बकुळ हा सदाहरित वृक्ष सॅपोटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मिम्युसॉप्स एलेंगी आहे. चिकू व मोह हे वृक्षदेखील सॅपोटेसी कुलातील आहेत. दक्षिण आणि आग्नेय आशिया तसेच उत्तर ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्ण प्रदेशांत बकुळ वृक्ष आढळतो. भारतात तो कोकण आणि दक्षिण भारतातील वनांत तसेच अंदमान बेटावर दिसून येतो. बकुळ वृक्षामुळे घनदाट सावली मिळते व त्याची फुले सुगंधी असतात. त्यामुळे बागांमध्ये तो एक शोभिवंत वृक्ष म्हणून लावला जातो.

बकुळ (मिम्युसॉप्स एलेंगी) : (१) वृक्ष, (२) फुलोरा, (३) कच्ची फळे, (४) पिकलेली फळे

बकुळ वृक्ष सु. १६ मी. उंच वाढतो. त्याचा माथा घुमटाप्रमाणे असून साल जाड व गर्द तपकिरी अथवा काळसर असून त्यावर रेषा आणि चिरा असतात. फांद्या व डहाळ्यांमध्ये पांढरट चीक असतो. पाने साधी, चमकदार हिरवी, एकाआड एक, गुळगुळीत, अंडाकृती, ५–१२ सेंमी. लांब व २–५ सेंमी. रुंद असतात. फुले एप्रिलमध्ये येत असून ती सुगंधी असतात. फुले लहान, पिवळसर पांढरी व तारकाकृती असून ती एकेकटी किंवा झुबक्याने येतात. फळ मोठे असून कच्चे असताना हिरवे, तर पिकल्यावर नारंगी-पिवळे होते. पिकलेली फळे मऊ व गोड असतात. फळात  १–३ मोठ्या बिया असतात.

बकुळीच्या खोडाची साल तुरट असते. त्याचा काढा गुळण्या करण्यासाठी तसेच दातांच्या तक्रारींवर उपयोगी असतो. फुलांपासून मिळणारा सुगंधी पदार्थ अत्तरात तसेच तेलात मिसळतात. फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी कमी होते. साल व फळे यांपासून दंतधावन (टूथपेस्ट) बनवितात. ते हिरड्या व दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पिकलेल्या फळांचे मुरंबे किंवा लोणचे तयार करतात. बकुळीचे लाकूड महाग असते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा