जमिनीतून खणून काढलेल्या सर्वच नैसर्गिक पदार्थांना सामान्य व्यवहारात खनिज म्हणतात. आपल्या रोजच्या व्यवहारात दगडी कोळसा, शाडू, माती तसेच काचनिर्मितीसाठी वापरली जाणारी सिलिका वाळू किंवा बांधकामात वापरली जाणारी वाळू यांना खनिज म्हणून संबोधले जाते. परंतु खनिजाच्या वैज्ञानिक व्याख्येनुसार या सर्वांचा समावेश खनिजात होत नाही. मोती, प्रवाळ, हस्तिदंत, अंबर यांना आपण रत्ने म्हणून जरी दागिन्यात वापरत असलो, तरी हे प्राणीज व वनस्पतीजन्य पदार्थ असल्यामुळे त्यांना खनिज म्हणता येत नाही. तसेच खनिज तेल, खनिज जल हे द्रव असल्यामुळेही ते खनिज नाहीत.

प्राचीन काळापासून खनिजे ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. पाषाणयुग, कांस्ययुग, लोहयुग अशा मानवी संस्कृतीतील विविध कालखंडांनादेखील खनिजे किंवा त्यापासूनच्या वापरलेल्या उत्पादनांची नावे आहेत. काही खनिजांची नावे ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहेत. मराठी भाषेत सैधव, अभ्रक, सुवर्णमाक्षिक इ. सुमारे पाऊणशे खनिजांची नावे रूढ आहेत. पूर्वी खनिजांची बहुसंख्य नावे ही त्याचा रंग, विशिष्ट गुरुत्व अशा भौतिक गुणधर्मांवर आधारित होती. पुढील काळात वैज्ञानिक प्रगतीनुसार हजारो नव्या खनिजांचे शोध लागले, तेंव्हा त्यांच्या वैज्ञानिक वर्गीकरणाची गरज भासू लागली.

नवीन खनिजे व त्यांची नावे यांसंबंधीची माहिती १९६० पूर्वी वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध होत. त्याची सत्यता पडताळून पाहाणे किंवा ते तपासणे याकामी त्या काळी अशी कोणतीही संघटना नव्हती. याच दरम्यान इंटरनॅशनल मिनरॉलॉजिकल ॲसोसिएशन (IMA) या संघटनेची स्थापना झाली. खनिजांचे नाव आणि वर्गीकरण यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून ॲसोसिएशनने २००६ मध्ये कमिशन ऑन न्यू मिनरल्स, नॉमेनक्लेचर अ‍ॅड क्लासिफिकेशन (CNMNC) हा एक नवीन आयोग स्थापन केला. त्यामुळे आता नवीन खनिजाची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी या आयोगाने अधिकृत मान्यता दिल्यानंतरच त्याचे नामकरण होऊन त्या खनिजाची नोंद होत असते.

बहुतांश खनिजांची नावे ग्रीक किंवा लॅटिन शब्दांवरून, तर काही मूळ संस्कृत शब्दांवरून तयार केलेली  आहेत. बऱ्याचशा खनिजांच्या शास्त्रीय नावांचा शेवट हा आइट (किंवा इट) या अक्षरांनी (उदा., अल्बाइट, ब्रूकाइट, झिओलाइट) होतो. काही नावे व्यक्तींच्या नावांवरून (उदा., शीलाइट, स्मिथसोनाइट), तर काही भौगोलिक स्थानांच्या नावांवरून (उदा., लॅब्रॅडोराइट, व्हीस्यूव्हिअनाइट) दिली गेली आहेत. मॅग्नेटाइट हे नाव ग्रीसमधील मॅग्नेशिया या भौगोलिक स्थानावरून देण्यात आलेले आहे. ते त्याच्या चुंबकीय गुणांमुळे आहे असा चुकीचा समज आहे. काही नावे खनिजाच्या भौतिक गुणधर्मावरून दिली गेलेली आहेत. उदा., ॲझुराइट हे नाव त्या खनिजाच्या ॲझूर म्हणजे मोरचुदासारख्या निळ्या रंगावरून दिले गेले. स्टिलबाइट हे नाव त्याच्या चमकेवरून, डायमंड हे त्याच्या काठिण्यावरून, बराइट हे त्याच्या विशिष्ट गुरूत्वावरून, तर ऑर्थोक्लेज हे त्याच्या विपत्रणावरून देण्यात आले. स्टॅनाइट या खनिजात कथिल असते म्हणून कथिलाच्या लॅटिन नावावरून हे नाव दिलेले आहे. झिंकाइट, फ्ल्यूओराइट, मॉलिब्डेनाइट इ. नावेही खनिजातील एखाद्या रासायनिक मूलद्रव्यावरून दिलेली आहेत.

भारतीय भूवैज्ञानिक बी.पी.राधाकृष्णन यांच्या गौरवार्थ १९८५ मध्ये राधाकृष्णाइट (Radhakrishnaite) हे नाव एका खनिजाला देण्यात आले. मूळ भारतीय असलेले मात्र अमेरिकास्थित खनिज अभ्यासक रुस्तुम रॉय यांच्या नावावरून रुस्तुमाइट (Rustumite), तर ख्यातनाम भारतीयविद्या अभ्यासक आनंद कुमारस्वामी यांच्या सन्मानार्थ आनंदाइट (Anandite) ही नावे खनिजाला देण्यात आली आहेत.

सध्या जगभरातून पाच हजारांहून अधिक जास्त खनिजे ज्ञात आहेत. यांतील ५०% पेक्षा जास्त खनिजांचे नामकरण हे व्यक्तीचे नाव अथवा आडनावांवरून केलेले आहेत. २५% नामकरण हे भौगोलिक स्थानाच्या नावांवरून, १४% त्यांचे रासायनिक संघटन, तर ८% नामकरण हे विशेष अशा भौतिक गुणधर्मावरून (रंग, चमक, काठिण्य, विशिष्ट गुरुत्व, विपत्रण) केले असल्याचे दिसून येते.

संदर्भ : https://www.mindat.org  

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर