फिशर, फ्रिटझ : (५ मार्च १९०८ – १ डिसेंबर १९९९). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार. त्यांचा जन्म जर्मनीतील बव्हेरीया प्रांतातील लुडविगस्टॅड येथे मॅक्स आणि एमिली फिशर ह्या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील रेलरोड इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. फ्रिटझ फिशर यांचे शालेय शिक्षण ॲन्सबाख आणि आइकस्टॉट येथे झाले (१९१७-२६). त्यांचे उच्च शिक्षण अरलंगेन विद्यापीठात (१९२६-१९२८) व बर्लिन विद्यापीठामध्ये झाले. त्यांनी बर्लिन विद्यापीठातून पीएच.डी पदवी मिळविली (१९३७). बर्लिन विद्यापीठात ते सहायक प्राध्यापक ह्या पदावर कार्यरत होते (१९३७-३९). त्यांचा विवाह मार्गारेट लाऊथ यांच्याशी झाला (२५ मार्च १९४२). फिशर यांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मन वायुसेनेमध्ये सेवा केली (१९३९-४५). त्यांना १९४५-४७ ह्या काळात अमेरिकेमध्ये युद्धकैदी म्हणून ठेवण्यात आले होते.

युद्धकैदी म्हणून सुटका झाल्यावर ते हॅम्बर्ग विद्यापीठात मध्ययुगीन व आधुनिक इतिहास ह्या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७३ मध्ये प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतली. पुढे १९७८ पर्यंत ते हॅम्बर्ग विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांना अनेक अमेरिकन विद्यापीठांनी अभ्यागत प्राध्यापक (व्हिझिटिंग प्रोफेसर) म्हणून आमंत्रित केले होते. नोत्रदाम विद्यापीठ (१९५४) व सेंट अँथोनिज् कॉलेज, ऑक्सफर्ड (१९६९-७०) येथे ते ‘निमंत्रित प्राध्यापक’ म्हणून कार्यरत होते.

फिशर यांनी हॅम्बर्ग विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या महायुद्धाचा इतिहास ह्या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते (१९५५). ह्या चर्चासत्रामध्ये काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांमध्ये पहिल्या महायुद्धाच्या इतिहासाच्या पारंपरिक मांडणीला आव्हान दिले होते. ह्यातून फिशर यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीतील अभ्यासकांसाठी नुकत्याच खुल्या झालेल्या पुराभिलेखागारांमधील कागदपत्रांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. ह्या पुराभिलेखागारांमधील ऐतिहासिक कागदपत्रे अभ्यासण्याची संधी मिळणारे ते पहिले इतिहासकार होते.

त्यांनी ग्रिफ नाक देर वेलमाक्ट (जागतिक शक्ती बनण्यासाठीचा प्रयत्न) हा जर्मन भाषेतील पहिला ग्रंथ प्रकाशित केला (ऑक्टोबर, १९६१). ह्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर जर्मनीज एम्स इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर ह्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले (१९६७). ह्या ग्रंथामध्ये फिशर यांनी पहिल्या महायुद्धासाठी जर्मनीला जबाबदार ठरवले. त्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले की, पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर एका महिन्यात जर्मनीने प्रचंड भूप्रदेश बळकावण्यासाठी व आपले आर्थिक प्रभुत्व स्थापन करण्यासाठी एक योजना आखली होती. त्यांच्या मते, जर्मनीने पहिले महायुद्ध स्वतः एक जागतिक महासत्ता बनण्याच्या हेतूंनी भडकविले होते.

जर्मनीचा पहिल्या महायुद्धातील हेतू आणि दुसऱ्या महायुद्ध काळातील हिटलरचा हेतू यांमध्ये सातत्य होते, हे त्यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले. काही इतिहासकारांनी जर्मनीच्या इतिहासात हिटलरच्या उदयाला एक ‘दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना’ असे संबोधले होते. हिटलरचा आणि जर्मनीमध्ये झालेल्या ऐतिहासिक घडामोडींचा काही संबंध नव्हता, असे ह्या इतिहासकारांचे मत होते. मात्र फिशर यांच्या संशोधनातून हे पुढे आले की, जर्मनीमध्ये हिटलरसारखा हुकूमशहा सत्तेवर येण्यासाठी ऐतिहासिक घटना व जाणिवांचे सातत्य जबाबदार होते. फिशर यांनी क्रेग डर इल्युशनेन (भ्रमांचे युद्ध) (१९६९), बूडनिस डर एलिटेन (अभिजनांची युती) (१९७९) आणि हिटलर वॉर हाइन बिट्रीजसनफाल (हिटलर एक दुर्घटना नव्हती) (१९९२) ह्या ग्रंथांमधून त्यांच्या विचारांची सविस्तर मांडणी केली.

फिशर यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीमुळे अभ्यासकांमध्ये वादविवाद सुरू झाला. ह्या वादविवादाला ‘फिशर विवाद’ (Fischer Controversy) म्हणून ओळखले जाते. ह्या वादविवादाने जर्मनीच्या इतिहासलेखनात क्रांती घडून आली. काही इतिहासकारांनी फिशर यांच्या मांडणीला विरोध केला आणि त्यांच्या ग्रंथांवर टीका केली. ह्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या इतिहाससंशोधनाला चालना मिळाली. फिशर यांच्या ग्रंथांमुळे जर्मन इतिहासाकडे पाहण्याचा एक टीकात्मक व विश्लेषणात्मक दृष्टीकोन अभ्यासकांमध्ये रुजला.

फिशर यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या मुलभूत संशोधनाची दखल जगभरातील अनेक शिक्षण संस्थांनी घेतली. इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठ (१९७४) आणि ईस्ट-अँगलिया विद्यापीठाने (१९८१) तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाने डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला (१९८३). जर्मनीमधील कॅसल विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑनरिस क्वासा’ ही पदवी दिली (१९८८). याशिवाय ब्रिटिश अकादमी आणि अमेरिकन हिस्टॉरिकल असोसिएशन ह्या संस्थांनी त्यांना मानद सदस्यत्व प्रदान केले.

हॅम्बर्ग येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • Fischer, Fritz, Germany’s Aims in the First World War, New York, 1967.
  • Taylor A. J. P. ‘Fritz Fischer and His Schoolʼ, The Journal of Modern History, 47 (1), pp. 120–124, 1975.
  • Saxon, Wolfgang, ‘Fritz Fischer, German Historian Blamed Germany for First Warʼ, New York Times, 10 Dec. 1999.

                                                                                                                                                                             समीक्षक : अरुण भोसले