पुरातत्त्वविद्येच्या नागरी पुरातत्त्व या शाखेत शहरांचा पुरातत्वीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास केला जातो. या शाखेचा मुख्य भर नगरांचा आणि नागरीकरणाचा पुरातत्त्वीय पुराव्यांमधून मागोवा घेणे यावर आहे. शहरांचा उगम व विकास, नागरीकरणाची प्रक्रिया, भौतिक अवशेषांतून प्रतिबिंबित होणारे नागरीकरण, शहरातील विविध भागांचे कार्य आणि आधुनिकीरणामुळे शहरांच्या आकार-प्रकारात घडून आलेले बदल इत्यादी पैलूंचा अभ्यास करून सर्व कालखंडांतील शहरांच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली जाते. शहरांच्या रचनेवर पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून प्रकाश टाकून बदलत्या काळानुसार शहरांमध्ये घडून आलेली बदलांची आणि त्यासाठी कारणीभूत घटकांची कारणमीमांसा या शाखेत केली जाते.

अमेरिकेतील नागरी पुरातत्त्व शाखेचे जनक बर्ट साल्वेन यांनी १९७९ मध्ये नागरी पुरातत्त्वाची व्याख्या स्पष्ट करताना दोन प्रकारच्या अभ्यासांमध्ये फरक केला आहे. एका प्रकारामध्ये अभ्यासात आता शहरांमध्ये असलेल्या पुरातत्त्वीय स्थळांच्या अभ्यासाचा समावेश होतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये शहराचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. पहिल्या प्रकारात जरी एखादे पुरातत्त्वीय स्थळ असले, तरी ते त्या शहराच्या उदयाच्या अगोदरचे असू शकते व त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरीकरणाच्या प्रवासाची माहिती मिळेलच असे सांगता येत नाही. सध्या न्यूयॉर्क शहराचा भाग झालेल्या पोर्ट मोबिल या जागी नऊ हजार वर्षांपूर्वीच्या इंडियन लोकांची वसाहत होती; पण त्याचा आणि आत्ताच्या न्यूयॉर्क शहराचा काहीही संबंध नाही, हे पहिल्या प्रकारच्या नागरी पुरातत्त्वाचे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या चंदीगढमध्ये सिंधू संस्कृतीच्या स्थळांचे पुरावे आढळले असले, तरी त्यांचा आधुनिक चंदीगढच्या नागरीकरणाशी कसलाही संबंध नाही.

शहरांमधील सर्व प्रकारच्या वास्तू, रस्ते व वसाहत रचना, अन्नधान्य, शहरांमधला जमिनीचा (Urban Land Use Pattern) विशिष्ट असा वापर, पाणी व वीज पुरवठ्यासारख्या पायाभूत सुविधांची व्यवस्था आणि निरनिराळ्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे ही नागरी पुरातत्त्वाची काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. तसेच एखाद्या विशिष्ट शहराची वाढ कशी व केव्हा झाली आणि त्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत होते, यांचा पुरातत्त्वीय पुराव्यांवरून मागोवा घेतला जातो. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळांमधील नागरीकरणाच्या प्रक्रिया आणि अशा शहरांच्या वाढींचे राजकीय व आर्थिक इतिहासावरील परिणाम वेगवेगळे असल्याने त्या त्या काळाप्रमाणे उद्दिष्टांचे स्वरूप बदलते. इंग्लंडमधील यॉर्क व लंडन, अमेरिकेतील एल पेसो (टेक्सस), साक्रामेंटो (कॅलिफोर्निया), न्यूयॅार्क व फिलाडेल्फिया आणि ऑस्ट्रेलियातील ॲडिलेड व सिडनी या शहरांमधील पुरातत्त्वीय संशोधन ही नागरी पुरातत्त्वाची काही उदाहरणे आहेत.

संदर्भ :

  • Birmingham, Judy, ‘A Decade of Digging : Deconstructing Urban Archaeology’, Australian Historical Archaeology, 8 : 13-22, 1980.
  • Dickens, Roy S. Jr. & Bowen, William R. ‘Problems and Promises in Urban Historical Archaeology : The MARTA Project’, Historical Archaeology, 14 : 42-57, 1980.
  • Mayne, A. & Murray, T. Ed., The Archaeology of Urban Landscapes : Explorations in Slumland, Cambridge, 2001.
  • Staski, Edward, ‘Advances in Urban Archaeology’, Advances in Archaeological Method and Theory,  5 : 97 -149, 1982.

समीक्षक : सुषमा देव