कुळकर्णी, तु. शं. : (३ सप्टेंबर १९३२). मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार आणि कवी. जन्म डोंगरकडा, ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे. मराठी साहित्य या विषयात बी. ए. ह्या पदवीपरीक्षेत तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम. एम. ए. ही पदवीही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण. भूतपूर्व हैद्राबाद राज्य व नंतर महाराष्ट्र शासकीय आरोग्य खात्यात सेवा. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय,औरंगाबाद येथे अध्यापन कार्य  केले व तेथूनच सेवानिवृत्त झाले (१९९१) .

१९५१ पासून तु. शं. यांनी लेखनाला  सुरुवात केली. आशयाच्या संदर्भात वि. स.खांडेकर आणि शैलीच्या संदर्भात बी. रघुनाथ हे त्यांचे आदर्श होते. पुढे गाडगीळ – गोखलेप्रणीत नवकथेच्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली. लेखनाची सुरुवात ‘चुका’ या ललित निबंधापासून झाली (१९५१). मराठवाडा  या अर्धसाप्ताहिकात तो प्रकाशित झाला. नंतर महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत त्यांचे साहित्य प्रकाशित होत होते. तु. शं. कुळकर्णी यांची साहित्य संपदा : कथासंग्रह तृणाची वेदना (१९५५), ग्रीष्मरेखा (१९६०), अखेरच्या वळणावर (१९८२);  कवितासंग्रहकानोसा (१९९२) ; इतर क्रांती मार्गावरील प्रवासी  (१९९३, बाबा पृथ्वीसिंह आझाद चरित्र), स्वातंत्र्योत्तर मराठी कविता १९६०-१९८० (संपा.१९९४) आणि इतर अनुवादित साहित्य.

त्यांच्या कथांनी नवकथेच्या प्रवाहात नव्या जाणिवांनी कथालेखन करणारा मराठवाड्यातील लक्षणीय कथाकार ही मुद्रा त्यांच्या नावावर उमटवली गेली. त्यांच्या कथेत एरव्ही नवकथेत नसलेली निजामी राजवटीतील पिडीत हतबल माणसाची परंपराग्रस्त नैतिक, सामाजिक धारणा, पोलिस कार्यवाहीनंतर वेगाने होणारी सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे, मध्यमवर्गाची कुंठितावस्था ही आशयसूत्रे आढळतात. त्यामुळे या कथा एकाच वेळी नवकथा आणि प्रादेशिक कथा या दोन्ही कथांची वैशिष्ट्ये धारण करतात आणि मराठी नवकथेच्या प्रवाहापासून स्वतःची पृथगात्मता सिद्ध करतात. वास्तववादी कथेत कलात्मक गरज म्हणून प्रमुख पात्राचे अस्तित्व नाममात्र असते; परंतु कथारचनेचे संघटनतत्त्व बहुपात्रलक्ष्यी असते. या तत्त्वाची प्रचिती तु. शं. कुळकर्णी यांच्या सगळ्याच कथांमधून येते. त्यांच्या कथेत एकूणच माणसांच्या जगण्याला आलेली कंटाळवाणी लय त्यांनी स्त्री पुरुषांच्या प्रतिनिधिक चित्रणातून कठोर वास्तववादी पद्धतीने व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील वास्तववादी कथेची मुहर्तमेढ रोवण्याचे काम त्यांनी केले. हैद्राबाद संस्थानातील वास्तव ही तु. शं. कुळकर्णी यांची आशयसामग्री आहे. महायुद्ध, यांत्रिकीकरण यांचा उपसर्ग नसलेली ही आशयसामग्री आहे. जगण्याची कंटाळवाणी लय, निजाम राजवटीची राज्यपद्धती आणि नोकरशाही यांच्यामुळे सामान्य माणसाच्या जगण्यात आलेली हतबलता, असहाय्यता हे कुलकर्णी यांचे आस्थाविषय आहेत. गतीमान वास्तवाच्या झंझावातात मनोरथांना येणारे पांगळेपण यांचे मोजके तपशील, प्रसंगी छद्म (आयरॉनिक) भाषाशैली आणि उपहासगर्भ दृष्टिकोन येतो.

त्यांची कविता परिवर्तनसन्मुख, पारंपरिक, संकेतबद्ध रचना पद्धती नाकारणारी आणि कालभान व्यक्त करणारी, मराठवाड्यातील समकालीन काव्यप्रवृत्तीपेक्षा वेगळेपण सिद्ध करणारी कविता आहे. यात स्वतंत्र अभिव्यक्तीतून तरल भावविश्व नीटपणे, नेमकेपणाने व्यक्त करणार्‍या कविता विपुल प्रमाणात आहेत. यांत्रिकपणे जगण्याच्या प्रक्रियेत सजीव भावविश्वाची दारुण कोंडी करणारी विफलता ही तु. शं. कुळकर्णी यांच्या कवितेची आशय सामग्री आहे. त्यांची प्रारंभीची कविता पादाकुलक, अष्टाक्षरी छंदात लिहिली गेली आहे. ‘गणपती फुटपाथवरचे’ ही दीर्घ कविता मुक्तलयीतील आहे. रचनातंत्रातील वैविध्य, प्रयोगशीलता, एकाच वेळेला भावनिक क्षुब्ध प्रतिक्रिया आणि दुसरीकडे तटस्थ भावपूर्णता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. अनेक नियतकालिकांतून त्यांनी अनेक वर्षे सातत्याने समीक्षात्मक लेखन केले आहे. कलामूल्ये आणि जीवन धारणा यांची सांगड घालणार्‍या दि. के. बेडेकर, रा. भा. पाटणकर यांच्या परंपरेतील त्यांची समीक्षा आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. बी. रघुनाथ प्रतिष्ठानच्या वतीने वसमतनगर येथे आयोजित पहिल्या परभणी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९९२), औरंगाबाद येथे आयोजित २३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२००२) ही पदे त्यांनी भूषविली आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना त्यांच्या साहित्यसेवेबद्दल सन्मानित करण्यात आले आहे (२०१६).

संदर्भ  : मेदककर प्रकाश (संपा.), निवडक तु. शं., अभंग प्रकाशन, नांदेड,२०१२.