पहिल्या महायुद्धातील (१९१४–१९१८) पराभवानंतर हंगेरीचा विजेत्या राष्ट्रांशी झालेला तह (४ जून १९२०). महायुद्धात इंग्लंडच्या नेतृत्वाखालील गटाचा विजय होऊन जर्मनीच्या गटाचा पराभव झाला. या युद्धातील विजेत्या राष्ट्रांनी युद्धोत्तर जगाची पुनर्रचना करण्यासाठी व जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी ‘पॅरिस शांतता परिषद’ भरविली (१९१९). या परिषदेत विजेत्या राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांशी विविध तह-करार केले. यांमध्ये जर्मनीशी ‘व्हर्सायचा तह’, बल्गेरीयाशी ‘न्युलीचा तह’, तुर्कस्थानशी ‘सिव्हर्सचा तह’ व हंगेरीशी ‘त्रिआनॉनʼ किंवा ‘ट्रॅनॉन तह’ करण्यात आला. यांतील व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर व जागतिक राजकारणावर जसा दूरगामी परिणाम झाला, तसा ‘त्रिआनॉनचा तह’ हंगेरीवर दूरगामी परिणामी करणारा ठरला.

पॅरिस शांतता परिषदेसाठी हंगेरीचे अध्यक्ष अल्बर्ट अपॉनयी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविण्यात आले. हंगेरी पुन्हा बलशाली होऊ नये, या हेतूने विजेत्या राष्ट्रांनी हंगेरीच्या विभाजनाचा प्रस्ताव या परिषदेत ठेवला. मात्र हंगेरियन शिष्टमंडळाने हा प्रस्ताव ठामपणे नाकारला व आपले अखंडत्व कायम राखण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड लॉईड जॉर्ज आणि इटलीचे पंतप्रधान व्हित्तॉर्यो एमान्वेअले ओर्लांदो यांना हंगेरीच्या बाजूने चर्चा करण्याची विनंती केली. यानुसार हंगेरीच्या विभाजनाच्या प्रस्तावावर किमान चर्चा व्हावी, असा विचार या दोघांनी मांडला. मात्र फ्रान्सने याला कडाडून विरोध केला व कोणतीही तडजोड न करता तह स्वीकारण्यासाठी हंगेरीवर दबाव आणला. या दबावाला बळी पडून हंगेरीने ४ जून १९२० रोजी ग्रँड त्रिआनॉन पॅलेस येथे एका तहावर सह्या केल्या. हाच त्रिआनॉनचा तह तह.

या तहाने हंगेरीचे विभाजन करण्यात आले. हंगेरी हा ऑस्ट्रियापासून वेगळा केला. हंगेरीचे विविध प्रदेश तोडून शेजारच्या देशांना जोडण्यात आले. यांपैकी  ‘पश्चिम हंगेरी’ म्हणजेच बर्जेनलँडचा बहुतेक भाग ऑस्ट्रियाला देण्यात आला. स्लोव्हेनिया प्रांत झेकोस्लोव्हाकियाला, तर इटलीला फ्यूम बंदर देण्यात आले. हंगेरीतील ट्रान्ससिल्व्हानिया प्रदेशात रूमानियन्स जास्त असल्याने तो प्रदेश रूमानियाला देण्यात आला. क्रोशिया हा प्रदेश याच तत्त्वावर युगोस्लाव्हियाला देण्यात आला. या विभाजनामुळे हंगेरिया आकाराने व क्षेत्रफळाने अत्यंत छोटा देश बनला. हंगेरीचे क्षेत्रफळ ३५००० चौ. मैल (तहापूर्वी १०९,००० चौ. मैल होते) व लोकसंख्या केवळ ८० लाख इतकी राहिली. हंगेरीचे सैन्यबळही कमी करून फक्त ३५ हजार करण्यात आले. एकूणच या तहाने दोस्त राष्ट्रांकडून हंगेरीचा जाणीवपूर्वक शक्तीक्षय करण्यात आला.

हंगेरीचे विभाजन करताना कोणतेही जनमत विचारात न घेतल्यामुळे त्यातून वांशिक संघर्ष, अंतर्गत अशांतता व विस्थापितांचे प्रश्न निर्माण झाले. पहिल्या महायुद्धात झालेली वित्तहानी झाली व तहातील हंगेरीच्या विभाजनामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती असलेले महत्त्वाचे प्रदेश हंगेरीपासून वेगळे केले. परिणामी हंगेरीची अर्थव्यवस्था ढासळली. सीमेलगतचे लहान-लहान प्रांत स्वतंत्र केल्याने वा शेजारील देशांना जोडल्याने त्या प्रदेशांतील हंगेरियन जनता अल्पसंख्याक बनली. अशा प्रकारे हंगेरियन लोक हंगेरीत व हंगेरीबाहेरही अल्पसंख्य बनले. परिणामी हंगेरीचे जागतिक राजकारणातील महत्त्व लोप पावले. हंगेरीच्या दुरवस्थेस दोस्त राष्ट्रांनी लादलेला त्रिआनॉनचा तह होता, अशी भावना हंगेरीत निर्माण झाली. या सर्व अपमानास्पद व अस्थिर परिस्थितीमुळे हंगेरीत इंग्लंड व फ्रान्स बद्दल असंतोष निर्माण झाला. त्यातून हंगेरियन जनमत इंग्लंड व फ्रान्स यांच्या विरोधात व हिटलर, मुसोलिनी यांच्या बाजूने तयार झाले. त्यामुळे हंगेरी दुसऱ्या महायुद्धात हिटलर व मुसोलिनीच्या म्हणजेच अक्ष राष्ट्रांच्या (Axis Powers) बाजूने युद्धात उतरली.

संदर्भ :

  • Denis, Richards, Modern Europe (1789-1945 AD), 5th Edition, Toronto, 1950.
  • Mahajan, V. D. History of modern Europe since 1789, 13th Edition, New Delhi, 1985.
  • Zeidler, Miklos, Ideas on Territorial Revision in Hungary 1920-1945, Boulder, 2007.

                                                                                                                                                                                        समीक्षक : अरुण भोसले