प्रक्रियावादी पुरातत्त्वविद्येतील एक भाग. प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या कालखंडात (१९५०—१९९०) इंग्लिश पुरातत्त्वज्ञ डेव्हिड क्लार्क (१९३७—१९७६) यांनी ॲनालिटिकल आर्किऑलॅाजी (१९६८) या ग्रंथात पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्यासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित व्हायला हवी, असे सुचवले होते. याला अनुसरून अमेरिकन मानवशास्त्रज्ञ विल्यम राथजे यांनी १९७४ मध्ये ॲरिझोनातील टक्सन भागात पुरातत्त्वीय अवशेषांच्या सखोल अभ्यासासाठी संशोधन केले. हे संशोधन ’कचरा प्रकल्प’ या नावाने प्रसिद्ध आहे. याच सुमारास मायकेल शिफर (जन्म १९४७) या अमेरिकन पुरातत्त्वज्ञांनी पुरातत्त्वीय अवशेष आणि प्रत्यक्षात प्राचीन काळात घडलेले मानवी वर्तन यांच्यातील संबंधांचा अधिक खोलात विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
लोकसमूह जेव्हा प्रत्यक्ष जीवन जगत असतात, त्या वेळी त्यांच्यामध्ये आणि पर्यावरणातील घटकांमध्ये परस्परसंबंध असतात आणि मुळात मानवी वर्तनात वैविध्य असते. लोक ज्या वस्तू वापरतात त्यांच्या निर्मितीसाठी लागणारे घटक, वस्तू बनवण्याच्या व त्या वापराच्या प्रक्रिया, वस्तू टाकून देण्याशी अथवा त्या साठवून ठेवण्यासंबंधी घटक या सर्वांचा संबंध त्या वस्तू पुरातत्त्वीय अवशेष या स्वरूपात आढळण्याशी आहे.
पुरातत्त्वीय अवशेषांमधून मानवी वर्तनाबद्दल आपण जे निष्कर्ष काढू त्या वेळी मानवी वर्तन घडून गेल्यानंतर झालेल्या बदलांची नोंद घेतली पाहिजे. असे करताना शिफर यांनी दोन रूपांतरण प्रक्रिया घडतात असा विचार मांडला. त्यांना शिफर यांनी एन-ट्रान्सफॅार्म (नैसर्गिक घटक) आणि सी-ट्रान्सफॅार्म (सांस्कृतिक घटक) अशा संज्ञा वापरल्या. या प्रक्रियांचा विचार न केल्याने पुरातत्त्वीय संशोधनात अनेक चुकीचे निष्कर्ष काढले गेले, असे त्यांचे प्रतिपादन होते. त्यांच्या बिहेव्हियरल आर्किऑलॅाजी (१९७६) या पुस्तकाने खळबळ उडाली होती. तथापि वर्तनात्मक पुरातत्त्वातील बहुसंख्य संकल्पना नंतरच्या काळात पुरातत्त्वविद्येच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट झालेल्या दिसतात.
अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यात ग्रास हॉपर पाब्लो या ठिकाणी मोगोलोन (Mogollon) जमातीची वसाहत सु. सहाशे वर्षांपूर्वी होती. या पुरातत्त्वीय स्थळाचे रीड आणि व्हिटलेसे यांनी केलेले उत्खनन हे वर्तनात्मक पुरातत्त्वाचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
संदर्भ :
- Clarke, D. L. Analytical Archaeology, London, 1968.
- Rathje, W. L. & Murphy, C. Rubbish : The Archaeology of Garbage, New York, 1992.
- Reid, Jefferson & Whittlesey, Stephanie, Grasshopper Pueblo : A Story of Archaeology and Ancient Life, University of Arizona Press, 1999.
- Schiffer, M. B. Behavioral Archeology, 1976.
- Schiffer, M. B. Formation Processes of the Archaeological Record, Albuquerque, 1987.
समीक्षक : सुषमा देव