वाहनाच्या एंजिनात किंवा कारखान्यातील यंत्रात वापरले जाणारे वंगण तेल हे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने तसेच पाणी, धूळ, वंगण तेलाच्या विघटनाने तयार झालेल्या मळीने निकामी होते. त्यात मिसळलेली विविध कार्यांशी निगडित रासायनिक पुरके वापरून झालेली असतात. तसेच पाण्याचा शिरकाव झालेला असतो. पाण्यामुळे वंगण तेलाची चकाकी कमी होते. अविद्राव्य घटकामुळे त्या वंगणाची वाहण्याची क्षमता वाढलेली असते, कारण त्याची विष्यंदता (Viscosity) वाढलेली असते. उलट पातळ इंधनाच्या मिश्रणामुळे ते पातळ बनून त्याची विष्यंदता कमी झालेली  असते. त्यात उतरलेल्या इंधनांमुळे वंगणाचा ज्वलनबिंदू (ज्वलनक्षमता दर्शविणारे कमीतकमी तापमान) कमी झालेला असतो.  त्यामुळे ते निकामी तेल बदलावे लागते. वंगण तेलाची बचत करण्यासाठी, निकामी झालेल्या तेलाची रासायनिक प्रक्रिया करून त्याचे फेरशुध्दिकरण करण्यात येते.

चाचणी व विश्लेषण पद्धती : प्रथमत: निकामी तेलाची शिल्लक गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासली जाते. त्यात जमलेल्या पाण्याच्या अंशाचा निचरा करून त्याचे विश्लेषण केले जाते. घर्षणाने तेलात उतरलेले यंत्रभागाचे धातूकण, त्यात मिसळलेले इंधन, अन्य रासायनिक पदार्थ तसेच केरकचरा व धूळ यांचे प्रमाण मोजले जाते. नंतर या तेलाचे फेरशुध्दिकरण करून त्याचा काही भाग मूळ स्वरूपात प्राप्त करता येतो.

फेरशुध्दिकरण प्रक्रिया

फेरशुध्दिकरण प्रक्रिया : फेरशुध्दिकरणाची रासायनिक प्रक्रिया विविध टप्प्यांची असते.

साठवण आणि निचरण : प्रथमत: टाकाऊ तेल एकत्रित करून साठविले जाते. त्यावेळी त्यात जमलेला केरकचरा, धूळ, मळी व अन्य अविद्राव्य घटक तळाशी साचतात आणि ते वेगळे करण्यास मदत होते.

निर्जलीकरण आणि अवक्षेपण : त्यानंतर ते गडद रंगाचे तेल तापवून त्यात विरघळलेला पाण्याचा अंश काढला जातो. नंतर सल्फ्युरिक अम्लाची प्रक्रिया करून त्या वंगण तेलातील विद्राव्य व अविद्राव्य घटकांचा अवक्षेप तयार केला जातो. हा अवक्षेप वेगळा केला जातो.

अभिशोषण आणि गाळणक्रिया : फ्युलर्स अर्थ/मुलतानी माती ही विशिष्ट गुणवत्तापूर्ण माती असून ती तेल किवा रंगीत द्रव्यांना रासायनिक प्रक्रियेशिवाय अभिशोषणाद्वारे रंगहीन करते. यामध्ये पॅलिगोर्स्काइट (Palygorskite) आणि बेंटोनाइट (Bentonite) हे रासायनिक घटक असतात.

ते अम्लयुक्त तेल मुलतानी मातीमध्ये घुसळवून, त्याचे गाळण केले असता शुध्द स्वरूपातील काहीसे फिकट रंगाचे वंगण मिळते. या तेलात आवश्यक ती रासायनिक पुरके मिसळली असता विविध कार्यासाठी उपयुक्त ठरणारी वंगण तेले निर्माण होतात.

फेरशुध्दिकरणातील विविध प्रक्रियांमुळे मूळ वंगण तेलाचा जाडसरपणा कमी होतो आणि अशा वेळी नवीन तेले आवश्यकतेनुसार काही प्रमाणात फेरशुध्दिकरण केलेल्या तेलात मिसळावी लागतात.

व्यावसायिक उपयुक्तता : फेरशुध्दिकरणाने वापरून झालेल्या वंगण तेलापासून मूळ स्वरूपातील तेल प्राप्त करण्याच्या व्यवसायाला जागतिक महत्त्व लाभले आहे. वंगण तेलाची बचत व्हावी आणि वापरून निकामी झालेल्या होणाऱ्या तेलाच्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी विकसित देशांमध्ये या प्रक्रियेला कायदेशीर प्रोत्साहन दिले जाते.

संदर्भ :

• Reusing Used Lubricating Oil, Urja Vol XXIV,No 5, Nov 1988.

• काळे सोने, अनघा प्रकाशन, ठाणे,२०१२.

समीक्षक : राजीव चिटणीस