बडीशेप (फीनिक्युलम व्हल्गेर) : (१) पाने व कंदासह वनस्पती, (२) छत्रीसारखा फुलोरा व (३) सुकलेली फळे (बडीशेप)

एक सुगंधी वनस्पती. बडीशेप ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फीनिक्युलम व्हल्गेर आहे. कोथिंबीर, ओवा आणि गाजर या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. बडीशेप मूळची भूमध्य समुद्राच्या प्रदेशातील असून अनेक देशांत तिची लागवड केली जाते. मात्र, बडीशेपेचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. त्याखालोखाल मेक्सिको, चीन, इराण आणि बल्गेरिया हे देश तिचे उत्पादन करतात. भारतात बडीशेपेची सर्वाधिक लागवड राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील उत्तर भाग आणि मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी  केली जाते.

बडीशेप ही १–१·५ मी. सरळ उंच वाढणारी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचे खोड पोकळ असते. फुले-फळे येऊन गेल्यावर झाडाचा जमिनीवरील भाग वाळून जातो व मरतो. परंतु जमिनीतील कंद सुप्तावस्थेत राहतो. पाने संयुक्त व सु. ४५ सेंमी. लांब असतात. ती अनेक खंडांमध्ये विभागून त्यांच्या उपशाखा अगदीच अरुंद (०·५ मिमी.) झालेल्या असतात. फुले असंख्य, लहान व पिवळी असून ती छत्रीसारख्या मोठ्या फुलोऱ्यामध्ये येतात. अशा फुलोऱ्याला संयुक्त उच्छत्र म्हणतात. फळे हिरवट पिवळी व ४–१० मिमी. लांब असून वाळलेल्या फिकट तपकिरी बदामी फळांना बडीशेप म्हणतात. सुकलेली फळे फुटून त्याचे दोन भाग लोंबतात. प्रत्येक भागावर पाच कंगोरे असतात व खोबणीत तेलनलिका असतात.

बडीशेपेला विशिष्ट वास आणि स्वाद मुख्यत: त्यातील बाष्पनशील पदार्थ ॲनेथॉल या संयुगामुळे येतो. फळांत कर्बोदके, ब-समूह जीवनसत्त्वे,-जीवनसत्त्व आणि पोटॅशियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम इ. घटक असतात. फळे सुगंधी, वायुनाशी व मूत्रल असून उच्च रक्तदाबावर गुणकारी असतात. बडीशेपेचा उपयोग भारतात मुख्यत: मसाल्यांमध्ये, जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी आणि औषधी वापरासाठी होतो. यूरोप व उत्तर अमेरिकेत बडीशेपेचा उपयोग एक मसाल्याचा पदार्थ म्हणून तर पानांचा उपयोग सॅलडमध्ये आणि कंदाचा वापर खाण्यासाठी करतात.‍ तिच्या काही उपजातींचा उपयोग शोभेचे झाड म्हणून बागेत लावण्यासाठीही होतो. रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत ते तणासारखे वाढते. उत्तर अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामधील काही भागांत ते उपद्रवी आणि आक्रमक तण झाले आहे.

ॲनिस (पिंपिनेला ॲनिसियम) : (१) छत्रीसारखे फुलोरे असलेली वनस्पती, (२) फांदीवरील वाळलेली फळे (ॲनिसीड)

ॲनिस :  यूरोप व उत्तर अमेरिकेत बडीशेपेसारखीच फळे देणारी आणखी एक वनस्पती आढळते. तिचे नाव ॲनिस असून तिच्या फळांचा स्वाद बडीशेपेसारखा असतो. ॲनिस वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पिंपिनेला ॲनिसियम आहे. ती  सु. १ मी. उंच वाढते. खोडाच्या तळाकडील पाने साधी व १–५ सेंमी. लांब, तर वरच्या भागाकडील पाने पिसांसारखी असून पर्णिकांमध्ये विभागलेली असतात. फुले लहान व पांढरी असून ती छत्रीसारख्या फुलोऱ्यात येतात. फळे ३–६ मिमी. लांब व लंबगोल असून वाळल्यावर तडकतात. त्यांनाच ॲनिस किंवा ॲनिसीड म्हणतात.

 

 

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा