सुंद्री : लोकसंगीतातील एक सुषिर वाद्य. शहनाईचे वेगळे स्वरूप म्हणून दीड वीत लांबीच्या फुंकवाद्यामध्ये ते रूढ झाले आहे. सुंद्री हे पूर्णपणे महाराष्ट्रीयन सुषिर वाद्य आहे. वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात येणारे हे वाद्य आहे. महाराष्ट्रातला कर्नाटक सीमेलगतचा भाग तसेच साताऱ्याचा काही भाग या परिसरांत बऱ्याच प्रमाणात हे वाद्य वाजविले जाते. संगीत रत्नाकर या संगीत ग्रंथातील मधुकरी या वाद्याचे वर्णन सुंद्री या वाद्याशी मिळते जुळते आहे ; त्यामुळे हे वाद्य नक्कीच प्राचीन आहे असे म्हणायला वाव आहे. सुंद्री साधारणत: ८ ते १० इंच लांब असते, त्या तुलनेत सनई एक ते दीड फुट लांब असते. सुंद्री मुख्यत्वे शिसम म्हणजे शिसवीच्या किंवा खैराच्या जे पक्के लाकूड असते त्याच्या पासून बनवली जाते. त्याचे विशेष कारण असे की, सुंद्रीचा मूळ स्वर पांढरी चार हा आहे. पांढरी चार किंवा त्याच्यापासून वरच्या सुराला सुंद्री वाजविली जाते.
उंच सुराला जो धारदारपणा आवश्यक असतो त्याकरिता खैराचे किंवा शिसमचे लाकूड योग्य आहे; त्यामुळे त्या लाकडापासुनच ती बनविली जाते. सुंद्रीत सनई प्रमाणे तीन भाग नसतात, दोनच भाग असतात. जो प्याला सनईत धातूचा बनवलेला असतो तो सुंद्रीत तसा धातूचा बनविलेला नसतो तो लाकडापासूनच बनवतात व तो सुंद्रीचाच एक भाग असतो. दुसरा जो भाग रीडचा असतो तो सनई प्रमाणे असतो. सुंद्रीसुद्धा रीडनेच वाजविली जाते. सुंद्री मध्ये महाराष्ट्रात ताडाच्या पानापासून रीड बनवली जाते. अलीकडील काळात सुंद्रीवादक प्रयोगशीलता किंवा वादनात गोडवा निर्माण व्हावा किंवा शास्त्रीय संगीत सुलभतेने वाजवता यावे म्हणून बनारसी रीडचा सुद्धा प्रयोग करतात.सुंद्रीचा तोंडाकडून जो फुंकण्याचा भाग असतो आणि आवाज जिथून बाहेर येतो तिथपर्यंतचा त्याचा व्यास एकसारखा असतो, तसे सनई मध्ये नसते. सनईमध्ये अंतर्भाग थोडा निमुळता होत गेलेला असतो. सुंद्रीमध्ये फक्त प्याल्याचा आकार वेगळा असतो. सुंद्री आठ छिद्रांची असते.साधारणपणे सात छिद्रे वरती केली जातात, अंगठ्याजवळ एक छिद्र केले जाते. तार सप्तकामध्ये वाजवताना या खालच्या अंगठ्याकडचे जे छिद्र असते त्याचा उपयोग करून तारसप्तकातले सूर वाजवले जातात. सुंद्री आणि शहनाई किंवा आपल्या महाराष्ट्रातील सनई यामध्ये मुख्य फरक असा आहे की,सुंद्रीवादन हे कर्नाटकी संगीताशी मिळते जुळते असल्यामुळे त्याची स्वतंत्र अशी वादनशैली आहे. ज्याप्रमाणे आपण सनईवादन ऐकतो त्याप्रमाणे सुंद्रीवादन होत नाही. हे वाद्य वाजविण्याच्या काही विशेष जागा किंवा काही विशेष प्रसंग असतात. शुभप्रसंगाच्या निमित्ताने, धार्मिक प्रसंगाच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे मिरवणुका किंवा मंदिरे अशा ठिकाणी हे वाद्य वाजविले जाते. या वाद्यावर पूर्वीच्या काळी संपूर्ण लोकसंगीत किंवा भक्तीसंगीत वाजवले जायचे. कर्नाटक सीमेलगत हे बरेचदा वाजवले जात असल्यामुळे कर्नाटक संगीताचा प्रभावही या वादनशैलीवर आहे. आजकाल संपूर्ण शास्त्रीय संगीत सुद्धा सुंद्रीवर वाजवले जाते. मैफिलीमध्ये आजकाल सुंद्री वादनाचा सामावेश होतो आहे आणि त्यात त्याला मानाचे एक स्थान मिळत आहे. सिद्राम जाधव आणि शंकरराव गायकवाड यासारख्या सुंद्री वादनातील ख्यातनाम कलावंतानी सुंद्रीवादनाला अफाट प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
संदर्भ :
- चंदावरकर, भास्कर, वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०११.