ब्राहे, टायको : ( १४ डिसेंबर १५४६ – २४ ऑक्टोबर १६०१ )
आकाशाकडे दुर्बिण रोखली तर सहजासहजी आपल्या दृष्टीला न पडणाऱ्या अनेक गोष्टी आणि त्यांच्यातले बारकावे आपल्याला दिसू शकतात, हे गॅलिलिओ यांनी जगाला दाखवून दिले. परंतु दुर्बिणीची ही ताकद आणि अवाका मानवाला समजण्यापूर्वीसुद्धा अनेक संशोधकांनी खगोलशास्त्रात भरीव कामगिरी केली आहे; त्यापैकीच एक म्हणजे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि त्याकाळी अल्केमिस्ट किंवा किमयागार म्हणूनही ज्ञात असलेले टायको ब्राहे होत.
टायको ब्राहे यांचा जन्म स्कॅनिया इथे अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यावेळी स्कॅनिया डेन्मार्कमध्ये होते. आता ते स्वीडनमध्ये आहे. टायकोचे वडील खूप श्रीमंत होते आणि डॅनिश राजाच्या दरबारात त्यांना मान होता. टायको दोन वर्षांचा असताना जॉर्गन ब्राहे या त्यांच्या निपुत्रिक काकाने पुत्रप्रेमापोटी टायकोला चक्क पळवून नेले आणि त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्याने टायकोची कोपनहेगन आणि लिपझिग येथे तत्त्वज्ञान आणि कायदा यांचे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळण्याची सोय केली. आपल्या पुतण्याने राजकीय कारकीर्द करावी असे त्यांच्या मनात होते. हे शिक्षण घेत असताना वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी, टायकोने २१ ऑगस्ट १५६० रोजी, खंडग्रास सूर्यग्रहण होईल असे भाकीत केले आणि विशेष म्हणजे त्यांचे हे भाकीत खरे ठरले. या घटनेमुळे त्यांना खगोलशास्त्रात रुची वाटायला लागली आणि त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि कालांतराने राजकारणाचा अभ्यास सोडून देऊन त्यांनी स्वत:ला खगोलशास्त्राला जणू वाहून घेतले.
शनी आणि गुरु हे ग्रह १५६३ साली एका रेषेत आले होते. टायकोने केलेले हे पहिले वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षण ठरले. टायको कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि कठोर परिश्रम घेणारे होते. त्यांचा स्वभाव मात्र तिरसट आणि भांडखोर होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी, जर्मनीतल्या रॉस्टॉक विद्यापीठात शिकत असताना गणितातल्या एका सूत्राच्या अचूकतेवरून त्यांचे आणि त्यांच्या एका चुलत भावाचे मोठे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की त्याचे पर्यावसान चक्क तलवारबाजीत झाले. या सगळ्या प्रकारात टायको यांना आपले नाक गमवावे लागले. मग त्यांनी आपल्याला चांदीचे नकली नाक बसवून घेतले.
इस. १५७२ साली टायको ब्राहे यांचे लक्ष कॅसिओपिया तारकापुंजामध्ये दिसणाऱ्या एका ठळक ताऱ्याकडे गेले. यापूर्वी हा तारा इतका ठळकपणे ब्राहे यांच्या नजरेला पडला नव्हता. त्यामुळे त्यांनी या ताऱ्याची निरीक्षणे घ्यायला सुरुवात केली. या ताऱ्याचे तेज पहिल्यांदा गुरू ग्रहाएवढे होते. नंतर तो शुक्रासारखा तेजस्वी दिसायला लागला. त्यानंतर सुमारे दोन महिने हा तारा चक्क दिवसाढवळ्याही सहज दिसत होता. त्यानंतर मात्र तो फक्त रात्रीच दर्शन देऊ लागला आणि कालांतराने दिसेनासा झाला. सुमारे १४ महिने दिसणारा हा तारा म्हणजे अतिशय तेजस्वी असा अतिनवतारा होता. या ताऱ्याला ब्राहे यांनी नोव्हा म्हणजे नवजात तारा असे संबोधले. आता अशा प्रकारच्या ताऱ्याना आता सुपरनोव्हा म्हणतात.
ब्राहे यांनी, या ताऱ्याचा सखोल अभ्यास केला आणि आपल्या निरीक्षणांवर आधारित डी नोव्हा स्टेला नावाचे पुस्तक लिहिले. आपल्या निरीक्षणांवरून सूर्यमालेच्या बाहेरही तारे असावेत असा महत्वाचा निष्कर्ष ब्राहे यांनी काढला. ब्राहे यांनी अभ्यास केलेला तारा पृथ्वीपासून सुमारे साडेसात हजार प्रकाशवर्षे अंतरावर होता आणि त्याचे तेज सुमारे तीस कोटी सूर्यांच्या तेजाएवढे होते.
टायको ब्राहे हे कोपर्निकसच्या कोष्टकांनी प्रभावित झाले होते. ग्रहांच्या हालचाली कशा होतात हे या कोष्टकांमध्ये लिहिले होते. ब्राहे यांना ग्रहांच्या गतीचे विलक्षण आश्चर्य वाटत होते. ग्रहांच्या भ्रमणाचा अधिक अभ्यास करण्यासाठी ब्राहे यांनी फ्रेडरिक (दुसरा) राजाकडे आर्थिक मदत मागितली. राजाने ब्राहे यांना मदती दाखल हॅवेन नावाचे एक संपूर्ण बेटच दिले आणि या बेटावर वेधशाळा बांधण्यासाठी येणारा सगळा खर्चही दिला. या बेटावर युरानीबोर्ग इथे ब्राहे यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी वेधशाळा आणि आपल्या अल्केमीच्या प्रयोगांसाठी प्रयोगशाळा उभारली. खगोलशास्त्रातल्या निरीक्षणासाठी लागणारी उपकरणे त्यांनी स्वत: तयार केली. यानंतरची वीस वर्षे म्हणजे सन १५७२ ते १५९२ या काळात, टायको ब्राहे यांनी अखंडपणे निरीक्षणे केली. त्यांनी तब्बल ७७७ ताऱ्यांचा अभ्यास केला आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या ताऱ्यांची स्थिती त्यांनी निश्चित केली. त्यांनी केलेल्या निरीक्षणांची अचूकता एका अंशाच्या सहाव्या भागाइतकी म्हणजे १० मिनिटे इतकी होती. ती वाढवत वाढवत २ मिनिटे इतकी सूक्ष्म करण्यात त्यांना यश आले. त्याकाळी उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या उपकरणांच्या सहाय्याने अचूक निरीक्षणे घेण्यात ब्राहे यांनी आपल्या आयुष्याच्या अनेक रात्री व्यतीत केल्या. त्यांची बहिण सोफिया ही त्यांना वाचने घेण्यात मदत करत असे.
निकोलस कोपर्निकस यांनी १५४२ मध्ये सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला होता. या सिद्धांतानुसार सर्व ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करतात. परंतु हे टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्री सिद्धांताच्या विरुद्ध होते. कोपर्निकस यांच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला चर्चचा देखील विरोध होता. टायको ब्राहे यांच्या मते, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी सूर्य आणि चंद्र मात्र पृथ्वीभोवती फिरतात. आपले मत सिद्ध करण्यासाठी त्यांनी मंगळ ग्रहाची अक्षरश: हजारो निरीक्षणे नोंदवली. या निरीक्षणांवरून पृथ्वीसह सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात असाच निष्कर्ष निघत होता. मात्र ब्राहे यांना मात्र ठाम वाटायचे की सूर्य इतर ग्रहांना घेऊन पृथ्वीभोवती फिरतो. अखेरपर्यंत निरीक्षणे घेऊन त्यांनी आपल्या या मताचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. ब्राहे यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांचा उपयोग योहानस केप्लर या संशोधकाला झाला.
फ्रेडरिक राजाच्या मृत्युनंतर त्याच्या जागी राज्यावर आलेल्या ख्रिश्चन (चौथा) या राजाने ब्राहे यांना हॅ्वेन बेट सोडायला लावले. तीन वर्षांच्या भटकंतीनंतर ब्राहे प्रागमध्ये स्थायिक झाले. रोमन साम्राज्याचा त्या वेळचा सम्राट रुडॉल्फ (दुसरा) याने ब्राहे यांना प्रागपासून पन्नास किलोमीटरवर असलेला एक किल्ला वेधशाळेसारखा वापरायला दिला. इथेच ब्राहे आणि केप्लर यांची भेट झाली. त्यानंतर दोन वर्षांत ब्राहे यांचा मृत्यू झाला.
ब्राहे यांचे संशोधन कार्य केप्लर यांनी पुढे सुरू ठेवले. ब्राहे यांनी केलेल्या निरीक्षणांवरून केप्लर यांनी आजचा सुधारित सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. ब्राहे यांनी तयार केलेली तारका सूची केप्लर यांनी आपली आणखी काही भर घालून रुडॉल्फाईन टेबल्स या नावाने प्रसिद्ध केली. अशा प्रकारे कोपर्निकस अणि केप्लर यांच्या खगोल संशोधनातला दुवा म्हणून टायको ब्राहे यांचं नाव घेता येईल.
ब्राहे यांनी युरानीबोर्ग इथे उभारलेली वेधशाळा तीस वर्षं चाललेल्या एका युद्धामध्ये नष्ट झाली. परंतु आपल्या कार्यामुळे टायको ब्राहे हे नाव अजरामर झालं आहे. १५७२ साली, त्यांनी अभ्यास केलेल्या ताऱ्याला टायकोचा तारा म्हणून संबोधण्यात आले. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेसंबंधी आणि मंगळ ग्रहासंदर्भात ब्राहे यांनी केलेल्या संशोधनाच्या सन्मानार्थ चंद्र आणि मंगळावरील विवरांना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Tycho-Brahe-Danish-astronomer
- http://www.famousscientists.org/tycho-brahe/
समीक्षक : रघुनाथ शेवाळे