देसाई, अक्षय रमणलाल (Desai, A. R.) : (१६ एप्रिल, १९१५ – १२ नोव्हेंबर, १९९४). प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि मार्क्सवादी विचारवंत. देसाई यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे झाला. त्यांचे वडील रमणलाल हे प्रख्यात लेखक, तसेच गांधी विचारांचे पाईक होते. रमणलाल यांचा १९३० च्या दशकात गुजरातमधील तरुणांवर मोठा प्रभाव होता. अक्षय देसाई यांचे सुरुवातीचे शिक्षण बडोदरा येथे झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख, गोविंद सदाशिव घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली इ. स. १९४६ मध्ये त्यांनी पीएच. डी. साठी ‘भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी’ (सोशल बॅकग्राउंड ऑफ इंडियन नॅशनॅलिझ्म) हा प्रबंध लिहिला. पुढे इ. स. १९४८ मध्ये तो प्रकाशित झाला.

देसाई यांनी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात समाजशास्त्राचे शिक्षक म्हणून काम केले. नंतर १९५१ मध्ये ते मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि १९६९ मध्ये तेथेच विभाग प्रमुखही झाले. पुढे १९७५ मध्ये ते याच विभागातून निवृत्त झाले. हा काळ भारतातील समाजशास्त्राच्या विकासाचा अतिशय महत्त्वाचा काळ होता. भारतीय समाजाच्या अभ्यासासाठी द्वंद्वात्मक-ऐतिहासिक भौतिकवादी पद्धतीचा पाया देसाई यांच्या विविध अभ्यासांमधून घातला गेला. मीरत येथे १९८० मध्ये अखिल भारतीय समाजशास्त्रीय अधिवेशनात अध्यक्षीय भाषण करतांना त्यांनी भारतीय समाजाच्या अभ्यासासाठी मार्क्सवादी दृष्टिकोणाचे महत्त्व अधोरेखित केले. मार्क्सवादी अभ्यासपद्धती समाजातील तत्कालीन उत्पादनाचे संबंध, समाजाचे वर्गीय चरित्र आणि राज्यसंस्थेची समाजाचा विशिष्ट विकासाचा मार्ग ठरविण्यामागची भूमिका समजण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अनेक समाजशास्त्रीय प्रश्नांचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी मार्क्सवादी पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देसाई यांनी केले.

देसाई यांनी कायम सभोवतालच्या राजकीय-आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितींचा सम्यक आढावा घेत आपला सिद्धांत मांडला आहे. ते महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थी चळवळींमध्ये, तसेच डाव्या आणि मार्क्सवादी गटांमध्ये सक्रीय होते. समन्यायी सामाजिक परिवर्तनाचे ध्येय कायम उरी बाळगल्यामुळे त्यांचे सिद्धांतन आणि चळवळीमधील सक्रीयता नेहमी एकमेकांना पूरक राहिली. समाजशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असतानाच ते त्या काळातील विविध कामगार, शेतकरी आणि आदिवासी चळवळींशी संलग्न होते. सामाजिक समस्यांचे ते अतिशय संवेदनक्षम निरीक्षक होते.

देसाई यांनी भारतीय राष्ट्रवादाचे परीक्षण करण्यासाठी ऐतिहासिक भौतिकवादी अभ्यासपद्धतीचा अवलंब केला. त्यांच्या मते, भारतीय राष्ट्रवाद हा ब्रिटीश वसाहतवादाने निर्माण केलेल्या भौतिक परिस्थितीचा परिपाक आहे. भारतीय राष्ट्रवाद एकोणिसाव्या शतकापासून घडलेल्या विविध वस्तुनिष्ठ आणि व्यक्तीनिष्ठ शक्तींचा परिणाम म्हणून उदयाला आला. ब्रिटीशांनी भारतातील भांडवलशाहीपूर्व उत्पादनसंबंध नष्ट केले आणि आधुनिक भांडवली उत्पादनसंबंध अस्तित्वात आणले; ज्यामुळे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला मोठी चालना मिळाली. ब्रिटिशांनी भारतात औद्योगिकरण आणि आधुनिकीकरण यांचा पाया घालून नव्या आर्थिक संबंधांचा पाया घातला. यासोबतच त्यांनी भारतात केंद्रीय राज्यसंस्था, आधुनिक शिक्षण आणि वाहतूक व संप्रेषणाचे आधुनिक तंत्र यांचे प्रत्यारोपण केले. ते राज्यसंस्थेला सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकणारी महत्त्वाची शक्ती मानतात. त्यांना लोकांच्या लोकशाही हक्कांविषयी खूप तळमळ होती.

राष्ट्रवाद एक ऐतिहासिक कोटिक्रम आहे. ब्रिटीश काळात भारतीय समाजातील संरचनात्मक परिवर्तनाची चिकित्सा करतांना प्रामुख्याने भारतीय समाजातील सरंजामी उत्पादनसंबंध, सरंजामशाही ते भांडवलशाही परिवर्तन, भांडवलशाही उत्पादनसंबंधांचा आणि राष्ट्रवादी शक्तींचा उगम हे समजून घेण्यावर देसाई यांनी लक्ष केंद्रित केले. या अभ्यासांमधून त्यांनी भारतातील भांडवलशाहीच्या विकासाचे मार्क्सवादी दृष्टिकोणातून परीक्षण केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळी, कामगारांचे प्रश्न, आदिवासी, दलित, ग्रामीण गरीब, जातीवाद, वांशिक संघर्ष, योजना-धोरणे, लोकशाही, मानवी हक्कांचे मुद्दे अशा सध्यकालीन घटना, प्रश्न आणि त्यांची गुंतागुंत कशी समजावून घ्यावी याची दिशा दिली.

वसाहतवादी भारतात ज्या विविध सामाजिक शक्तींचा उगम झाला, त्यांचे भारतीय समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर अनेक परिणाम झाले. त्यामध्ये महत्त्वाचा परिणाम म्हणजे नव्या सामाजिक वर्गांचा उगम होय. या वर्गांना स्वत:च्या विशिष्ट राजकीय आणि सामाजिक महत्त्वाकांक्षा होत्या की, ज्या ब्रिटीशांच्या हितसंबंधांच्या विरोधी होत्या. ही परीघटना भारतातील राष्ट्रवादाच्या विकासाची प्रेरणा आणि आधार ठरली. लोकांनी आपल्या हितसंबंधांसाठी एकत्र येणे, सहज संपर्क करणे यासाठी विशेष करून रेल्वे आणि प्रसार माध्यमे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. याचा परिणाम सामजिक चळवळींवर, सामुदायिक प्रतिनिधित्वावर आणि मोठ्या प्रमाणावर देश भावना जागृत होण्यामध्ये झाला असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले.

वसाहतवादी काळात, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शेतकी समाजामध्ये झालेले बदल, भारतातील कामगार आणि शेतकरी चळवळींचे स्वरूप व वाढ, शहरीकरणाचे नवे प्रकार आणि झोपडपट्टी वस्त्यांची वाढ, जमातवादी शक्तींकडून जाती आणि धर्म यांचे राजकीयकरण, तसेच भारतातील नागरी हक्कांच्या चळवळी या प्रश्नांवरील देसाई यांचे लिखाण समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.

देसाई यांनी प्रचलित आधुनिकतावादी सिद्धांताच्या मर्यादा, त्यातील विरोधाभास दाखविला आहे. त्यांनी परावलंबन आणि अविकास सिद्धांतांच्या परिप्रेक्षातून भारतीय विकास प्रक्रियेची चिकित्सा केली. भारतीय राज्याची कृषक धोरणे ही ग्रामीण समाजातील वर्गीय भेद वाढविणारी ठरतील, अशी भीती कालांतराने ग्रामीण वर्गीय तणावांच्या पार्श्वभूमीवर खरी ठरली. भारतातील सार्वजनिक क्षेत्र, मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप आणि सामाजिक कल्याणकारी कार्यक्रम हे सत्ताधारी वर्गांनी भांडवलदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी आणि शोषित वर्गांचा असंतोष प्रतिबंधित करण्यासाठी आखलेली रणनीती असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी शहरांच्या विकासाचे प्रारूप, रेल्वे कामगारांचे संप, स्त्री चळवळीचे मुद्दे, झोपडपट्ट्या पाडण्याचा निषेध करणारी आंदोलने यांचा अभ्यास करून शहरांमधील विविध अंतरविरोध स्पष्ट केले.

मूल्याधारित असणे हा मार्क्सवादी अभ्यासपद्धतीचा दोष असू शकत नाही. उलट, विविध शासकीय धोरणे, विकास प्रकल्प यांची समाजाभिमुखता तपासून पाहण्यासाठी मार्क्सवादी परीप्रेक्ष्यच अभ्यासकांच्या उपयोगी पडेल, असे देसाई यांचे स्पष्ट मत होते. सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक १९६० आणि १९७० च्या दशकांत भारतीय सामाजिक रचना आणि परिवर्तनाचा अभ्यास करतांना जेव्हा फक्त खेड्यांचे सूक्ष्म अभ्यास, सहभागी निरीक्षण आणि क्षेत्रीय अभ्यास यांवर भर देत होते, तेव्हा देसाई यांनी ऐतिहासिक पद्धतीचा वापर करून सरंजामशाही, भांडवलशाही, वर्गीय रचना, उत्तर-वसाहतवादी राज्यसंस्था, शेतकरी आणि कामगार चळवळी अशा व्यापक आणि स्थूल पातळींवरील घटकांच्या विश्लेषणाकडे आपले लक्ष केंद्रित केले होते.

देसाई यांना १९८७ मध्ये ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ पुरस्कार आणि त्याच वर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाचा ‘बेस्ट सोशलॉजिस्ट ऑफ दी इयर-१९८७’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देसाई यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढील प्रमाणे ꞉ सोशल बॅकग्राउंड ऑफ इंडियन नॅशनॅलिज्म, १९४८; रुरल सोशलॉजी इन इंडिया, १९५९; रिसेंट ट्रेंड इन इंडियन नॅशनॅलिज्म, १०६०; रुरल  इंडिया इन ट्रांझिशन, १९६१; स्लम्स अँड अर्बनिसेशन ऑफ इंडिया, १९७०; स्टेट अँड सोसायटी इन इंडिया, १९७५; पिझंट स्ट्रगल इंन इंडिया, १९७९; अर्बन फॅमिली अँड फॅमिली प्लॅनिंग इन इंडिया, १९८०; भारत का विकास मार्ग (इंडियाज पॅथ ऑफ डेव्हलपमेंट), १९८४; मॉडर्न गॉडमेन इन इंडिया, १९९३; स्टेट अँड रिप्रेसिव कल्चर, १९९४ इत्यादी.

देसाई यांचे गुजरातमधील बडोदा येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Mukhopadhyay, Arpita, Marxist Sociology in India a Study of the Contribution of A. R. Desai, Kolkata, 2014.
  • Patel, Sujata (ed.), Doing Sociology in India ꞉ Genealogies, Locations and practices, New Delhi, 2016.
  • The International Encyclopaedia of Anthropology, 2018.
  • Uberoi, Patricia; Sundar, Nandini; Deshpande, Satish (Ed), Anthropology in the Eas t: Founders of Indian Sociology and Anthropology, Delhi, 2007.

समीक्षक : सावळे संजय