घांगळी : आदिवासी तंतूवाद्याचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे घांगळी हे वाद्य होय. उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीच्या आधारे या वाद्याची निर्मिती केली जाते. हे वाद्य दोन भोपळ्यांच्या बैठकीवर बांधलेले तंतूवाद्य आहे. काडीच्या तीन फुट पाट्याला मोहावर, तर दोन्ही बाजूला भोपळे व मध्ये तार अशी या वाद्याची रचना असते. याला झांगळी असेही म्हणतात. घांगळी वर तीन-तीन, चार-चार दिवस कथापुराण चालते. आदिवासी जमातीतील कणसरी आणि धरती मातेच्या पूजेचे हे वाद्य आहे.

या वाद्याच्या साथीत देवीची गाणी गायली जातात. कणसरी आणि धरती माता या आदिवासींच्या धनधान्य समृद्धी करणाऱ्या देवता आहेत. ज्यावेळी शेतातून धान्य शेतातील खळ्यावर आणले जाते त्यावेळी धान्याची पूजा करण्यासाठी आणि कणसरी आणि धरती माता यांचे आभार मानण्यासाठी घांगळी गायन होते. या गायनात कणसरी आणि धरती माता यांची कथा कथागायनाच्या माध्यमातून ऐकवली जाते. वेळप्रसंगी हे कथागायन घरोघरीही केले जाते. घांगळीच्या तारा बोटांनी छेडून वाजवितात. कथाकार वादक दोन्ही हाताने कपाळाजवळ हे वाद्य धरून दोन्ही हाताच्या तर्जनी बोटाने तारा छेडत असतो त्यातून निघणाऱ्या सुराच्या आधारे हे कथागायन करत असतो. झांगळीचा आकार वीणेसारखा आहे. कोकणा या आदिवासी जमातीत भगत देवाला जागे करण्यासाठी देव डोब्रू या वाद्यासोबत झांगळी वाद्य वाजवितात. घांगळी या वाद्यावर प्रासंगिक नाच देखील नाचले जातात. रवाल नावाच्या नाचाच्या वेळी केवळ घांगळी हे वाद्य वाजविले जाते. घांगळी हा आदिवासींचा एक देवही आहे. त्याच्या तृप्तीसाठी रवाल हा नाच विशिष्ट वेळी केला जातो. या वाद्याचे प्राचीनत्व लक्षात घेतल्यास ही तंतुवाद्याची सुरवातीची अवस्था म्हणता येईल. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या गुजरात प्रांतातील आदिवासी भागात ही घांगळी गायन होते.

संदर्भ :

  • गारे, गोविंद ; सोनावणे, उत्तमराव, आदिवासी कला, गमभन प्रकाशन, १९९३.