गोविंदजी, गोविंदजी : (२४ ऑक्टोबर १९३२) भारताच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात (पूर्वीचे अलाहाबाद) गोविंदजी यांचा जन्म झाला. आडनावामुळे अनेकदा जातीची / राज्याची ओळख होते तशी होऊ नये यासाठी त्यांच्या वडिलांनी मुलाच्या नावात एकच शब्द वापरणे पसंत केले. त्यांनी गोविंदजी हेच मुलाचेही नाव कायदेशीररित्या लावले होते. अमेरिकेत संस्थांच्या नियमानुसार नावात किमान दोन शब्द आलेच पाहिजेत असा दंडक होता. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गोविंदजी ऐवजी गोविंदजी गोविंदजी असे नाव लावायला सुरुवात केली. तरीही आपले शोधनिबंध प्रकाशित करताना ते अजूनही गोविंदजी असे एकशब्दी नावच लावतात.

अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. पदवी रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषय घेऊन मिळविली. तेथेच दोन वर्षानी त्यांनी पदव्युत्तर एम.एस्सी. पदवी मिळविली. एम.एस्सी.ला त्यांनी वनस्पती शरीरक्रियाशास्त्र हा विषय निवडला होता. त्यांना भारतात असताना प्रकाशसंश्लेषणाविषयी आकर्षण निर्माण झाले होते.

प्रकाशसंश्लेषणाविषयीच्या आकर्षणामुळे त्यांनी अमेरिकेत या विषयात संशोधन सुरू असणाऱ्या संस्थांशी पत्रव्यवहार चालू केला. इलिनॉय विद्यापीठाच्या अर्बाना शॅम्पेन संकुलात त्यांनी प्रवेश घेतला. नंतर तेथे त्यांनी प्रकाशसंश्लेषण क्रियेवर सखोल संशोधन केले.

त्यांच्या पत्नी, रजनी गोविंदजी यांनीही याच क्षेत्रात, विशेषतः प्रकाशसंश्लेषणातील हिल प्रक्रियेवर संशोधन केले आहे. त्यांचे आणि गोविंदजी यांचे मार्गदर्शकही सामाईक होते. प्रकाशसंश्लेषण क्रियेतील प्रसिद्ध वैज्ञानिक, रॉबर्ट इमर्सन हे दोघांचेही मार्गदर्शक होते. त्यांच्या सूचनेनुसार गोविंदजी यांना इमर्सन यांनी फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळवून गोविंदजी अमेरिकेत पोहोचले. पण इमर्सन यांचा सहवास त्यांना केवळ तीन वर्षेच लाभला, कारण रॉबर्ट इमर्सन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. पुढील संशोधन त्यांनी युजीन राबिनोविच यांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्या संशोधनातून त्यांना  जीवभौतिकी शाखेतील  पीएच्.डी. प्रदान करण्यात आली. नंतर ते युनायटेड स्टेटस हेल्थ सर्व्हिसमध्ये पोस्टडॉक्टरल फेलो होते. व पुढील चार वर्षे, वनस्पतीशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापकपद मग वनस्पतीशास्त्राचे आणि जीवभौतिकीचे सहप्राध्यापकपद आणि त्यानंतर जीवरसायन, जीवभौतिकी आणि वनस्पतीशास्त्राचे निवृत्त मानद प्राध्यापकपद भूषवीत आहेत.  इलिनॉय विद्यापीठाबरोबरचे त्यांचे साहचर्य साधारण अडतीस वर्षे राहिले.

वॉरबर्ग हे इमर्सन यांचे पीएच्.डी. चे मार्गदर्शक होते. वॉरबर्ग याना असे वाटत होते की प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनचा एक रेणू निर्माण करण्यासाठी शैवालाला २.८ ते ४ पर्यंत प्रकाशकण (Photons) लागतात. तर इमर्सन यांच्या मते बारा प्रकाशकण लागतात. पुढे गोविंदजी आणि रजनी गोविंदजी यांनी प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनचा एक रेणू निर्माण करण्यास शैवालाला किमान आठ ते कमाल बारा प्रकाशकण लागतात असे संशोधनातून सिद्ध केले. त्यातून इमर्सन यांचे मत वॉरबर्गपेक्षा अधिक अचूक आहे असे दाखवून दिले.

प्रकाशसंश्लेषण ही जैवरासायनिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत वनस्पती आणि काही सूक्ष्मजीव प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक रेणूमध्ये करतात. या रेणूंच्या विघटनातून ऊर्जा मुक्त होते. प्रकाशसंश्लेषणामुळे प्राण्यांना अन्नरेणू मिळतात. असंख्य जातीच्या वनस्पती व  प्राण्यांना ऑक्सिजन मिळतो. गोविंदजींनी केलेले संशोधन प्रकाशसंश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यातील क्रिया समजण्यास मोलाचे ठरले. प्रकाशसंश्लेषी समूह २ मधील हरितद्रव्य – ए या रंगद्रव्याचे काम समजण्यास त्यांच्या संशोधनाची मदत झाली आहे. या क्रियांतील बायकार्बोनेटस्, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन वहनात महत्त्वाची भूमिका निभावतात हे त्यांनी दाखवून दिले. याशिवाय शैवाल (algae) आणि वनस्पतींतील हरितद्रव्य–ए, संबंधीच्या उष्मास्फुरदीप्ती  (thermoluminescence) वर पहिली उपपत्ती त्यांनीच मांडली.

गोविंदजी यांनी सातत्याने प्रकाशसंश्लेषणाविषयी लिखाण केले. प्रकाशसंश्लेषण क्षेत्रातील त्यांचे खास आवडीचे विषय म्हणजे, ‘हरितद्रव्य–ए, प्रकाशसंश्लेषणातील प्रकाश शोषण, जीवाणूंतील हरितद्रव्य (बॅक्टिरियल क्लोरोफिल) आणि वनस्पतींतील ऑक्सिजन निर्मिती.’ या विषयातील गोविंदजी यांचे तीनशे शोधनिबंध नेचर, सायन्स, प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) यांसारख्या प्रख्यात नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत.

डव्हान्सेस इन फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन आणि हिस्टॉरिकल कॉर्नर ऑफ फोटोसिंथेसिस रिसर्च या वैज्ञानिक नियतकालिकांचे ते संस्थापक संपादक आहेत. ॲडव्हान्सेस इन फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशनचे तेहेतीसच्यावर खंड अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांचे मार्गदर्शक युजीन राबिनोविच यांच्याबरोबर लिहिलेले प्रकाशसंश्लेषणावरील पुस्तक अजूनही विद्यार्थीप्रिय आहे. प्रकाशसंश्लेषणाबद्दलच्या मूलभूत संकल्पना समजण्यास ते फार उपयुक्त आहे.

गोविंदजी यांना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान असे आहेत, अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेन्ट ऑफ सायन्सचे सदस्यत्व, इंडियन नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसचे फेलो आणि आजीव सदस्यत्व, अमेरिकन सोसायटी फॉर फोटो बायालॉजीचे अध्यक्षपद, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ फोटोसिंथेसिस रिसर्चतर्फे विज्ञानप्रसार पुरस्कार, इलिनॉय विद्यापीठाच्या अर्बाना शॅम्पेन संकुलाच्या माजी विद्यार्थी संघाचा जीवन गौरव पुरस्कार, रीबीझ फाउंडेशनचा पहिला जीवन गौरव पुरस्कार, डॉ. बी. एम. जोहरी प्लांट रिसर्च सोसायटीचे जोहरी अॅवार्ड, भारतातील नॅशनल अकादमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व, इलिनॉय विद्यापीठाचा त्यांनी उभारलेल्या प्रकाशसंश्लेषण विषयक वस्तुसंग्रहालयाबद्दल गौरव. फोटोसिंथेसिस या जर्नलने त्यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवशी एक खास अंक प्रकाशित केला आणि त्यांच्या प्रकाशसंश्लेषणातील कामाची कृतज्ञतापूर्वक नोंद घेतली.

सध्या जगाला भेडसावणाऱ्या काही मोठ्या समस्या आहेत: वाढते तापमान, वाढती लोकसंख्या, अपुरे अन्नधान्य उत्पादन, आणि प्रदूषण. त्यांचे उत्तर प्रकाशसंश्लेषणक्रिया जास्त वेगवान आणि व्यापक प्रमाणात होईल अशा प्रयत्नांतून मिळू शकेल. परंतु त्यासाठी मूलभूत संशोधनाद्वारे प्रकाशसंश्लेषण उत्तम प्रकारे समजणे गरजेचे आहे. गोविंदजी गेली साठ वर्षे त्या दृष्टीने जगभरातील प्रकाशसंश्लेषण संशोधकांचे संप्रेरक म्हणून प्रयत्न करीत आहेत.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा