सर्व दर्शनांमध्ये द्रव्य कशाला मानावे, द्रव्ये किती आहेत, त्यांचे स्वरूप काय इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे. योगदर्शनानुसार  पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांमधील सामान्य धर्म आणि विशेष धर्म यांच्या समुदायाला द्रव्य असे म्हणतात – ‘सामान्यविशेषसमुदायोऽत्र द्रव्यं द्रष्टव्यम् |’ (व्यासभाष्य ३.४४). प्रत्येक महाभूतामध्ये काही सामान्य धर्म म्हणजे त्या महाभूताच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये समान रूपाने आढळून येणारे धर्म असतात. त्याचप्रमाणे काही विशेष धर्म म्हणजे अन्य महाभूतांच्या पदार्थांपेक्षा त्या महाभूताच्या अंतर्गत येणाऱ्या पदार्थांचे वेगळे धर्म असतात. पतंजलींनी सामान्य धर्मालाच स्वरूप आणि विशेष धर्मालाच स्थूल असे संबोधले आहे. दोन्हीचा समुदाय म्हणजे द्रव्य होय. उदा., पृथ्वी तत्त्वामध्ये मूर्तत्व म्हणजे ‘आकार असणे’ हा सामान्य (समान रूपाने दिसणारा) धर्म आहे. जरी पृथ्वी तत्त्वाच्या अंतर्गत येणाऱ्या वस्तूंचे आकार वेगवेगळे असले तरी ‘आकार असणे’ हा धर्म समान रूपाने सर्व पदार्थांमध्ये दिसून येतो. पृथ्वी तत्त्वाचा असा कोणताही पदार्थ नाही, ज्याला आकार नाही. रुक्षता (कोरडेपणा), कठिणता इत्यादी पृथ्वी तत्त्वाचे विशेष धर्म आहेत. अशा प्रकारे द्रव्ये सामान्य आणि विशेष धर्मांचा समूह आहे.

समूह हे दोन प्रकारचे असतात – ‘युत-सिद्ध-अवयव’ आणि ‘अयुत-सिद्ध-अवयव’. युत-सिद्ध-अवयव समूह म्हणजे ज्या समूहातील घटकांना एकमेकांपेक्षा वेगळे केले जाऊ शकते, असा समूह. ज्या समूहातील ‘अवयव’ एकमेकांपेक्षा ‘युत’ (वेगवेगळे) झाल्यावरही ‘सिद्ध’ राहतात – ज्यांचे अस्तित्व राहते, असा समूह म्हणजे युत-सिद्ध-अवयव समूह होय. उदा., व्यक्तींचा समूह. समूहातील व्यक्ती वेगळ्या झाल्या तरीही त्या व्यक्तींचे स्वतंत्र अस्तित्व राहू शकते; त्यामुळे व्यक्तींचा समूह युत-सिद्ध-अवयव आहे. कधीकधी समूहातील अवयवांना वेगळे केले जाऊ शकत नाही किंवा वेगळे केले असता त्यांचे पृथक् अस्तित्व राहू शकत नाही, अशा अवयवांच्या समूहाला अयुत-सिद्ध-अवयव समूह असे म्हणतात. उदा., शरीर. शरीर अवयवांचा समूह आहे. परंतु शरीरापासून हात, पाय, मस्तक इत्यादी अवयव वेगवेगळे केले असता त्यांचे अस्तित्व राहू शकत नाही, तर ते नष्ट होतात. त्यामुळे शरीर हे अयुत-सिद्ध-अवयव समूह आहे. त्याचप्रमाणे द्रव्य हेही अयुत-सिद्ध-अवयव समूह आहे, कारण द्रव्यातील सामान्य धर्म आणि विशेष धर्म यांना वेगवेगळे करता येऊ शकत नाही. पाण्यापासून आर्द्रता, अग्नीपासून उष्णत्व वेगळे करता येऊ शकत नाही. त्यामुळे महाभूतांमधील सामान्य धर्म आणि विशेष धर्म यांचा अयुत-सिद्ध-अवयव समूह म्हणजे द्रव्य होय, असे योगदर्शनाचे प्रतिपादन आहे – ‘अयुतसिद्धावयवभेदानुगत: समूहो द्रव्यमिति पतञ्जलि: |’ (व्यासभाष्य ३.४४).

द्रव्याच्या स्वरूपाविषयीची ही चर्चा ऋषी पतंजलींनी योगसूत्रामध्ये केलेली नाही. एखाद्या योग्याला महाभूतांचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल, तर त्याने त्या महाभूतांच्या वेगवेगळ्या आयामांवर संयम (धारणा, ध्यान आणि समाधी) केला पाहिजे, असे प्रतिपादन करणारे सूत्र (३.४४) पतंजलींनी लिहिले आहे. त्या सूत्राच्या अनुषंगाने भाष्यकार व्यासांनी द्रव्य म्हणजे काय, याविषयी विस्तृत विवेचन केले आहे.

संदर्भ : स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.

समीक्षक  : कला आचार्य