कालाचे मापन करण्याची पद्धती. भूतलावर मानव अस्तित्वात आल्यापासून ते आतापर्यंत त्याने केलेल्या प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यांची कालक्रमानुसार पुनर्बांधणी करणे हे पुरातत्त्वीय संशोधनातील कालमापनाचे उद्दिष्ट आहे. पुरातत्त्वातील कालमापनासाठी प्रमाणित पद्धती विकसित करण्याचे प्रयत्न सुमारे दोन शतकांपासून केले गेले आहेत. आता त्यासाठी आधुनिक तंत्रांचीही मदत घेतली जाते. काळ अनंत असला तरी त्याच्या अभ्यासासाठी स्थूल तत्त्वावर सुसूत्र असे कालखंड योजणे आवश्यक असते. उत्खनन आणि समन्वेषणाद्वारे प्राचीन मानवी वसाहतींचा आणि तत्कालीन घडामोडींचा मागोवा घेतला जातो. त्यामध्ये मुख्यत: उपलब्ध होणार्‍या खापरे, विटा, प्राण्यांची हाडे, जळलेल्या धान्यांचे कण, धातूच्या, काचेच्या वस्तू अशा अवशेषांच्या आधारे प्रत्येक कालखंडातील घटनांची क्रमवार सुसंगत मांडणी करतात. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा त्या घटनांशी संबंध तपासावा लागतो. त्या वस्तू कशापासून बनवल्या होत्या, त्या तयार करण्याचे तंत्र कितपत विकसित झाले होते, त्या जिथे सापडल्या होत्या, तिथेच बनविल्या गेल्या होत्या की, दुसर्‍या ठिकाणाहून आणलेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यांचा काळ कोणता होता, या सर्व गोष्टींवरून प्राचीन मानवी जीवनाचा अभ्यास केला जातो.

ऐतिहासिक काळातील अवशेषांचे पुरावे ताम्रपट, नाणी, शिलालेख अशा लिखित स्वरूपांत असल्याने त्यांचा अभ्यास करणे तुलनेने फारसे अवघड नसते. त्यांतील गुप्तकालीन शिल्पे, शुंगकालीन मूर्ती, रोमन कुंभ, सिंधू संस्कृतीची मृद्भांडी अशा काही वस्तू विशिष्ट काळाशी संलग्न असतात. त्यांचा काळ सर्वसाधारणपणे माहीत असल्याने त्यावरून इतर अवशेषांचा काळ स्थूलमानाने ठरविता येतो. मात्र इतिहासपूर्व काळातील अश्महत्यारे, मानवी सांगाडे, प्राण्यांची हाडे, प्राचीन झाडांची खोडे, कोळसा, शंखशिंपले, मातीची भांडी असे अवशेष नि:शब्द स्वरूपात असतात. केवळ निरीक्षणाने केलेल्या त्यांच्या अभ्यासावर मर्यादा पडतात. त्या वेळी विविध विज्ञानशाखांचा आधार घ्यावा लागतो. भौतिक विज्ञानातील नित्यनूतन शोधांमुळे कालमापनाच्या अनेक पद्धतींचा शोध लागला आहे. तसेच रासायनिक परीक्षणही त्यासाठी उपयुक्त ठरते.

प्राचीन जीवाश्मांच्या कालमापनासाठी रासायनिक विश्लेषण पद्धती वापरतात. कोळसा, शंखशिंपले, हाडे यांच्यासाठी कार्बन-१४ पद्धती उपयोगात आणतात. अश्महत्यारांच्या कालमापनासाठी पोटॅशियम/आर्गॉन पद्धती वापरतात. मातीची भट्टी, भाजलेल्या विटा, मातीची भांडी यांच्यासाठी तप्तदीपन/प्रदीपन पद्धती, तर ज्वालामुखीजन्य खडकांचा काळ विभाजन तेजोरेषा पद्धतीने ठरवितात. मातीची खापरे, चुलींच्या कालमापनासाठी पुराचुंबकीय, तर काचहत्यारांसाठी ऑबसिडियन अशा भौतिकी पद्धतींचा उपयोग होतो. याशिवाय वृक्षवलयमापन पद्धतीने प्राचीन झाडांचा काळ ठरविता येतो. पुरातत्त्वीय कालमापनाच्या पद्धतींचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करतात :

सापेक्ष कालमापन : (Relative Dating). सुरुवातीला स्तरविज्ञानावरून सापेक्ष कालमापन केले जात असे. उत्खननातील थरांमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या तुलनात्मक कालाचे ठोकताळे बांधले जात असत. आता यामध्ये काही भौतिकी, भौतिकी- रासायनिक पद्धतींचा अवलंब केला जातो. प्रयोगांच्या आधारे अशा पद्धतींचा उपयोग करून प्राचीन अवशेषाचा काळ त्याच्या आसपास सापडलेल्या दुसर्‍या अवशेषाच्या संदर्भात ठरविला जातो. या पद्धतींनी काळ अंदाजे सांगता येत असला, तरी अचूक किंवा निश्चित काळ ठरविता येत नाही. अलीकडच्या काळात विज्ञानशाखांनी निरपेक्ष कालमापनाच्या पद्धती उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी आजही अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय संशोधन आणि उत्खननामध्ये सापेक्ष कालमापनाचा अवलंब केला जात आहे. पुराचुंबकीय, फ्ल्युओरीन, युरेनियम या काही सापेक्ष कालमापन पद्धती आहेत.

निरपेक्ष कालमापन : (Absolute Dating). पुरातत्त्वातील पुराव्यांचे अचूक आणि काटेकोर कालमापन म्हणजे निरपेक्ष कालमापन होय. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कालमापन पद्धतींमध्ये बदल झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळामध्ये झालेल्या आण्विक संशोधनातून पुरातत्त्वासाठी उपयुक्त ठरणार्‍या कालमापन पद्धतींचा प्रवेश झाला. प्राचीन अवशेषांतील विशिष्ट रासायनिक घटकांच्या किंवा किरणोत्सर्गी घटकांच्या किंवा काही भौतिक गुणधर्माच्या आधाराने त्यांचे कालमापन करणे शक्य असते, असे लक्षात आले. कार्बन-१४ पद्धती सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाते. त्या पद्धतीमुळे ज्या संस्कृतींचा काळ ठरविता येत नव्हता, त्यांचा काळ निश्चित करण्यात आला. सापेक्ष पद्धतींनी पूर्वी केलेल्या कालमापनाचे पुनर्मूल्यमापन होऊन काहींना दुजोरा मिळाला, तर काहींचा पूर्वी ठरविलेला काळ चुकीचा ठरविला गेला. शास्त्रीयदृष्ट्या कालमापनाची ही महत्त्वपूर्ण पद्धती आहे.

संदर्भ :

  • Hedges, R. E. M. (Eds. Brothwell, D. R. & Pollard, A. M), ‘Dating in Archaeologyʼ, Handbook of Archaeological Sciences, pp. 3-8, England, 2001.
  • Walker, M. J. C. Quaternary Dating Methods, England, 2005.
  • क्षीरसागर, अनुपमा, प्राचीन संस्कृतींचे कालमापन, पुणे, १९९८.

                                                                                                                                             समीक्षक : प्रमोद जोगळेकर