बदाम हा पानझडी वृक्ष रोझेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस डल्किस आहे. गुलाब व नासपती या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. बदाम वृक्ष मूळचा इराणमधील असून त्याचा प्रसार इतरत्र झाला असावा, असे मानतात. हल्ली दक्षिण यूरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (कॅलिफोर्निया), ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. गोड बदाम आणि कडू बदाम असे बदामाचे दोन प्रकार आहेत. प्रूनस डल्किस डल्किस या जातीच्या बिया गोड आणि प्रूनस डल्किस अमारा या जातीच्या बिया कडू असतात. बदामाचे दाणे म्हणजे बदाम वनस्पतीच्या बिया आहेत.
बदामाचा वृक्ष सु. १२ मी.पर्यंत उंच वाढू शकतो. खोडाचा व्यास सु. ३० सेंमी. असतो. लहान फांद्या सुरुवातीला हिरव्या असून नंतर सूर्यप्रकाशामुळे त्या जांभळट होऊन हळूहळू राखाडी होतात. पाने साधी, एकाआड एक, भाल्यासारखी व ७–१२ सेंमी. लांब असून कडा दंतुर असतात. फुले एकेकटी किंवा जोडीने येतात. गोड बदामाच्या फुलांचा रंग फिकट गुलाबी, तर कडू बदामाच्या फुलांचा रंग गडद गुलाबी असतो. फळ आठळीयुक्त व एकबीजी असते. बदामाचे बी चपटे, सुरकुत्या असलेले व चवीला गोड किंवा कडू असते. गोड बदाम आकाराने लहान, तर कडू बदाम मोठे असतात.
बदामात १४ प्रकारांची ॲमिनो आम्ले असतात. त्यांपैकी ग्लुटामिक आम्लाचे प्रमाण सर्वाधिक असून त्या खालोखाल ॲस्पार्टिक आम्लाचे प्रमाण आहे. गोड बदाम आणि कडू बदाम यांच्यातील तेल सारखेच असते. कडू बदामांमध्ये ॲमिग्डॅलीन आणि प्रूनॅसीन ही ग्लुकोसाइडे असतात. त्यांवर विकरांची क्रिया होऊन हायड्रोजन सायनाइड तयार होते. त्यामुळे कडू बदामाचे अतिसेवन प्राणघातक ठरते. कडू बदामापासून मिळालेल्या तेलातील सायनाइडयुक्त संयुगे वेगळी करून ते बदामाचे तेल म्हणून वापरतात. मात्र लागवड करायची झाल्यास गोड बदामाच्या वृक्षांची करतात.
बदाम हा सुक्यामेव्यातील एक घटक असून त्याचा वापर मिठाई, आइसक्रीम व केक यांमध्ये केला जातो. त्यातील कमी शर्करेमुळे व जास्त तंतूंमुळे मधुमेही रुग्णांना आहार म्हणून त्याचा उपयोग होतो. १०० ग्रॅ. बदामांपासून २१·७ ग्रॅ. कर्बोदके, ४९ ग्रॅ. मेद, २१ ग्रॅ. प्रथिने तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियमयुक्त खनिजे, ई आणि ब-समूह जीवनसत्त्वे उपलब्ध होतात. त्यामुळे बदाम पौष्टिक आहे. रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल वाढविण्याबरोबरच एलडीएल या वाईट कोलेस्टेरॉलाचे प्रमाण कमी करण्यासाठी बदामाचे सेवन उपयुक्त आहे असे मानले जाते. त्यामुळे हृदयाचे विकार तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्यांना बदाम उपयुक्त ठरतात. त्याच्या तेलामुळे त्वचा मुलायम होऊन उजळते. म्हणून सौंदर्यप्रसाधनांमध्ये तेलाचा वापर करतात. जगात सर्वत्र बदामाची लागवड केली जाते. त्याच्या उत्पादनात अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, इराण, मोरोक्को व इटली हे देश आघाडीवर आहेत.