एक समुद्री प्राणी. फायसेलियाचा समावेश आंतरदेहगुही संघाच्या हायड्रोझोआ वर्गातील सायफोनोफोरा गणाच्या फायसेलिडी कुलात केला जातो. फायसेलिया फायसेलिस असे शास्त्रीय नाव असलेल्या या जीवांच्या समूहाला सामान्यपणे फायसेलिया म्हणतात. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक समुद्र वगळता सर्व समुद्रांत ते आढळून येतात. फायसेलिया हा दिसायला जरी जेलीफिशसारखा असला तरी तो त्यापेक्षा वेगळा आहे. जेलीफिश हा बहुपेशीय जीव आहे. फायसेलिया हा अनेक, लहान आणि स्वतंत्र जीवांच्या वसाहतीच्या स्वरूपातील समूह आहे. अशा जीवांना जीवके (झुऑइड) म्हणतात. ही जीवके एकमेकांना चिकटलेली असून त्यांच्या शरीरक्रिया इतक्या एकात्मिक झालेल्या असतात की, त्यांना स्वतंत्रपणे जगता येणेच शक्य नसते.
फायसेलियाचे वरचे शरीर वायूंनी भरलेल्या पिशवीसारखे असते. त्याला वातप्लवक म्हणतात. ते अर्धपारदर्शक, जांभळे व ९–३० सेंमी. लांब असून पाण्यावर सु. १५ सेंमी. वाढू शकते. त्याचा अर्धा भाग पाण्याच्या पृष्ठभागावर, तर अर्धा भाग पाण्यात बुडालेला असतो. पाण्यावर ते एखाद्या तरंगणाऱ्या पालथ्या बशीसारखे दिसते. वातप्लवक द्विपार्श्वसममित असून त्याच्या खालच्या बाजूला निळी, जांभळी, गुलाबी किंवा नारिंगी छटा असलेली स्पर्शके असतात. त्यामध्ये असलेल्या वायुग्रंथीद्वारे कार्बन मोनॉक्साइड वायू निर्माण होतो. त्याच्या वायु-आशयात सु. १४% कार्बन मोनॉक्साइड असतो. याखेरीज नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि अन्य वायू असतात. वातप्लवकाला नलिका असतात. फायसेलियावर हल्ला झाल्यास तो या नलिकांमार्फत फुग्यातील हवा सोडल्याप्रमाणे वायु-आशयातील वायू बाहेर सोडतो आणि पाण्याच्या पृष्ठभागाखाली बुडतो. फायसेलियाच्या डिंभावस्थेपासून वातप्लवक तयार होते. ते जीवक नसावे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
फायसेलियाच्या खालच्या बाजूला बहुशुंडक म्हणजे फुलदाणीच्या आकाराची नळीसारखी संरचना असते व तिच्या तोंडावर स्पर्शके गुच्छाने असतात. बहुशुंडक जीवक असून ते तीन प्रकारांचे असतात : स्पर्शीजीवक, भक्षीजीवक आणि जननजीवक. स्पर्शीजीवक हे स्पर्शकांचे (टेंटॅकल) बनलेले असून त्यांची लांबी सु. १० मी. असते. काही वेळा हे स्पर्शक सु. ५० मी. लांब असतात. प्रत्येक स्पर्शकावर दंशपुटी असतात आणि त्यांच्यामार्फत हा प्राणी लहान मासे, चिंगाटी इ. प्राण्यांना दंश करून ठार करतो. प्रत्येक स्पर्शकात आकुंची पेशी असतात आणि त्या मारलेले भक्ष्य भक्षीजीवकाकडे खेचून नेतात. भक्षीजीवक भक्ष्याला घेरतात आणि त्यावर विकरे स्रवून त्यांतील प्रथिने, कर्बोदके आणि मेद पदार्थ यांचे पचन घडवून आणतात. प्रजनन जनन-जीवकाद्वारे होते आणि ते लैंगिक तसेच अलैंगिक असे दोन्ही प्रकारांचे असते. फायसेलियाची प्रत्येक वसाहत एक तर नर किंवा मादी असते. जननजीवकांद्वारे युग्मके तयार होतात आणि ती पाण्यात सोडली जातात. एका वसाहतीच्या शुक्रपेशी दुसऱ्या वसाहतीच्या अंडपेशीबरोबर संयोग पावतात आणि त्यांतून होणाऱ्या फलित अंडाचे रूपांतर डिंभात होते. डिंभापासून एक बहुशुंडक तयार होतो. या बहुशुंडकापासून अलैंगिक प्रजननाने मुकुल तयार होतात आणि फायसेलियाची नवीन वसाहत तयार होते.
फायसेलियाच्या दंशपेशीत हिप्नोटॉक्सीन हे विषारी रसायन असते. समुद्रात पोहताना तसेच समुद्रकिनारी चालताना फायसेलियाच्या स्पर्शकांचा मनुष्याला स्पर्श झाल्यास विषबाधा होते. त्यामुळे तीव्र वेदना, त्वचेची जळजळ, श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, एकदम शक्तिपात होणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यांच्या दंशामुळे काही वेळा स्नायू शिथिल होतात आणि परिणामी हातपाय हालविता न आल्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू होऊ शकतो. म्हणून समुद्रकिनारी किंवा समुद्राच्या पाण्यात जाताना सावधगिरी बाळगण्याची गरज असते. काही वेळेला हजारोंच्या संख्येने त्यांच्या झुंडी दिसून येतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर फायसेलिया मोठ्या संख्येने आढळून आले होते आणि त्यांच्या दंशामुळे अनेक व्यक्तींना त्रास झाला होता.
फायसेलियाला ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’ किंवा ‘मॅन ऑफ वॉर’ असेही म्हणतात. अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या ज्या युद्धनौका तोफांनी सज्ज होत्या आणि शिडांमार्फत वल्हविल्या जात होत्या, त्या नौकांचा उल्लेख ‘मॅन ऑफ वॉर’ किंवा ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’ असा केला जात असे. फायसेलिया आकाराने या नौकांप्रमाणे दिसतो म्हणून त्याचाही उल्लेख वरीलप्रमाणे केला जातो.
https://www.youtube.com/watch?v=RBdCpcapB0s