मध्यवर्ती मज्जासंस्थेचा एक असाध्य विषाणुजन्य रोग. हा रोग लासाव्हायरस (Lyssavirus) या विषाणूमुळे होतो. या विषाणूचा समावेश मोनोनिगॅव्हायरॅलीज् (Mononegavirales) या गणातील ऱ्हाब्डोव्हिरिडी (Rhabdoviridae) या कुलात होतो. हा पिसाळलेल्या श्वानवर्गी (कुत्रा कुल) जनावरांच्या चावण्यामुळे निर्माण होणारा विषाणुजन्य सांसर्गिक रोग आहे. काही ठिकाणी या रोगाचा प्रसार वटवाघुळांमार्फत देखील होतो.

मुख्यत्वे पिसाळलेल्या पाळीव व भटक्या कुत्र्याच्या चावण्यामुळे हा रोग होतो. पिसाळलेले कुत्रे आक्रमक बनते व जवळ आलेल्या व्यक्तीस व प्राण्यास चावते. काही वेळा कुत्रे पिसाळलेले नसले तरी ते अलर्क विषाणू वाहक असते. त्याच्या लाळेतून अलर्क विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. मानव व पाळीव जनावरांना कुत्रा चावला किंवा खरचटल्याजागी चाटल्यास त्यांना अलर्कची बाधा होऊ शकते. जगात सु. ६०,००० लोक दरवर्षी या रोगामुळे मृत्यूमुखी पडतात.

अलर्क रोगाचा प्रसार

अलर्क विषाणू प्राण्याच्या लाळग्रंथीमध्ये असतो व लाळेतून प्रसारित होतो. हा विषाणू ताज्या जखमेमध्ये प्रविष्ट होतो व तेथून तो त्या भागाच्या चेता ऊतीमधून मेंदूपर्यंत पसरतो आणि केंद्रिय चेतासंस्थेत पोहोचतो. मूळ जखम मेंदूपासून जितकी दूर तितका रोगाचा परिपाक कालावधी (Incubation period) दीर्घ असून तो दहा दिवसांपासून आठ महिन्यांपर्यंत असू शकतो.

लक्षणे : या रोगामुळे संक्रमित झालेल्या कुत्र्यामध्ये अस्वस्थता, चिडचिडेपणा, उदासिनता व घशाच्या स्नायूंचा पक्षाघात अशी लक्षणे दिसतात. शेवटी ते पक्षाघाताच्या जलद प्रसारामुळे मरण पावते. मानवामध्ये सुद्धा उदासीनता, ताप, डोकेदुखी, मळमळ, झटके, स्नायूंमध्ये कडकपणा आणि अतिप्रमाणात लाळेचे उत्पादन अशी लक्षणे दिसतात. जखमेला खाज येणे हे एक सुरुवातीचे लक्षण असू शकते. यामध्ये घशाचे स्नायु आखडले जाऊन गिळण्यास त्रास होतो तसेच अन्न व पाणी यांच्या दिसण्याने किंवा विचारानेही आवेगाची तीव्रता वाढते, म्हणून यास जलसंत्रास (Hydrophobia) असेही म्हणतात. त्याचबरोबर मानसिक स्थिती बिघडते, श्वसनात व हृदयाच्या कार्यात अडथळा येऊन शुद्ध हरपली जाऊन शेवटी मृत्यू होतो.

प्राथमिक उपचार : अलर्क रोगावर कोणताही उपचार नाही, परंतु त्याचा प्रतिबंध करता येतो. कुत्रा चावल्यामुळे झालेल्या जखमेतून रक्तस्राव होऊ द्यावा तसेच जखम जंतुनाशक साबण व स्वच्छ पाण्याने लगेच धुवावी व अलर्क प्रतिबंधक (Anti rabies) लस घ्यावी. जखम खोलवर असल्यास ती स्वच्छ कापडाने झाकावी. ज्या भागास कुत्रा चावला आहे तो भाग शरीरापासून उंच धरावा. जखमेतून वाहणारे रक्त थांबवणे व जखम झाकणे हा तात्पुरता उपाय आहे.

लसीकरण : सन १८८५ पर्यंत मानवामध्ये अलर्क रोगाची लक्षणे दिसू लागली. त्यावेळी उपचाराअभावी  खात्रीने व्यक्तीचा मृत्यू होत असे. लुईस पाश्चर व एमिली राउक्स (Emile Roux) या दोन फ्रेंच वैज्ञानिकांनी तयार केलेल्या लसीमुळे ६ जून १८८५ रोजी पिसाळलेले कुत्रे चावलेल्या नऊ वर्षाच्या जोसेफ माइस्टर या मुलाचे प्राण वाचले. त्यांनी बनवलेली लस सशाच्या शरीरात वाढवलेल्या निष्क्रीय विषाणूपासून तयार केलेली होती. १९६७ साली मुद्दाम वाढवलेल्या मानवी पेशीपासून अलर्क प्रतिबंधक लस बनवण्यात येऊ लागली. सद्यस्थितीत ती कोंबडीच्या अंड्यांतील भ्रूणांधून मिळवली जाते.

लसीकरणामुळे प्रतिपिंडे तयार होऊन रोग्यात अलर्क विरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होते. हे उपचार संसर्गानंतर चोवीस तासाच्या आत दिल्यास परिणामकारक ठरतात. जखमेमध्ये कुत्र्याच्या लाळेच्या प्रादुर्भावामुळे जीवाणूंचा संसर्ग होऊन धनुर्वात देखील होऊ शकतो. म्हणूनच विषाणू व जीवाणू यांचा संसर्ग कमी करण्यासाठी जखमेची स्वच्छता महत्त्वाची असते.

सतत पाळीव प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्यांना तसेच प्राणिसंग्रहालयामध्ये प्राणी सांभाळणारे किंवा पशुवैद्यकीय अधिकारी व सहायक यांच्यासाठी लशीची दर आठवड्यास एक अशी तीन अंत:क्षेपणे घ्यावी लागतात. श्वानदंशानंतर देण्यात येणारी अलर्क प्रतिबंधक लस स्नायूमध्ये दिली जाते. एकदा श्वानदंश झाला म्हणजे एकूण लशींची चार अंत:क्षेपणे घ्यावी लागतात. पहिले शक्य तेवढ्या लवकर त्यानंतर तिसऱ्या, सातव्या व चौदाव्या दिवशी लशीची मात्रा घ्यावी लागते. पहिल्या अंत:क्षेपणावरोबर एक वेगळे रेबीज इम्युनोग्लोबिनाचे अंत:क्षेपण ज्या ठिकाणी कुत्रे चावले आहे त्याठिकाणी दिल्यास अलर्क होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. किती दिवसांपूर्वी तुम्ही अंत:क्षेपण घेतले आहे याची कल्पना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे आवश्यक असते. पूर्वी अलर्क लस घेतली असल्यास तीन दिवसांच्या अंतराने दोन अंत:क्षेपणे घेतली तरी अलर्क रोगापासून बचाव होत असे.

मानवास अलर्क रोगापासून प्रतिबंध करण्याबरोबर पाळीव कुत्र्यांना अलर्क होऊ नये म्हणून कुत्र्यांना लस देण्यास प्रारंभ झाला. अशा कुत्र्यास पिसाळलेले कुत्रे चावले तरी अलर्कचा प्रसार होत नाही. ही क्षमता तीन वर्षे टिकते. त्यामुळे दर तीन वर्षांनी कुत्र्यास अलर्क प्रतिबंधक लस द्यावी. जनावरांच्या दवाखान्यात ही लस पाळीव प्राण्यांना देण्याची व्यवस्था केलेली असते. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर, गाय, बैल व घोडा हे प्राणी अलर्क आजारास बळी पडू शकतात. वन्य प्राण्यांमध्ये पाळीव प्राण्यांमधून अलर्कचा संसर्ग होऊ शकतो, त्यासाठी अलर्करोधी लस आमिषामधून उघड्या ठिकाणी ठेवण्यात येते. त्यामुळे वन्य प्राण्यांचा अलर्क रोगापासून बचाव होऊ शकतो.

श्वानदंशामुळे अलर्कच्या विषाणूसोबतच कॅप्नोसायटोफॅगा कॅनिमॉरसॅस (Capnocytophaga canimorsas), मिथिसीलिन प्रतिकारक – स्टॅफायलोकॉकस ऑरिअस (Methicillin-resistant Staphylococcus aureus; MRSA), पाश्चुरेला म्यूल्टोसीडा (Pasteurella multocida) व धनुर्वात (Tetanus Tetanus) हे जीवाणू देखील प्रसारित होऊ शकतात.

सन २००७ पासून २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज (अलर्क रोग) दिन म्हणून साजरा केला जातो.

संदर्भ :

https://www.britannica.com/science/rabies#ref895295

https://www.urmc.rochester.edu/encyclopedia/content.

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/rabies/

समीक्षक : नंदिनी देशमुख