पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले आहे’ ते तत्त्व होय. भौतिक सृष्टी या पाच मूळ तत्त्वांपासून उत्पन्न होते, म्हणून त्यांना महाभूत असे म्हणतात. जरी महाभूतांची नावे पृथ्वी, जल इत्यादी असली तरीही ती नावे फक्त त्या एका वस्तूचा किंवा पदार्थाचा बोध करून देत नाहीत, तर त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या अन्य पदार्थांचाही त्या तत्त्वामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ, महाभूतांमध्ये पृथ्वी हा शब्द पृथ्वी ग्रहासाठी वापरलेला नसून त्याव्यतिरिक्त खुर्ची, टेबल इत्यादी जड पदार्थांचा पृथ्वी या तत्त्वात समावेश होतो. महाभूतांमध्ये अग्नि हा शब्द फक्त आगीसाठी वापरलेला नसून त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या विद्युत्, सूर्य इत्यादी गोष्टींचाही समावेश अग्नी या तत्त्वात किंवा महाभूतामध्ये होतो.

आधुनिक भौतिकशास्त्रात पदार्थांच्या स्थायू, द्रव आणि वायु अशा तीन अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यानुसार पदार्थांचे विभाजन क्रमाने पृथ्वी, जल किंवा वायु असे करता येऊ शकत नाही. कारण बर्फ हा स्थायू असला तरीही तो जलतत्त्वाचा आहे किंवा वितळलेले मेण हे द्रव असले तरीही ते पृथ्वीतत्त्वाचे आहे. त्यामुळे पदार्थाच्या अवस्था आणि महाभूते यांचा निश्चित संबंध आहे, असे म्हणता येऊ शकत नाही. न्याय-वैशेषिक दर्शनांप्रमाणे ज्यामध्ये गंध आहे ती पृथ्वी, ज्यात शीत-स्पर्श आहे ते जल, ज्यात उष्ण-स्पर्श आहे तो अग्नी, ज्यात रंग नाही पण ज्याचा स्पर्श अनुभवता येऊ शकतो तो वायु आणि शब्द (ध्वनी) ज्यामधून प्रवास करू शकतो ते आकाशतत्त्व अशी महाभूतांची विशेष लक्षणे आहेत. सांख्य-योग आणि वेदान्त दर्शनांनुसार महाभूतांमध्ये पुढीलप्रमाणे गुण दिसून येतात – (१) आकाशात शब्द (ध्वनी), (२) वायूत शब्द व स्पर्श, (३) अग्नीत शब्द, स्पर्श व रूप, (४) जलात शब्द, स्पर्श, रूप व रस, (५) पृथ्वीत शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध.

वाचस्पतिमिश्रांनी तत्त्ववैशारदी या योगाच्या टीकाग्रंथामध्ये महाभूतांचे पुढीलप्रमाणे धर्म सांगितले आहेत –

(१) पृथ्वीमध्ये विशिष्ट आकार असणे, वजन असणे, कोरडेपणा, दुसऱ्या पदार्थावर आवरण निर्माण करणे, स्थिरता, सर्वभूतांचा आश्रय असण्याची योग्यता, दुसऱ्या पदार्थांना भेदून जाण्याची योग्यता, आघात इत्यादी सहन करण्याची योग्यता, दृढता आणि कठीणपणा हे धर्म असतात.

(२) जलामध्ये ओलसरपणा, झिरपण्याची योग्यता, चमकणे, मऊपणा, वजन असणे, थंड स्पर्श, शरीर इत्यादींचे रोगांपासून रक्षण करण्याची योग्यता, पावित्र्य आणि पीठ, माती इत्यादी पदार्थांना बांधून ठेवण्याची योग्यता हे धर्म असतात.

(३) अग्नीमध्ये वरच्या दिशेने जाण्याचा स्वभाव, दुसऱ्या पदार्थांना शिजवण्याचा स्वभाव, दाहकता, हलकेपणा, प्रकाशकता, दुसऱ्या पदार्थांना जाळून नष्ट करण्याची क्षमता हे धर्म असतात.

(४) वायूमध्ये कोणत्याही दिशेला जाण्याची योग्यता, झाडे इत्यादींना हलवण्याची आणि पाडण्याची योग्यता, चंचलता (एका जागी स्थिर न राहणे), सावली नसणे आणि कोरडेपणा हे धर्म असतात.

(५) आकाशामध्ये सर्वव्यापी असणे, अवयवरहित असणे आणि मधे कोणताही अडसर नसणे हे धर्म असतात.

सांख्य-योग दर्शनांप्रमाणे पृथ्वीतत्त्वाची उत्पत्ती गंधतन्मात्रेपासून, जलतत्त्वाची उत्पत्ती रसतन्मात्रेपासून, अग्नीची उत्पत्ती रूपतन्मात्रेपासून, वायूची उत्पत्ती स्पर्शतन्मात्रेपासून आणि आकाशाची उत्पत्ती शब्दतन्मात्रेपासून होते. महाभूतांमध्ये तमोगुणाचे आधिक्य असते. वेदान्त दर्शनानुसार तन्मात्रांमध्ये पंचीकरण प्रक्रिया होऊन महाभूतांची उत्पत्ती होते, त्यामुळे प्रत्येक महाभूतामध्ये अर्धा भाग त्या तत्त्वाचा आणि बाकी अर्धा भाग हा अन्य चार महाभूतांच्या मिश्रणाने बनलेला असतो. उदाहरणार्थ, पृथ्वीमहाभूतामध्ये ५०% पृथ्वी असून १२.५% जल, १२.५% अग्नी, १२.५% वायू आणि १२.५% आकाश असते. न्याय-वैशेषिक दर्शनांप्रमाणेपृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या चार महाभूतांचे परमाणू आणि आकाश हे नित्य आहेत. अर्थात् त्यांना कोणी उत्पन्नही करू शकत नाही आणि त्यांचा कोणी विनाशही करू शकत नाही. परमाणूंचा संयोग झाल्यावर विटा, इमारती इत्यादी पदार्थ उत्पन्न होतात, परंतु परमाणूंना कोणी उत्पन्न करत नाही. चार्वाक दर्शनामध्ये आकाश महाभूत स्वीकारले जात नाही. कारण त्याचे ज्ञान प्रत्यक्ष इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही. या पद्धतीने महाभूते ही सर्व दर्शनांमध्ये स्वीकारलेली आहेत, परंतु त्यांच्या स्वरूपामध्ये आणि गुणधर्मांमध्ये काही मतभिन्नता दिसून येते.

पहा : तन्मात्र, पंचीकरण, भूतजय.

संदर्भ :

  • कर्णाटक विमला, पातञ्जलयोगदर्शन, रत्ना पब्लिकेशन्स, वाराणसी, १९९२.
  • अन्नंभट्ट, तर्कसंग्रह, भारतीय विद्या प्रकाशन, दिल्ली, १९९९.
  • ईश्वरकृष्ण, सांख्यकारिका, चौखंबा संस्कृत संस्थान, वाराणसी, २००५.

समीक्षक : प्राची पाठक