॅम्बोल्ट संशोधन पुरस्कार, ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान विज्ञान पुरस्कार आणि सन्माननीय क्योटो पुरस्कार मिळाले आहेत. क्योटो पुरस्कार जपानच्या इनासोरी फाउंडेशनचा, नोबेल पुरस्कारासमान समजला जातो. तसेच हा पुरस्कार प्राप्त होणारे ते पहिले ऑस्ट्रेलियन आहेत.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा