दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी-रशिया यांत झालेले (दि. २२ जून १९४१–६ डिसेंबर १९४१) युद्ध. या मोहिमेला ‘बार्बारोसा मोहीम’ हे सांकेतिक नाव दिले होते; तर रशियाचे इतिहासकार मात्र त्याला महान देशभक्तीचे युद्ध (Great Patriotic War) असे संबोधतात. जागतिक युद्धातील हे सर्वांत प्रबळ युद्ध होते.

शस्त्रसज्ज असलेले जर्मन सैनिक

पार्श्वभूमी : बार्बारोसा मोहीम हे रशियावर दुसऱ्या महायुद्धात जून ते डिसेंबर १९४१ दरम्यान जर्मनीने केलेल्या विराट आक्रमणाला हिटलरने दिलेले टोपणनाव. जगाच्या आजतागायत इतिहासातील हे सर्वांत जंगी युद्ध. दि. २२ ऑगस्ट १९३९ रोजी जर्मनी आणि रशिया यांमध्ये झालेला एकमेकांविरुद्ध युद्ध न करण्याचा करार हा केवळ देखावा होता. रशियावर आक्रमणकरवी त्याचा निःपात करण्याच्या आपल्या निर्धारानुसार हिटलरने १९४० मध्येच हल्ल्याची योजना बनविण्याचे आदेश दिले होते. नंतर ‘डायरेक्टिव्ह २१’ करवी मे १९४१ मध्ये कारवाई सुरू करण्याचे त्याने हुकूम सोडले; मात्र अपेक्षित वेळेपेक्षा ती कारवाई उशिरा झाली.

रशियाविरुद्ध जर्मनीने युद्ध करण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे :  

१) मॉस्को हे उद्योगकेंद्र मध्यबिंदू असून त्याच्या उत्तरेस आर्केजल व पूर्वेस सैबेरियन रेल्वे गेली होती. शिवाय ती विकसित राजधानीही होती. तिथूनच राष्ट्राचे नेतृत्व होत असे. ती पादाक्रांत करणे.

२) लेनिनग्राड हे बाल्टिकवरील औद्योगिक महत्त्वाचे बंदर होते.

३) युक्रेन प्रांत व डोनेट्स खोरे हा कृषिप्रधान खनिज संपत्तीचा मुलूख असून त्यातून जॉर्जियातील तेलशुद्धीकरणाचा वाटूम बंदरापर्यंत सरळ सागरी मार्ग जात होता.

४) याशिवाय कृषिसमृद्ध व खनिज तेल उत्पादनांचा कूबान व कॉकेशस प्रांत जर्मनीच्या दृष्ट्या महत्त्वाचा होता. या चार उद्दिष्टांना जोडणाऱ्या कक्षेपर्यंत जर्मन सैन्य पोहोचले, तर त्या कक्षांतर्गतच्या अनेक क्षेत्रांतील उपज रशियाला गमवावी लागेल, हा जर्मनांचा हेतू होता.

जर्मन युद्धयोजना ही लेनिनग्राड-मॉस्को-कीव्ह-स्टालिनग्राड या आघाडीवर रशियाला जेरीस आणावयाचे व नंतर तेलक्षेत्र हस्तगत करावयाची अशी होती.

हिवाळ्याच्या उत्तरार्धात जर्मनीने पूर्व रशिया, पोलंड आणि रूमानिया यांमधील आपल्या सेना रशियन सीमेवर हलविण्यास प्रारंभ केला. त्या हालचाली रशियाच्या नजरेतून सुटल्या नाहीत. किंबहुना, डिसेंबर १९४० मध्येच हिटलरने पाठविलेले एक निनावी गुप्त पत्र बर्लिनमधील रशियाच्या लष्करी राजदूताला मिळाले. त्यानंतरही अनेक संकेत मिळाले. परंतु स्टालिनने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि दोन देशांत झालेल्या व्यापारी करारानुसार स्टालिनने जर्मनीला धान्य आणि इतर पदार्थ पाठविण्यात खंड पडू दिला नव्हता; तथापि रशियाचे सरसेनापती जनरल जॉर्जी झुकॉव्ह यांनी जर्मनीच्या आक्रमणाला तोंड देण्याची पद्धतशीर योजनी अमलात आणली. आरे सोव्हिएट सैन्य सीमेवर तैनात करण्याऐवजी त्यांनी २५० किमी.पर्यंत एकामागे एक अशा तीन संरक्षण फळ्यांमध्ये ते विभागले. जनरल झुकॉव्ह यांचे अनुमान होते की, जर्मन सैन्याचा जोर आणि गती या तीन फळ्यांमुळे क्षीण होत जाईल आणि शेवटी रशियन सैन्य परिणामकारक प्रतिहल्ला चढवून जर्मन सैन्याला मागे रेटू शकेल. या योजनेनुसार रशियाच्या सीमेवरील पहिल्या फळीतील सु. १० लाख सैन्याविरुद्ध जर्मनीचे तीस लाखांचे सैन्य एकवटले होते. त्यामुळे आरंभास जर्मनीला इच्छित ३:१ वर्चस्व उपलब्ध होऊ शकले.

क्रिमियावर हल्ला करताना जर्मन बॉम्बफेकी विमाने

नियोजित वेळेनुसार दि. २२ जूनच्या पहाटे युद्धाला आरंभ झाला. जर्मनीने १२१ जर्मन डिव्हिजन्स सुरुवातीच्या हल्ल्याकरिता वापरली. जर्मन सैन्य वेरमाक्टच्या हजारो तोफांमधून सीमेपार आग ओकू लागले. रशियन विमानतळ आणि जर्मन सीमेच्या पूर्वेस तीनशे किमी. अंतरावरील रशियाच्या लष्करी ठाण्यांवर शेकडो विमाने बॉम्बवर्षाव करू लागली. त्यानंतर लागलीच रणगाडा (Panzer) विभाग शत्रूप्रदेशात वेगाने आगेकूच करू लागला. या आकस्मिक व नेत्रदीपक हल्ल्याने रशियन सैन्य स्तंभित झाले. फिनलंडपासून क्बॅकसीपर्यंत रशियाच्या संपूर्ण पश्चिम सीमेला या आघाताने व्यापले.

जर्मन सैन्याने रशियाच्या २९०० किमी. आघाडीवर एकसाथ हल्ला चढविला होता. लष्कराच्या १५३ डिव्हिजन, ज्यांत १९ रणगाडे आणि १५ कवचित दलाच्या (Armoured Corps) तुकड्या होत्या. सहा लाख गाड्या, ३६०० रणगाडे, ३००० पेक्षा अधिक विमाने हल्ल्यात तैनात करण्यात आली होती. त्याशिवाय रूमानियन, स्लोव्हाक, फिन, हंगेरियन, इटालियन आणि स्पेन यांच्या स्वयंसेवकांचे ५ लाखांचे सैन्यही त्यात सामील झाले होते. उत्तरेतील आर्मी ग्रुपमध्ये जनरल व्हिल्हेल्म फॉन लीब यांच्या नेतृत्वाखाली एकतीस डिव्हिजन होत्या. ईशान्य दिशेला हल्ला चढवून लिथ्युएनिया, लॅटव्हिया आणि इस्टेनिया ही बाल्टिक राष्ट्रे यांना काबीज करायची होती आणि नंतर लेनिनग्राड जिंकायचे होते. लीब यांच्या हल्ल्याच्या आरंभानंतर अडीच आठवड्यांनी फिनलंडच्या चौदा डिव्हिजन उत्तरेकडून लेनिनग्राडच्या दिशेने चढाई करून त्यांना साह्य देणार होत्या. जनरल हॉप्नर यांच्या हाताखाली प्रबळ चौथी रणगाडा विभाग या उत्तर आर्मी ग्रुपमध्ये समाविष्ट होती.

रणगाडे सज्ज करताना सोव्हिएट रशियन सैनिक

मध्य आर्मी ग्रुप सर्वांत मोठा होता. त्यांच्याकडे सत्तावन्न डिव्हिजनच्या तोफा होत्या. फेडर फॉन बॉक यांच्या नेतृत्वाखाली या ग्रुपमध्ये जनरल हॉथ यांच्या हाताखाली तिसरा रणगाडा विभाग आणि जनरल गुडेरिआन यांच्या हाताखालील दुसरा रणगाडा विभाग होता. २५० किमी. लांबीच्या प्रिंपेट दलदलीच्या उत्तरेच्या बाजूने मार्गक्रमण करीत मध्य ग्रुपच्या दोन जंगी तुकड्या प्रथम स्मोलेंस्क काबीज करून त्या पश्चात मॉस्कोवर धडक मारणार होत्या. जनरल गर्ड फॉन रून्टश्टेटच्या दक्षिण आर्मी ग्रुपमध्ये अठ्ठेचाळीस डिव्हिजन होत्या. जनरल क्लेस्टचा प्रसिद्ध पहिला रणगाडा विभाग या ग्रुपबरोबर होता. प्रिपेंट दलदलीच्या दक्षिणेकडून तो युक्रेनवर हल्ला चढविणार होता. कीव्ह शहर जिंकण्याचे काम क्लेस्ट यांच्याकडे होते. दक्षिण ग्रुपमधील सहा डिव्हिजन रूमानियामार्गे १ जुलैला दक्षिणेत हल्ला चढविणार होत्या. फक्त चौदा डिव्हिजन राखीव ठेवून उरलेल्या सर्व डिव्हिजन पहिल्याच दिवशी रणांगणात उतरविण्यात येणार होत्या.

विजयामागून विजय : पहिल्या तीन आठवड्यांत अनेक वेढ्यांच्या हालचालींकरवी जर्मनीचा डाव सफल झाला. जनरल हॉप्नर, गूडेरिआन व फील्ड मार्शल रून्टश्टेट यांसारख्या जबरदस्त अनुभवी सेनाधिपतींकडे जर्मनांचे नेतृत्व होते. ब्लिट्झक्रीगच्या तडाख्यामुळे रशियन सैन्य पार गोंधळून गेले. जर्मन रणगाड्यांनी सोव्हिएट संरक्षण फळ्या झपाट्यात ओलांडल्या. ९ ते १९ जुलै या दहा दिवसांत तीन लाख रशियन युद्धबंदी झाले. स्मोलेंक्सच्या हल्ल्यात जर्मन्यांनी ३२०० रणगाडे आणि ३१ तोफा हस्तगत केल्या. जर्मन विमानदलाने एका आठवड्यातच रशियाच्या अर्ध्याअधिक विमानांना गारद केले. १० जुलैला उत्तर आर्मी ग्रुपने लिथ्युएनिया जिंकले आणि लेनिनग्राडपासून १०० किमी. अंतरावरील लुगा नदीपर्यंत ते पोहचले. क्रिमियाकडे जाणाऱ्या दक्षिण आर्मी ग्रुपची वाटचाल मात्र रशियन सैन्याच्या कणखर विरोधामुळे मंदावली; परंतु गूडेरिआनच्या रणगाडा विभागाच्या साह्याने जनरल रून्टश्टेटनी युद्धातील सर्वांत नेत्रदीपक विजय मिळविला. २६ सप्टेंबरला कीव्हला वेढा घालून त्यांनी रशियन सैन्याच्या अनेक तुकड्यांना कोंडीत पकडले. त्यांनी साडे सहा लाख युद्धबंदी आणि ८८४ रणगाडे ताब्यात घेतले. रशियाची धान्यभूमी युक्रेन आणि क्रिमिया ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जर्मनीच्या हातात आले.

रशियन युद्धकैदी

जर्मन आघाडी २ ऑक्टोबरपर्यंत लेनिनग्राड, मास्कोची वेस, खारकॉव्ह रॉस्टॉव्ह अशी झाली. फॉन बॉक व गूडेरिआनजवळ पंधरा लाख सैनिक होते. त्यात मॉस्कोवर हल्ला चढविला. दि. १५ ऑक्टोबर रोजी जर्मन चिलखत डिव्हिजनने मॉस्कोपासून १५० किमी. दूर असलेल्या मझडॉक गावावर हल्ला केला. त्यात त्यांना विजय मिळाला, पण नंतर हल्ल्याचा वेग कमी झाला; कारण ताणलेल्या मोहिमेमुळे अन्नाचा तुटवडा, रसदमार्गात खंड यांमुळे सैन्य पार थकून गेले. शिवाय जीवघेणी कडाक्याच्या थंडीमुळे ऑक्टोबरअखेरीस जर्मनीचे आक्रमण थंडावले.

रशियन सैन्याने दि. ६ डिसेंबर १९४१ रोजी राजधानीला वेढा घालणाऱ्या जर्मन तुकड्यांवर जोरदार हल्ला चढविला आणि वेढले. सोव्हिएट रशियाचा हा पहिला विजय होता. त्यानंतर जनरल झुकॉव्ह यांचे सैन्य मध्यभागी, जनरल ट्यिमशेन्कॉचे सैन्य दक्षिणेत आणि जनरल कोनीव यांचे सैन्य उत्तरेत अशा तीन आघातरेषेमध्ये रशियन सैन्याने जणू बार्बारोसाच्या प्रतिबिंबाप्रमाणेच उलटी चाल सुरू केली. १९४१च्या ख्रिसमसपर्यंत जर्मन हायकमांड माघारीच्या योजना आखण्यात गढून गेली. जर्मन सरसेनापती वाल्थर फॉन बॉशिस्त यांना पदच्युत करून हिटलरने युद्धनेतृत्व स्वतःकडे घेतले. जानेवारी १९४२ पर्यंत परिस्थिती स्थिरस्थावर झाली आणि दोन्हीही बाजू वसंतऋतूच्या आगमनाची वाट पाहू लागल्या.

बार्बारोसाच्या मोहिमेला गूडेरिआन आणि एरिक फॉन मॅनस्टीन या दोन अद्वितीय जर्मन सेनापतींच्या उल्लेखाशिवाय पूर्णविराम मिळणार नाही. ‘लाईटनिंग वॉर’ (विजेच्या वेगाने युद्ध) या तत्त्वाचा गूडेरिआन हा हिटलरचा अग्रणी जनरल होता. अच्छुंग पँझर हे १९३८ मध्ये त्याने लिहिलेले पुस्तक गतिमान आणि साहसी रणगाडा युद्धाचे बायबल आहे. त्याची दुसरी रणगाडा आर्मी अनेक विजयानंतर मॉस्कोनिकट पोहचली. परंतु मॉस्कोवर हल्ला करण्याची त्याची योजना तडीस जाऊ दिली गेली नाही. त्या ऐवजी त्याला कीव्हवर हल्ल्यासाठी दक्षिणेस जाण्यास सांगण्यात आले. त्याने ते पुरे केले; परंतु हिटलरशी झालेल्या मतभेदामुळे त्याला बडतर्फ केले गेले. मॅनस्टीनच्या ११ व्या आर्मीने चार दिवसांत ३३० किमी.चे अंतर पार केले आणि क्रिमियावर कबजा केला. पुढे फिल्डमार्शल झाल्यावर त्यांचेही हिटलरशी मतभेद झाले. रशियाच्या निःपाताचा हिटलरचा ध्यास अखेरीस त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला.

संदर्भ  :

  • Bethel, Nicholas, Russia Besieged (World War II), Alexandria, 1978.
  • Gilbert, Martin, The Second World War : A Complete History, New York, 1989.
  • Lee, Baker, The Second World War on the Eastern Front, London, 2009.

                                                                                                                                                                      समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा