सानिया : (१० नोव्हेंबर १९५२). सुनंदा कुळकर्णी-बलरामन. मराठी साहित्यातील आघाडीच्या कथा, कादंबरी लेखिका. त्यांच्या साहित्यात स्वत:प्रती सजग होत जाणार्‍या, विशेषत: उच्चवर्गातील स्त्रीजीवनाचे चित्रण येते. सानिया यांचा जन्म सांगली येथे झाला. पूर्वाश्रमीच्या त्या सुनंदा कुळकर्णी विवाहानंतर सुनंदा कुळकर्णी-बलरामन. पण सानिया या टोपण नावानेच त्यांनी सारे लेखन केले. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर फिरत अनेक शाळातून मॅट्रीक झाल्यानंतर नाशिकचे बी. वाय. के. कॉलेज व पुण्याच्या बी.एम्.सी. कॉलेजमधून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले.

१९७२ मध्ये बी. कॉम. आणि १९७४ मध्ये त्या एम्.कॉम. झाल्या. पदवीधर झाल्यावर लग्नाअगोदर काही दिवस त्यांनी नोकरीही केली. सानियांच्या घरात साहित्यिक वातावरण नव्हते. पण त्या शाळेत असल्यापासूनच लेखन करीत आहेत. शालेय मासिकात त्यांचे लेखन छापून येत असे. सुरुवातीच्या काळात त्यांनी कविताही लिहिल्या. १९७० पासून लेखन करणाऱ्या सानियांचे १९७५ पासून सत्यकथा, मौज, हंस, कथाश्री, किस्त्रीम, अक्षर, तरुण भारत, केसरी यांसारख्या मासिकांतून सातत्याने कथालेखन सुरू आहे.

विवाहानंतर नवऱ्याच्या नोकरीमुळे देश-परदेशात त्यांचे वास्तव्य राहिले. त्यांनी तिथला समाज बघितला, माणसे पाहिली. हे सगळे अनुभवून त्यांनी लेखन केले. गेली अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य महाराष्ट्राबाहेर, बेंगलुरूलाच  आहे. समाजात वावरताना जे अनुभवले, जाणवले, त्यातूनच लेखनाला सुरुवात झाली. कथा, कादंबरी, दीर्घकथा लेखनाबरोबरच  काही अनुवादही त्यांनी केले आहेत. वाट दीर्घ मौनाची  हा स्वैर अनुवाद व सानिया की कहानियाँ  हा त्यांचा दीर्घकथासंग्रह हिंदीमध्ये प्रकाशित झाला आहे.

सानियांनी सुरुवातीला कथा हा वाङ्मयप्रकार हाताळला. शोध  हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८७ मध्ये मौज प्रकाशनने प्रकाशित केला. त्यानंतर खिडक्या (१९८९), भूमिका  (१९९४), वलय  (१९९५), परिमाण  (१९९६), प्रयाण (१९९७), पुन्हा एकदा इ. कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे अनुभव, त्यांना जे लिहायचे, सांगायचे, व्यक्त करायचे आहे ते लघुकथा या वाङ्मयप्रकारात व्यक्त करणे अशक्य वाटल्यावर सानियांनी दीर्घकथा लिहिल्या. प्रतीती (१९८९), दिशा घराच्या (१९९१), ओळख (१९९२), आपण आपले (२००३) हे त्यांचे दीर्घकथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. विषयाचा आवाका, अभिव्यक्ती दीर्घकथेच्याही पलीकडची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी कादंबरी लेखन केले. स्थलांतर (१९९०), आवर्तन (१९९६), अवकाश (२००१) या त्यांच्या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत.

आई आणि मुलगी यांचे नाते त्यांच्या बर्‍याच कथांमध्ये येते. सानियांच्या कथांमध्ये अधिकतर उच्चवर्गाचे चित्रण येते. विषमतेवर आधारित पुरुषसत्ताक कुटुंबरचना आणि त्याविरुद्ध स्त्रीस्वातंत्र्याचा विचार अधोरेखित करणार्‍या स्त्रियांचे चित्रण त्यांच्या कथांत दिसते. एक स्त्री म्हणून लग्नसंस्थेमुळे अपरिहार्यपणे वाट्याला आलेल्या मातृत्वाचे अनुभव, दैनंदिन जीवन जगताना, एक स्त्री म्हणून, स्वयंपूर्णतेने जगण्याचा घेतलेला अनुभव, आपल्या वाटा आपण शोधण्याचा घेतलेला निर्णय, संसारातील घरगुती कामात पुरुषाचे पत्नीला मिळणारे सहकार्य असे अनेकविध दृष्टिकोन त्यांच्या कथात आढळतात. आपल्या भोवतालातील स्त्रीच्या मनाचा त्या तळ शोधतात. बदलत्या परिस्थितीचे भान ठेवत, संवेदनशील वृत्तीने त्यांनी भोवतालच्या वास्तवाचे चित्रण अनेक कथांतून केले आहे. या सर्वच लेखनात तरुण वयातील, स्वतंत्र आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली संवेदनशील माणसे भेटतात.ओळख दीर्घकथेतील अश्विनी स्वत:ला जाणण्याचा प्रयत्न करते. तर आपण आपले या दीर्घकथेतील विद्युत् तिच्या स्वतंत्र, आत्मविश्वासी, तडफदार स्वभावानुसार सारे समजून घेते आहे. स्त्रीच्या आत्मभानाचा झगडा अधिक तीव्र असतो. तरीही बुद्धिनिष्ठ मन बधीर होऊ न देता जगायचे असते हे भान त्यांच्या लेखनातल्या तरुण स्त्री-पुरुष दोघांनाही असते. हेच त्यांना कथा या माध्यमातून मांडावेसे वाटले आहे.

स्थलांतर  कादंबरीचे लेखन त्यांनी पत्रात्मक निवेदनपद्धतीने केले आहे. जगदीश आणि नंदिता यांनी एकमेकांनी लिहिलेली ही पत्रे आहेत. त्यांच्या कादंबरीतील नंदिता, जान्हवी, सुरुची या सगळ्याच स्त्री व्यक्तिरेखा सुशिक्षित, कमवत्या, स्वत:च्या अस्तित्वाचे भान असलेल्या, स्वातंत्र्याची आस धरणार्‍या आहेत. स्वत:प्रती सजग होत जाणारी स्त्री सानियांच्या कादंबर्‍यात विशेषत्त्वाचे भेटते.

स्त्रीचे अस्तित्व, तिची महत्त्वाकांक्षा, तिचे व्यक्ती म्हणून जगणे, स्वत:च्या अस्तित्त्वाचा शोध घेणे या दृष्टिकोनातूनच एका कलात्मक पातळीवर त्यांनी हे सारे चित्रण केले आहे. मुद्दाम स्त्रीवादी म्हणून त्यांनी लेखन केलेले नाही. स्त्रीच्या भूमिकेतून ‘ती एक माणूस’ म्हणून सहजपणे मांडली आहे.  हेच त्यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे.सानिया यांच्या या संवेदनशील, स्त्रीप्रती सजगता व्यक्त करणार्‍या साहित्याची दखल घेतली गेली असून त्यांना राज्यशासन पुरस्कार, साहित्य परिषद पुरस्कार, वर्टी पुरस्कार, वि. स. खांडेकर स्मृती पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

संदर्भ : गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.